सौ. राधिका (माजगांवकर) पंडित 

? मनमंजुषेतून ?

☆ नववधू प्रिया मी बावरते — ☆ सौ. राधिका (माजगांवकर) पंडित

श्रावण धारा कोसळत होत्या अंगणात ऊन पावसाचा खेळ सुरु होता, तर माझ्या मनात त्या मंगळागौरीच्या आठवणींचा फेर चालू होता.

त्याचं असं झालं, भाऊजींचं लग्न झालं आणि जावेच्या रुपानें मैत्रीण म्हणून बिल्वा आमच्या घरांत आली. पहिला वहिला सण आला मंगळागौरीचा. भाऊजींची आणि बिल्वाची नव्याची नवलाई अजून ताजी, साजरी, गोजरी आणि लाजरी अशी टवटवीत होती. चोरटे स्पर्श, कुठं बिल्वाची लांबसडक वेणी ओढ, तर कधी पाणी उडव: असे चोरटे क्षण ते  दोघेजण लाजून साजून साजरे  करत होते.

सौ. बिल्वा खूप साधी आणि मुलखाची लाजाळू होती. सासु- सासरे समोर असले की ही नवऱ्याच्या वाऱ्याला ही उभी राहात नसे. भाऊजींना चहा देतांना सुद्धा या लाजाळू  झाडाच्या पापण्या खाली झुकलेल्याच असायच्या. तिचं म्हणणं “वडिलधाऱ्यां समोर बरं दिसतं कां हे असले अल्लड अवखळ वागणं ?”

तर अश्या या बिल्वाची, माझ्या जावेची पहिली मंगळागौर होती. दोन्ही घरचे पाहुणे उपस्थित झाले होते. हिरव्यागार शालूमध्ये ठसठशीत दागिन्यांमध्ये आमची ही नववधु चौरंगावरच्या मंगळागौरीइतकीच सजली होती. अतिशय सुंदर दिसणाऱ्या आपल्या बायकोकडे भाऊजींची नजर पुन्हा पुन्हा वळत होती. भाऊजींच्या खाणाखुणांना दाद न देता या बाईसाहेब त्यांना नजरेनीच दटावत होत्या.

दिवसभराचा कार्यक्रम संपला. आता आली झिम्मा फुगडी खेळण्याची वेळ. तेव्हा मात्र हे लाजाळूचं झाड संकोच सोडून अवखळ वारं झालं होतं.

सगळ्यांबरोबर सगळे खेळ अगदी दणक्यात, अगदी देहभान विसरून खेळले गेले. तिची ती भरारा फुगडी बघून कुणी तरी म्हणालं, “चल बाकीचें राहूदे, आता तुझ्या नवऱ्याला गरागरा फिरव. “

“इश्य !”असं म्हणून पळायच्या बेतात होत्या बाईसाहेब. पण भाऊजींनी मात्र हात धरून तिला मैदानातच आणलन. सभोवती आम्ही लगेच फेर धरला आणि ओरडलो, “भाऊजी सोडू नका हं हिला. ” आणि मग काय भाऊजींना तेच तर पाहिजे होते.

बोलताबोलता पायांचा ताल आणि फुगडीचा वेग यांनी सूर धरला. मग रिंगणांत नवराबायकोची फुगडी चांगलीच रंगली. अगदी दणदण दणक्यात.

कशी कोण जाणे, बिल्वाला एकदम भोंवळ आली आणि ती भाउजींच्या अंगावर कोसळली. त्यांनी तिला सावरलं.

बराच वेळ झाला, ती दोघं दूर होईनांत. आम्हाला वाटलं भाऊजी तिला सोडत नव्हते म्हणजे मस्करीच चाललीय.

मध्येच कुणीतरी वडिलधारं ओरडलं, “अरे तिला चक्कर आली असेल. खाली बसवा  तिला हात धरून. कुणीतरी पाणी आणा रे लवकर. “

खाली बसायच्या ऐवजी बिल्वाने तर डोळेच मिटून घेतले. होते. आणि भाऊजींचा चेहरा अगदी फोटो काढण्यासारखा झालेला होता.

हा काय प्रकार आहे बाई । कुणाला काहींच कळेना, आणि ते दोघे तर जागचेही हलेनात. अखेर भाऊजींच्या खट्याळ मेव्हणीच्या लक्षांत सारा प्रकार आला. पुढे होऊन जिजाजींच्या शर्टच्या बटणामधून सौ. ताईची नाजुक केसांची बट तिनें नाजुकपणे सोडवली आणि म्हणाली. ” जिजाजी, पुढच्या मंगळागौरीला बटणांऐवजी हुक असलेला शर्ट घाला, म्हणजे सगळ्यांसमोर नेहमी नेहमी असा सिनेमा घडायला नको. ” 

सगळे गडगडाटी हसले. नुसता टाळ्यांचा, हास्याचा धबधबाच जणू काही कोसळला. आणि बिल्वा !! ती तर गालावर गुलाब फुलवून केव्हाच आत पळाली होती.

…. तर मंडळी अशी फुलली ही आमच्या घरातील बिल्वा-भाऊजींची पहिली वहिली मंगळागौर.

© सौ. सौ. राधिका गोपीनाथ (माजगांवकर) पंडित

पुणे

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments