सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – २ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

आमचे घर एक मजली होते. ढग्यांचं घर अशी त्या घराला ओळख होती. 

ज. ना. ढगे म्हणजेच जनार्दन नारायण ढगे

उत्तम शिक्षक, प्रसिद्ध लेखक,साहित्यप्रेमी, तत्त्वचिंतक,(फिलॉसॉफर),संत वाङमयाचे गाढे अभ्यासक,प्रवचनकार,व्याख्याते आणि एक यशस्वी बिझनेसमन अशी त्यांची विविध क्षेत्रातील ओळख होती. अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाची म्हणजेच माझ्या वडिलांविषयी मी लिहीनच पण तत्पूर्वी माझं लहानपण ज्या घरात गेलं, ते घर, परिसर आणि तिथलं वातावरण आणि त्यातून झालेली आयुष्याची मिळकत हीही माझ्यासाठी खूप मोलाची आहे.

आठवणी खूपच आहेत. मनाच्या कॅनव्हासवर अनेक रेघारेघोट्यांचं जाळं चित्रित झालेलं आहे आणि आजही जेव्हा जेव्हा मन उघडं होतं तेव्हा तेव्हा या चित्रांचं पुन्हा एकदा सुरेख प्रदर्शन  मनात मांडलं जातं.

घराच्या खालच्या मजल्यावर दोन दोन खोल्यांचे स्वतंत्र असे खण होते. हल्लीच्या शब्दात म्हणायचे तर ब्लॉक्स होते. फ्लॅट्स हा शब्द या घरांसाठी उचित नाही.  फ्लॅट म्हटलं की एक निराळी संस्कृती, निराळे आकार, निराळी रचना, संपूर्णपणे वेगळीच जीवन पद्धती नकळतच उभी रहाते. फार तर दोन दोन खोल्यांची ती स्वतंत्र घरे होती असं म्हणूया आणि त्यात गद्रे आणि मोहिले हे आमचे दोन भाडोत्री रहात होते. वाचकहो!  भाडोत्री हा शब्दही मला आवडत नाही.  भाडोत्री या शब्दात दडलाय एक तुच्छपणा, काहीसा उपहास अगदीच टाकाऊ आणि नकारात्मक शब्द आहे हा असे मला वाटते. “ ते आमचे भाडोत्री आहेत.” असं म्हणणारा मला उगीचच गर्विष्ठ वाटतो.  कुठेतरी अहंकाराचा  दर्प तिथे येतो. अशावेळी खरोखरच मराठी भाषेचा जाज्वल्य अभिमान असला तरीही टेनन्ट हा शब्द भावना न दुखावणारा वाटतो. असो. सांगायचं होतं ते इतकंच की त्या खालच्या मजल्यावरच्या दोन स्वतंत्र घरात गद्रे आणि मोहिले यांचे परिवार भाड्याने राहत होते.  महिन्याला पाच रुपये असे भरभक्कम भाडे!  दोन्ही घरांना मागचं दार होतं आणि तिथेच एक मोरी होती. ती त्या दोघांकरिता सामायिक होती. कपडे धुण्यासाठी  एक घडवलेला काळा चौकोनी दगड आणि पाण्यासाठी नळही होता आणि मोरीच्या एका बाजूला कॉमन टॉयलेटही होतं.संडास म्हणण्यापेक्षा टॉयलेट बरं वाटतं.शिवाय त्यावेळी फ्लश नसायचे पण त्या काळात भाड्याने राहण्यासाठी ज्या सोयी सुविधा अपेक्षित होत्या त्या सर्व या घरांसाठी होत्या असं म्हणायला हरकत नाही आणि अशा या घरामध्ये हे दोन परिवार सुखाने राहत होते.

गद्रे होते ब्राह्मण आणि मोहिले होते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू.  गद्रे कट्टर कोकणस्थ  आणि मोहिले पक्के मांस मच्छी खाणारे. मोहिलेंच्या ताईंनी बोंबील तळले की गद्रे वहिनी मागचं दार धाडकन जरा जोरातच आपटून लावायच्या आणि दार आपटल्याचा आवाज आला की माझी आजी वरून गद्रे वहिनींवर रागवायची,” अहो दारं आपटू नका. दार मोडलं ना तर स्वतःच्या खर्चाने नवे दार बसवावे लागेल हे लक्षात ठेवा.”

अखेर  आम्ही घरमालक होतो ना?

पण अशा थोड्याफारच धुसफुसी होत्या बाकी सारी गोडी गुलाबी होती. गद्रे वहिनी त्यांच्या कोकणस्थित माहेराहून येताना फणस घेऊन यायच्या आणि त्याचे गोड,रसाळ गरे सगळ्या गल्लीत वाटायच्या.

पाऊस पडला की पहिल्या आठवड्यात शेवळं ही रानभाजी ठाण्यात मिळायची. अजूनही मिळते. या शेवळाची भाजी अथवा कणी मोहिले ताईंनी केली की त्या वाटीभर घरोघरी पाठवायच्या. वेगळ्या चवीची रुचकर भाजी आणि खूप मेहनतीची पण लहानपणी खाल्लेल्या या रानभाजीची चव आजही माझ्या रसानेवर तशीच्या तशी आहे.  ही अत्यंत गुंतागुंतीची आणि मेहनतीची भाजी करण्याच्या भानगडीत मी कधीच पडले नाही कारण माझ्या डोळ्यासमोर याही भाजीचा एक इतिहासच आहे.

माझे वडील यास्तव खास सायकलवरुन बाजारात जाऊन टोपलीभर शेवळं घेऊन यायचे. बाजारात, ती पाऊस पडल्यावर एक दोनदाच मिळते म्हणून ही बेगमी करून ठेवायची. या भाजीची निवडून साफसफाई माझी आजी अत्यंत मन लावून करायची. ती शास्त्रशुद्ध  चिरून भर तेलात तळून ठेवायची आणि अशी ही चिरलेली तळून ठेवलेल्या शेवळाची भाजी निदान चार-पाच वेळा तरी वेगवेगळ्या प्रकाराने घरात शिजायची. या कामासाठी वडील,आई आणि आजी अत्यंत झटायचे आणि आम्ही ती चाटून पुसून खायचो. त्यावेळी खाद्यपदार्थ टिकवण्यासाठी रेफ्रीजरेटर ही संकल्पना इतकी प्रचलित नव्हती. आणि अभावानेच पण ज्यांच्याकडे असायचा त्या ठाण्यातल्या धनवान व्यक्ती होत्या. आणि त्यांची घरे अथवा बंगले जांभळीनाका,नौपाडा,घंटाळी अशा उच्चस्तर वस्तीत असायचे. त्यांचा क्लासच वेगळा होता.   

मात्र अशी ही पारंपरिक आणि गुंतागुंतीची, प्रचंड मेहनतीची शेवळाची भाजी आजही माझी ताई आणि धाकटी बहीण निशा तीच परंपरा सांभाळत तितकीच चविष्ट बनवतात आणि तुम्हाला खरं वाटणार नाही पण आजही मी केवळ ती भाजी खाण्यासाठी पुण्याहून ठाण्याला बहिणीकडे जाते कारण शेवळाची भाजी हा माझ्यासाठी केवळ खाद्यपदार्थच नव्हे तर या चवीभोवती माझ्या बालपणीच्या रम्य आणि खमंग आठवणी आहेत.हे व्यावहारिक नसेल पण भावनिक आहे.आजही शेवळाची भाजी खाणं हा एक सामुहिक आनंद सोहळा आहे.

तर गद्रे आणि मोहिले याविषयी आपण बोलत होतो. 

मोहिल्यांची चारू ही माझी अतिशय जिवलग मैत्रीण. तिचे भाऊ शरद, अरुण शेखर हेही मित्रच होते. शेखर तसा खूप लहान होता आणि तो माझी धाकटी बहिण छुंदा हिचा अत्यंत आवडता मित्र होता याविषयीचा एक गंमतीदार किस्साही आहे. तोही आपण या माझ्या जीवन प्रवासात वाचणार आहोतच.

चारुच्या  वडिलांना भाई आणि आईला ताई असेच सारेजण म्हणायचे. भाई हे अत्यंत श्रद्धाळू आणि धार्मिक होते. साईबाबांवर त्यांची नितांत श्रद्धा आणि भक्ती होती.  ते कोणत्यातरी सरकारी कार्यालयात नोकरीला होते. पगार बेताचाच पण तरी चार मुलांचा प्रपंच ते नेटाने सांभाळत होते.  त्या वयात आम्हा मुलांना त्यांच्या प्रापंचिक समस्या जाणवत नव्हत्या. कधीतरी ताई आणि भाईंची झालेली भांडणं, शब्दांची आणि  भांड्यांची आदळआपट ऐकू यायची त्यावेळी चारू आमच्याकडे किंवा समोरच्या मुल्हेररकरांकडे जाऊन बसायची. गल्लीतली आम्ही सगळीच मुलं अशावेळी एकत्र असायचो. कधी ना कधी हे प्रत्येकाच्या घरी घडायचं आणि त्यावेळी नकळतच आम्ही सारी अजाण,भयभीत झालेली  मुलं अगदी जाणतेपणाने एकमेकांसाठी मानसिक आधार बनायचो.

भांडण मिटायचंच. तो एक तात्पुरताच भडका असायचा.  नंतर ताई निवांतपणे घराच्या पायरीवर येऊन बसायच्या आणि भाई जोरजोरात टाळ्या वाजवत साईबाबांची आरती म्हणायचे

 ।।माझा निजद्रव्य ठेवा 

     तुम्हा चरण रजसेवा 

     मागणे हेचि आता

     तुम्हा देवाधिदेवा।।

आजही ही आरती म्हणताना माझ्या डोळ्यासमोर सहजपणे टाळ्या वाजवणारे भाई येतात.

गल्लीत अण्णा गद्रे आणि गद्रे वहिनी हे जोडपंही  तिथल्या संस्कृतीत सामावलेलं होतं. अण्णांचा दूधाचा व्यवसाय होता. मला आता नक्की आठवत नाही पण त्यांचा आणखी काही जोडधंदाही  होता. अण्णांची मिळकत चांगली होती, काही जण गमतीने अण्णांवर टीका करीत. “गद्र्यांचा काय पाण्याचा पैसा”

दुधात पाणी घालून ते विकायचे म्हणून हा प्रहार असायचा.

वहिनी ही गोऱ्यापान, गुबगुबीत आणि हिरवट घारे डोळे असलेल्या एकदम टिपिकल कोब्रा महिला आणि घट्ट काष्ट्याचे लुगडं नेसलेल्या, ठुमकत चालणाऱ्या आणि आपण कोकणस्थ ब्राह्मण असल्याचा एक गर्व चेहऱ्यावर घेऊन वावरणाऱ्या वहिनी मला आजही आठवतात.  त्यांच्या हातच्या ताकाची चव मी कधीही विसरू शकणार नाही. पण त्यांच्याविषयी आता जेव्हा माझ्या मनात विचार येतो तेव्हा तीव्रतेने एक सलही बोचतो. या गद्रे दांपत्यांना लागोपाठ तीन मुली झालेल्या होत्या.

विजू, लता, रेखा. आम्ही साऱ्या अगदी गाढ  मैत्रिणीच होतो. या तिघींना आण्णांचा अतिशय धाक होता.अण्णांचं  मुलींवर प्रेम नव्हतंच असं काही मी म्हणू शकत नाही पण एक मात्र खरं की त्यांना मुलगा हा हवाच होता. मुली झाल्या म्हणून ते नेहमी दुःखीच असायचे. रेखाच्या पाठीवरही त्यांना एक दोन कन्यारत्नं झाली पण ती काळाने हिरावून नेली. त्यांना मूठमाती देऊन अण्णा जेव्हा घरी येत आणि  डोक्यावरून आंघोळ करत तेव्हा त्यांना कुठेतरी सुटल्याची भावना वाटत असावी. वहिनी काही काळ मुसमुसत कदाचित त्यांच्या मातृत्वाला झालेली जखम थोडी भळभळायची. गल्लीतली मंडळी मात्र म्हणायची “मुलगी जन्माला आली आणि अण्णांनी तिला अफू पाजली”

हे खूप भयंकर होतं पण त्यावेळी याचा अर्थ कळायचा नाही. खरं की खोटं हे ही माहीत नव्हतं पण या सगळ्यांमागे मुलीच्या जन्माचं दुःख होतं हे निश्चित आणि ते मात्र प्रखरतेने जाणवायचं,बोचायचं,प्रश्नांकित करायचं.

अखेर या दांपत्यास एक मुलगा झाला. त्याचे दणक्यात बारसेही झाले. गल्लीत अण्णांनी केशरयुक्त पेढे मन मुराद वाटले. आनंदी आनंद साजरा केला त्या मुलाचे नाव ठेवले मोरेश्वर आणि गल्लीत तो झाला सगळ्यांचा मोरया कधी मोरू, कधी मोर्‍या.

आणि अशा पार्श्वभूमीवर आम्ही पाच बहिणी होतो आणि माझी आजी अभिमानाने म्हणायची “माझ्या पाच नाती म्हणजे माझे पाच पांडव आहेत.”

 – क्रमशः भाग २. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments