सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – ६ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टूडे)

जयवंतीण”

काही शब्दांचा अर्थ बालवयात कळत नसेल पण असे काही संबोधनात्मक शब्द मनाच्या आत कुठेतरी नक्कीच गुदमरणारा तीव्र गोंधळ घालायचे. त्यापैकी दोन शब्द मला चांगलेच आठवतात. “वांझोटी आणि प्रौढ कुमारिका”

शब्दांसारखे शब्द पण ते उच्चारताच अर्थापेक्षा त्यामागचा उपहास, तुच्छता, भोचकपणा, भावनाहीन चेष्टा मात्र मला जाणवायची आणि मी विचारात पडायची. भाषेतला, उच्चारातला, भावनेतला गोडवा अजिबात न जपणारे हे शब्द आहेत आणि अशा शब्दांची वाणीतून, मनातून हकालपट्टी झाली पाहिजे असे मला माझ्या आतील प्रवाहातून त्यावेळी वाटायचे.

एखाद्या बाईला मूल नसणं अथवा तिची मुलं जन्मत:च मृत असणं याबाबत समाजाची होणारी प्रतिक्रिया किती ओंगळ असू शकते हे मी त्या न कळत्या वयात नकळत अनुभवलं.

आमच्या घरासमोर एक चाळवजा इमारत होती. ती इमारत कोणाच्या मालकीची होती ते मला आठवतं नाही. एक खणी लहानलहान घरं असलेली ती इमारत होती. तिथे जयवंत नावाचं एक दांपत्य रहात होतं. गल्लीतले सगळे त्यांना जयवंत आणि जयवंतीण असेच संबोधत. वास्तविक हे असं दांपत्य होतं की जे गल्लीत कोणात फारसं मिसळतच नसे. सगळ्यांपासून अलिप्तच होतं म्हणाना !

सकाळी ठराविक वेळेला जयवंत शर्टाच्या पाठीमागच्या कॉलरला, पावसाळा नसला तरीही लांबलचक छत्री अडकवून कामावर जायला निघायचे. ते कुठे आणि काय काम करत होते हे माहीत नव्हतं. अगदी संपूर्ण मळेपर्यंत एकच शर्ट आणि विजार त्यांच्या अंगावर आठवडाभर असायची. जयवंतीण दिसायला खरोखरच सुरेख होती. गोरीपान, नाकीडोळी नीटस पण अत्यंत गबाळी ! सदैव केस विस्कटलेले, साडी अंगावर कशीबशी गुंडाळलेली, चेहऱ्यावर उदास चैतन्यहीनता, बोलण्यात हसण्यात कशातच जीव नसल्यासारखा. सगळेजण तिला “मळकट पांढरी पाल” म्हणायचे. कोपऱ्यावरच्या घरातल्या मीना मथुरेची आई दिवसभर पायरीवर बसून कोण आलं, कोण गेलं यांच्या नोंदी ठेवायची. कुठे कशासाठी कोण चाललं आहे घराबाहेर याचीही ती अत्यंत कर्तव्य बुद्धीने चौकशी करायची पण जयवंतीण दिसली की पटकन घरात जायची आणि “वांझोटी” म्हणत जोरात दरवाजा लावून घ्यायची.

जयवंतीणबाईला मूल नव्हतं कारण तिचं जन्माला येणारं प्रत्येक मूल हे मृतावस्थेतच जन्म घ्यायचं. जयवंतीण बाईचं मातृत्व हे जन्म आणि मृत्यूच्या रेषेवर विद्रुपावस्थेत टांगलेलं राहिलं. मात्र एक होतं की तिच्या प्रत्येक बाळंतपणाच्या वेळी गल्लीतला तिच्याविषयी असणारा एक उपहासात्मक प्रवाह मात्र काहीसा स्तब्ध असायचा. “या खेपेस तरी या बाईचं मूल जगू दे !” अशी भावना सगळ्यांच्या मनात असायची. प्रत्येक वेळी एक ताण, एक दडपण, एक अत्यंत अप्रसन्न शांतता गल्लीने जाणवलेली आहे. घरीच एक सुईण यायची. दार बंद असायचं आणि हे बंद दार जेव्हा उघडायचं तेव्हा जयवंतच्या हातात फडक्यात गुंडाळलेला एक ओला रक्तामासाचा बरबटलेला मृत गोळा असायचा आणि ते एकटेच त्या गोळ्याला मातीत पुरवून टाकायला निघालेले असत. ना कुणी नातेवाईक ना कोणी मित्र. माणूसकी म्हणून गल्लीतलेच न सांगता कुणी त्यांच्याबरोबर जात असत आणि घरात अत्यंत कळाहीन अवस्थेत जयवंतीण बाई चा आक्रोश चालायाचा. माझी आजी ब्रांडीची बाटली घेऊन तिच्या घरात जायची, तिच्या हातापायांना त्याही अवस्थेत चोळत राहायची तिच्या पांढऱ्या फट्टक चेहऱ्यावर मायेने गोंजारून तिचं डोंगराएवढं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करायची. कुणाच्या दुःखाला कसं मायेनं गोंजारावं हा संस्कार आजीच्या या लहानशा कृतीतून नकळतच रुजला.

अशाच एका असफल बाळंतपणातच जयवंत बाईचा शेवट झाला आणि गल्लीतला दरवर्षी घडणारा दुःखद अध्याय कायमचा संपला. जयवंत नंतर कुठे गेले, त्यांचं काय झालं याची खबरबात गल्लीने कधीच घेतली नाही. एका अंधाऱ्या, चैतन्यहीन, बोडक्या, एक खणी घराला कायमचं एक कुलूप लागलं.

या घटनेच्या अशा धूसर रेषा माझ्या स्मरणात आजही आहेत. हे अत्यंत वेदनादायी दृश्य काळाबरोबर वाहून गेलंही असेल पण त्या दृश्याचे मनावर झालेले परिणाम कधीकधी वेगळ्या स्वरूपात आजही जाणवतात. जगताना माणसाच्या जाणिवा जेव्हा प्रगल्भ होतात ना तेव्हा मनावर उमटलेले हे पुसट ठसे पुन्हा पुन्हा दृश्यरूप होतात.

आता माझ्या मनात विचार येतो जयवंतीणबाई वांझोटी कशी ? ती जन्मदा तर होतीच ना ? दुर्दैवाने तिची कूस भरली नाही त्यात तिचा काय दोष ? त्यावेळी विज्ञान इतकं प्रगत नव्हतं का की समाजाचं प्रबोधन कमी पडलं? जयवंतीणबाई बरोबर जे घडत होतं त्याभोवती अंधश्रद्धेचे विचार प्रवाह ही वेढा घालून असावेत. विज्ञानाचे कुंपण तिथे नव्हतं. डीएनए, क्रोमोझोम्स, निगेटिव्ह रक्तगटांचे ज्ञान नव्हतं किंवा अशा प्रगत विचारांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने पायऱ्याच बांधल्या नव्हत्या का ? अशावेळी जयवंतीणबाई माझ्या नजरेसमोर प्रातिनिधिक स्वरूपात उभी राहते. आज व्यंधत्वावर मात करणारी प्रचंड प्रगत वैज्ञानिक तंत्रे उपलब्ध आहेत. ज्ञान आणि जागरूकता यांची सांगड सकारात्मक दृष्टिकोनातून घातली जात आहे. थोडं विषयांतर करून मला इथे हेही नमूद करावसं वाटतं की माझ्या परिचयातल्या, नात्यातल्या, माझ्या काही मैत्रिणींनी मूल न झाल्याचं दुःख न बाळगता अनाथ मुलांचं मातृत्व आनंदाने स्वीकारलेलं आहे. आयुष्यातल्या उणिवा भरून काढताना एक उदार समाजदृष्टिकोनही त्यांनी जपला आहे. मला त्यांचा अत्यंत अभिमान वाटतो आणि आज अशा भावना निर्माण होण्यामागे किंवा अशी मानसिकता तयार होण्यामागे न कळत्या वयात न समजलेलं जयवंतीणबाईचं दुःख कुठेतरी अजूनही ओलं आहे असं वाटतं आणि पुन्हा यातना होतात जेव्हा आजही कधी “वांझोटी” हा शब्द कानावर पडला तर.

एकाच वेळी समाज सुधारलाय असे म्हणताना भाषेतून अशा गलिच्छ उपहासात्मक, दुसर्‍याच्या भावनांची बूज न राखणार्‍या शब्दांची कायम स्वरूपात हकालपट्टी का होत नाही याचाही खेद वाटतो. आणखी एक अपराधीपणाचा सल आहे.

का कोणीच जयवंतीणबाईच्या दुःखापर्यंत पोहोचू शकले नाही ? आम्ही गल्लीतली मुले तिला जयवंतीणबाई असेच म्हणायचो. आमच्यापैकी एकाने तरी तिला जयवंत आई किंवा जयवंताई म्हणून हाक मारली असती तर ..कदाचित त्या कोमेजल्या रोपाची पाण्यासाठीची तहान किंचित तरी भागली असती का ? आज तो सल आहे— आम्ही हे का केलं नाहीv?

क्रमशः भाग सहावा. 

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments