सुश्री नीता कुलकर्णी
☆ “सावळा – –” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
☆
आभाळात काळ्या ढगांची गच्च दाटी झाली होती…
काळोख दाटून आला होता .. अंधारलं होतं
तो भार ढगाला सहन होईना
तसा कोसळायलाच लागला
धो धो .. कितीतरी वेळ .. अविरत…
मग एक क्षण असा आला
.. सगळं मोकळं झालं
ढगातून सोनेरी ऊन बाहेर पडलं
ती बघतच राहिली…
आता धरणी ते पाणी कुशीत घेईल नव्या सृजनासाठी..
कोवळे अंकुर वर येतील पावसाळ्यातला हा सोहळा..
आज तिने नीट समजून घेतला
निसर्ग शिकवतो आपल्याला
भरून आलं की योग्य ठिकाणी मोकळं करावं.. मन…
मनातलं बोलून सांगून..
प्रेमाने समजून घेणाऱ्याकडे
मग समजूतीचे अंकुर फुटतात नव्याने जगण्यासाठी….
मायेचा प्रेमाचा प्रकाश मिळाला की अंकुरातून पाने येतील…
पुढे फुलं फळं सुद्धा येतील
तो सावळा ..
आभाळातला…
आज तिच्यासाठीच बरसला
म्हणजे खरंच तो तिथे असतो…
अरे खरंच की..
मग आता चिंताच नको
आज तिचा तिला साक्षात्कार झाला. तिने वर पाहून समाधानाने हात जोडले…
कधी कुठे कुठल्या रूपात भेटशील कळतच नाही रे .. ..
माझ्या सावळ्या…..
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈