डॉ अभिजीत सोनवणे

© doctorforbeggars 

??

☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ बीज अंकुरे अंकुरे – भाग – १ ☆ डॉ अभिजीत सोनवणे

माझं सर्व बालपण सातारा जिल्ह्यातल्या म्हसवड नावाच्या छोट्याशा खेडेगावात आजीच्या सहवासात गेलं.

इथे घडलेल्या गमती – जमती, कथा – व्यथा आणि माझ्यावर झालेले भले – बुरे परिणाम; हे सर्व मी माझ्या पुस्तकात काहीही न लपवता मांडलं आहे.

माझ्या आजीचं नाव लक्ष्मीबाई… !

नावाप्रमाणेच ती होती. कपाळावर जुन्या रुपयाच्या कॉइन एवढं भलं मोठं कुंकू, नाकात बांगडीला लाजवेल एवढी मोठी नथ, काठापदराचं लुगडं घालून ती अशी चालायची; जसा राज घराण्यातला हत्ती निघाला आहे… ! म्हणायला अशिक्षित, पण व्यवहार चातुर्य PHD झालेल्या माणसाला लाजवेल असं…

तोंडानं फटकळ, पण मायेचा जिवंत झरा हृदयात घेऊन फिरायची… गावात जबरदस्त दरारा… ! 

एके दिवशी तिकडे तिचे वडील वारले आणि इकडे माझा जन्म झाला…

त्यावेळच्या भाबड्या कल्पनेनुसार, एका माऊलीने तिला सांगितले, ‘आगं लक्साबया… रडु नगो बाये, पांडुरंगाचे पोटी तुजा बापच जलमाला आलाय… !’ … पांडुरंग माझ्या वडिलांचे नाव… ! 

झालं, तेव्हापासून माझी आजी मला तिचा बापच समजायला लागली, आणि तेव्हापासून माझे विशेष लाड आणि कोड कौतुक सुरू झालं.

अख्खा गाव तिला मामी म्हणायचा, तिला घाबरायचा…. पण तिच्या प्रेमाने लाडावलेला मी तिला लहानपणी “ए लक्षे” म्हणून हाक मारायचो…. आजीचे वडील तिला याच नावानं हाक मारायचे, नातू पण त्याच नावाने हाक मारतो, म्हणजे खरोखरच आपला बापच नातवाच्या रूपाने जन्माला आला आहे, यावर आता शिक्कामोर्तब झालं… ! 

तिचा “बाप” असण्याचा, मग पुढे मी पुरेपूर फायदा घेतला.

करारी आणि कठोर बाई हि, परंतु कोणत्याही गरिबाच्या अडल्या नडल्या मदतीला ही सर्वात प्रथम पुढे येई.

सर्वांनाच हिच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. गावातल्या श्रीमंतापासून ते गरिबातल्या गरीब घरापर्यंत कोणाच्याही घरात ती डायरेक्ट घुसायची… घरात जिथे उंच जागा सापडेल तिथे ती पायावर पाय टाकून बसायची…. आणि इकडे तिकडे पहात, पदराची दोन टोकं हाताच्या चिमटीत पकडत, स्वतःला वारा घालत, घरातल्या लोकांची हजामत करायची.

हतरून पांगरून आजुन काडली न्हाईत ? 

शेळ्याच्या लेंड्याच हित पडल्यात…

घरच नीट सारवलं न्हायी…

गाई म्हशीचं श्यान उचलायला का तुजा बा येणार हाय का ए… ? 

सुना म्हशीवानी खाऊन फुगल्यात…

ए टवळे डोक्याला त्याल लाव कि…. का तमाशात नाचायला जायचं हाय ? 

डोक्यावर पदुर घ्यायला तुज्या आईनं शिकावलं न्हाय का तुला, व्हय गं ए उंडगे… !

इतभर गजरा आणि गावभर नखरा…

……. तिची टकळी चालू असायची… तिच्या तावडीतून कुणीच सुटायचं नाही. येणारा जाणारा प्रत्येक जण तिची नजर चुकवून जायचा… ! 

यावेळी मी तिचा पदर धरून, डाव्या हाताने चड्डी सावरत शर्टाच्या उजव्या बाहीला शेंबूड पुसत सर्व काही पहात असे. चड्डी माझ्या मापाची मला कधीच मिळाली नाही.

‘ थोडी मोटी दे… वाडतं वय हाय… अजून मोटी दे…. हांग आशी… ‘ म्हणत दुकानदाराला माझ्या चड्डीची ऑर्डर आजीच द्यायची…

डावा हात हा फक्त चड्डी सांभाळण्यासाठी असतो आणि उजवा हात शेंबूड पुसण्यासाठी… त्या वयात हाताचे इतकेच उपयोग मला माहित होते.

तर सर्व उणीदुनी काढून झाल्यानंतर, पदरानं घाम पुसत, म्हातारी बिनदिक्कतपणे त्या घरात ऑर्डर सोडायची… ए टवळे, च्या टाक जरा मला… तुमाला आक्कल शिकवून दमले बया मी, तुमच्यापेक्षा गाडव बरं… वर तीच कांगावा करायची… ! 

चहा येईपर्यंत, माझी नाकाची फुरफुर चालूच असायची…

समद्या गावाचा शेंबूड तुलाच आलाय का काय मुडद्या ? असं म्हणत वैतागून उठत; ती मला दरा दरा ओढत घराबाहेर नेत, माझं नाक पदरात धरून असं शिंकरायची, की मृत्यु परवडला…. ! 

अजून थोडा जोर लावला असता, तर तीने माझा मेंदूच बाहेर काढला असता…

तुजं आसं हाय, शेंबूड आपल्या नाकाला, आन् रुमाल देतंय लोकाला… असं स्वतःशी पुटपुटत, मला कडेवर घेऊन ती परत घरात यायची.

यानंतर कान नसलेल्या, फुटक्या कपात, किंवा चार ठिकाणी चेंबलेल्या फुलपात्रात चहा यायचा. बऱ्याच वेळा जर्मन च्या “भगुल्यात” च्या यायचा… बशी नसली तर… आम्ही मग हा “च्या” गोल ताटात भरून भुरके मारत प्यायचो… आज जाणवतं, हा खऱ्या अर्थाने सोहळा होता… !!! 

….. आता कुठे आहे हे फुलपात्र ? ते जर्मनचं भांडं आणि तो कान नसलेला फुटका कप ??? 

 मी शोधतोय… ! आईच पत्र हरवलं… हा खेळ आम्ही लहानपणी खेळायचो, हे फुलपात्र… ते जर्मनचं भांडं आणि कान नसलेला फुटका कप सुद्धा तसाच हरवलाय… ! 

माणसं शिकत गेली आणि या जुन्या गोष्टी पुस्तकाच्या पानात दबून गेल्या… आठवण म्हणून ठेवलेल्या पिंपळाच्या जाळीदार पानासारख्या… ! 

आता या गोष्टी दिसतात फक्त जुन्या बाजाराच्या दुकानात… नाहीतर, चेहऱ्यावर सुरकुत्यांची जाळी घेऊन, अंताकडे वाटचाल करणाऱ्या म्हाताऱ्या माणसांच्या मनात… !!!

तर; बऱ्याच वेळा फुलपात्रातून किंवा फुटलेल्या कपातून, बशीत चहा सांडेस्तोवर दिला जायचा…

फुलपात्र आणि कप सोडून बशी सुद्धा चहानं भरलेली असायची… ! डाव्या हाताने चड्डी, उजव्या हाताने नाक सांभाळताना…. मला चहा प्यायलाच जमायचं नाही, मग माझी म्हातारी एक घोट स्वतः प्यायची, एक घोट मला पाजायची… ! हा चहा पिताना, माझ्या घशातून घुटुक घुटुक आवाज येत असावा… मला माहित नाही. पण यातही माझ्या आजीला कौतुक…

‘ बगा गं बायांनो, “माजा बाप” कसा घुटुक घुटुक च्या पितो, तुमाला दावते… ‘ म्हणत ती अजून चार फुलपात्रे नाक दाबून मला चहा पाजायची…

पुढे डोक्यावरून पाणी गेलं…

रडत खडत शिकलो…. त्यानंतर मोठ्या मुश्किलीने डॉक्टर झालो… पुढच्या खाचखळग्यातून वाटा काढत चालत राहिलो… आयुष्यातली सगळी पानीपते हरलो… तरीही पुढे कष्ट करून मनातला “विश्वासराव” जिवंत ठेवला… ! 

आयुष्याच्या एका टप्प्यावर आंतरराष्ट्रीय संस्थेत कामाला लागलो… आर्थिक स्थैर्य आलं. मग अनेक उच्चभ्रू लोकांशी / ऑफिसशी संपर्क येऊ लागला. सुरुवातीला… “खेड्यातनं आलंय येडं, आन भज्याला म्हनतंय पेडं…. ” अशी माझी अवस्था होती. खेड्यातला येडा मी…. तिथले मॅनर्स आणि एटिकेट्स शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. चकचकीत आणि महागड्या कपांमध्ये चहा मिळू लागला… भल्या मोठ्या कपामध्ये / मगमध्ये सांडणार नाही, अशा पद्धतीने निम्माच चहा किंवा कॉफी असायची… ! 

पुढे मी सरावलो…

एकदा हि माझी खडूस म्हातारी… बऱ्याच वर्षांनी माझ्या घरी आली….

आंतरराष्ट्रीय संस्थेतील महाराष्ट्राचा प्रमुख मी….

तिला एका मोठ्या पांढऱ्या स्वच्छ कपामध्ये मी तिला चहा दिला…

कपाला सोन्याचीच वाटावी, अशी सोनेरी रंगाची नक्षी होती…

शिकलेले मॅनर्स सांभाळत, भल्या मोठ्या कपामध्ये; सांडणार नाही अशा पद्धतीने तिला निम्मा चहा दिला होता. विहिरीत वाकून बघावं, तसं तीनं कपात वाकून बघितलं… कपातला अर्धा चहा बघून ती खवळली…. तिच्या स्वभावानुसार ती बोलली…. ‘येवडासा च्या ? ल्हान पोरगं हेच्यापेक्षा जास्त मुततंय… तू कंनच्या कंपनीत काम करतूय रं… ? सायबाला म्हणावं पाच धा रुपय पगार जास्त दे… घरात आलेल्या पावण्यांना कप भरून च्या पाजू दे… !’

पाच लाख रुपये दरमहा कमावणाऱ्या माझ्यासारख्या माणसाच्या तोंडात माझ्याच म्हातारीने सणसणीत चपराक हाणली. मलाही राग आला, गावाकडे चेंबलेल्या फुलपात्रात आणि फुटक्या कपात च्या पिणारी माजी म्हातारी, आज इतक्या मोठ्या, सुंदर सोनेरी नक्षीच्या कपात चहा पीत आहे, नातवाचं हिला काहीच कौतुक नाही… ??? मी तिला हे बोलून दाखवलं.

यावर जोरदार पलटवार करत म्हातारी म्हणाली, ‘ गप ए शेंबड्या… तूजा कप किती छोटा हाय, का मोटा हाय…. त्याला सोन्याची का चांदीची नक्षी हाय, त्याला किंमत नसती… या कपातून तू काय देतू, किती देतू, कोनच्या भावनेनं देतू त्याला जास्त किंमत आसती… !’ 

आंतरराष्ट्रीय संस्थेमध्ये दरवर्षी “मॅनेजमेंट” या विषयावर किमान चार सेमिनार असतात… असे मागील दहा वर्षात मिळून मी 40 सेमिनार अटेंड केले असतील… तू काय देतो, किती देतो, कोणत्या भावनेनं देतो त्याला जास्त किंमत असते… ! सेमिनार मध्ये किती कळलं मला माहित नाही… पण माझ्या म्हातारीने दोन मिनिटात मॅनेजमेंटचं सर्व सार सांगितलं… ! हातातला कप माझ्या हातातच राहिला… तिच्याकडे भारावून मी पाहत राहिलो… “कपावरची” सोनेरी नक्षी आता तिच्या “कपाळावर” उमटलेली मला भासली… !!! 

गोष्ट तशी छोटी पण लाखमोलाची… !!!

— क्रमशः भाग पहिला   

© डॉ अभिजित सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे

मो : 9822267357  ईमेल :  [email protected],

वेबसाइट :  www.sohamtrust.com  

Facebook : SOHAM TRUST

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments