??

☆ प्रत्येकाची “ अनंत चतुर्दशी”लेखक : श्री जयंत विद्वांस ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर

तुटपुंज्या पगारात पै पै बाजूला काढून गणपतीला गावाला नेणारे वडील आठवतात, जिच्या चपलेचा सोडल्यास इतर कुठलाही कुरकुर आवाज न करणारी आई आठवते, पहाटेच्या अंधारात वडिलांची विहिरीवरची आंघोळ, ते मंत्रपठण आठवतं, आईच्या आवरून घेण्यासाठीच्या हाका आणि आजीनी गोधडी बाजूला करून गालावरून फिरवलेला खरबरीत हात आठवतो, ‘झोपलाय तर झोपू दे गं, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता कळत नाही, अंग दुखत असेल, मुंबैहून यष्टीनी यायचं म्हणजे खायचं काम नाहीये, आरत्या व्हायच्या वेळेस उठेल बरोब्बर आणि मेले सगळे एकदम उठले तर पाणी कशात तापवशील एवढ्या सगळ्यांसाठी’ असं म्हणायची.

मला कायम प्रश्न पडायचा, असल्या खरबरीत हातांनी एवढे सुंदर, मऊसूत, एकसारखे पांढरेशुभ्र मोदक ती कशी काय करते? 

तिला विचारलं तर ती धपाटा घालून म्हणाली होती, ‘रांडेच्या, माया लागते रे त्यासाठी मनात, पारीला चिकटून येते मग ती, पारी हातात फिरते ना तेंव्हा देवाचं म्हणते मी, चिरा सांधतो रे तो सगळ्या, नावं माझं मेलीचं होतं’. 

आता यातलं कुणीही नाही. काय एकेक आठवणी असतात बघा, आईचा मोदक फुटू नये म्हणून मी तिच्याजवळ बसून देवाचं म्हणायचो लहानपणी.

 वेडेपणा नुसता सगळा.   

काय एकातून एक आठवत जातं बघा. आरत्या झाल्यावर आजीला नमस्कार केला की ती दोन तीन मिनिटांचा आशीर्वाद पुटपुटायची.

आजोबा जानव्याची किल्ली दाखवून लपवलेल्या खाऊची, गमतींची लालूच दाखवायचे आणि खुणेने म्हणायचे, ‘ये इकडे, तिचं संपायचं नाही’. 

सात दिवस हा हा म्हणता सरायचे.

विसर्जनाला जाताना आजी आजोबा नि:शब्द रडायचे.

लहानपणी वाटायचं त्यात काय रडण्यासारखं आहे, आता कळतं.

आपलाही काळ आता सरत चाललाय, एक दिवस आपल्यावर हीच वेळ, असंच वाटत असावं का?

आजोबा गणपती उचलताना म्हणायचे, ‘पुढच्या वर्षी मी नसलो तरी चिंतामणी करेल हो तुझं सगळं नीट, पाठीवर हात असू दे तुझा सगळ्यांच्या’. 

मग सगळे भरल्या डोळ्यांनी पाय ओढत नदीकडे जायचे. लहानपणी कळायचं नाही एवढं पण तेंव्हाही नदीवरून परत येताना काहीतरी हरवल्यासारखं, विसरून आल्यासारखं वाटायचं. 

दुसऱ्या दिवशी निघताना आज्जी तोंडावरून हात फिरवायची आणि बोळक्या तोंडानी आवाज करत पापी घ्यायची. 

आमच्या निघायच्या वेळेला आजोबा उगाच लक्षात नसल्यासारखं अंगणात कामं करत रहायचे. आम्हांला सोडायला पुलावर यायचे गड्यासोबत आणि गाडी सुटली की नदीवरून परत चालल्यासारखे हळू हळू परत जायचे. 

घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांचं विसर्जन करून सुद्धा खूप काळ लोटलाय आता.

 त्यांच्यामागे जमेल तेवढा उत्सव केला. पण त्यात मन काही रमलं नाही एवढं खरं. 

आयुष्याचे सरळ सरळ दोन भाग पडले, एक त्यांच्यासह, एक त्यांच्याशिवाय. आता उकडीचा मोदक तोंडात जाताना आजीच्या, आईच्या खरबरीत हाताचा स्पर्श ओठाला व्हावा असं वाटून जातं.

आता तो कितीही चविष्ट असला तरी घशाखाली आवंढ्याची सोबत असल्याशिवाय जात नाही.

माझंही वय विसर्जनाच्या आसपासच आहे म्हणा आता.

पाटावर बसून मीही तयार आहे.

पण विसर्जनाची मिरवणूक बघितली की मला हसू येतं. 

देवाला सुद्धा नंबर लागल्याशिवाय विसर्जन सोहळा नाही तिथे माझ्यासारख्या सामान्याची काय कथा!  

प्रत्येकाची ‘अनंत चतुर्दशी’ ठरलेली आहे…. ”कधी”? एवढाच काय तो जीवघेणा प्रश्नं. 

चला, आता एकूणच सगळं घाईनी आवरायला हवंय नाहीतर विनायकराव उखडायचे उगाच. 

(जवळ आलेल्या चतुर्दशीला नजरेआड करून, नव्हे तिच्या आगमनाची चाहूल टाळून चतुर्थीचा आभास निर्माण करणाऱ्या, आणि स्वतः “अनंत” असल्याची दिशाभूल करून घेणाऱ्या माझ्या पिढीला समर्पित…) 

लेखक : जयंत विद्वांस

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments