सौ. सुनीता पाटणकर
मनमंजुषेतून
☆ आश्वस्त प्रेम… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
सकाळी घरातलं आटपून कामावर निघाली आणि तिच्या चप्पलचा अंगठा तुटला. बाहेर पावसाची रीपरीप चालूच होती. खड्ड्यातल्या रस्त्यातून, चिखलातून चालत कामाच्या ठिकाणी पोहोचायचं, म्हणजे एक कसरतच !!
आज थोडा उशीर झालेला, म्हणून ती चप्पल सोडून अनवाणीच झपाझपा चालत सुटली. कामावर तिच्या दोन मैत्रीणी आजारी आणि दोघी घरच्या शेतात भाताची पेरणी या कारणांनी गैरहजर. मग आज आपण वेळेत जायलाच हवं, ही ओढ ! बेफिकिरीने वागू शकली असती, पण स्वभावात ती नव्हती. कामावरची मालकीण खूप चांगली, प्रेमाने, आपुलकीने वागणारी, रागावली तरी तितकीच समजून घेणारी. तिलाही वाटायचं एरवी कधीतरी चालेलं, पण आज कामही खूप आहे, आपण पाच सहा जणीचं आहोत, तर वेळेवर पोहोचायलाच पाहिजे. असा विचार घोळवतचं कामावर येऊन कामाला लागली.
दोन तासांनी तिचे यजमान आले. काय झालं? अचानक का आले?तिलाही घरी न्यायला आले की काय? काय घडलं असेलं?नाना शंका मनात घेऊन, मालकीण सहजचं दरवाज्या जवळ गेली.
ती म्हणत होती, “तुम्ही कशाला घेऊन आलात?”ते म्हणाले, “अग! तुझ्या पाठोपाठ मी बी कामावर निघालो, बगीतलं तर तुज्या चपला दारात पडल्येल्या. पायलं तर अंगठा तुटल्याला. जीव कळवळला माजा. मंग अंगठा शिवून घ्यून आलो. “
हे प्रेम, वात्सल्य, कळवळा, समज बघून डोळे पाणावले.
© सौ. सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈