सौ. अमृता देशपांडे

 ☆ मनमंजुषेतून ☆ बालपणीच्या आठवणी…माझे बालपण भाग- 6 – खजिना ☆ सौ. अमृता देशपांडे ☆ 

अशी व्याख्याने, मूल्याधिष्टित कार्यक्रमांना आम्हां मुलांना घेऊन जाणे, आपल्या संस्कृतीची  ओळख करून देणे ह्या बाबतीत आईबाबा नेहमीच सतर्क होते.

विद्यापीठ हायस्कूलच्या ग्राउंडवर राष्ट्र सेविका समितीच्या पूज्य लक्ष्मीबाई केळकर ऊर्फ मावशी यांची रामायणावर प्रवचने होती. ती पण रात्रीचीच.   विद्यापीठ हायस्कूल घरापासून खूपच लांब होतं. चालतच जावं-यावं लागणार होतं. सहदेव म्हणून हाॅस्पिटलचेच  एक कर्मचारी,  त्यांना विनंती करून आईने त्यांना व त्यांच्या पत्नीला सोबतीला बरोबर घेतले.

वंदनीय मावशी यांची वाणी झुळुझुळु वहाणारं गंगेचं पाणी.  शांत चेहरा, शांत बोलणं, स्पष्ट उच्चार, जमिनीवर आसनावर पालथी मांडी घालून बसलेल्या, शुभ्र नऊवारी लुगडे, दोन्ही खांद्यावरून पदर घेतलेला, शुभ्र रूपेरी केस, नितळ गौरवर्ण.

रोज प्रवचनाच्या सुरवातीला प्रार्थना केली जात होती.

“ही राम नाम नौका भवसागरी तराया

मद, मोह, लोभ सुसरी, किती डंख ते विषारी

ते दुःख शांतवाया मांत्रिक रामराया ।।

सुटले अफाट वारे मनतारू त्यात विखरे

त्या वादळातुनिया येईल रामराया ।।

भव भोव-यात अडली नौका परि न बुडली

धरुनी सुकाणु हाती बसलेत रामराया ।।

आम्ही सर्व ही प्रवासी जाणार दूरदेशी

तो मार्ग दाखवाया अधिकारी रामराया ।।

प्रभु ही तुझीच मूर्ती चित्ती सदा ठसू दे

मनमानसी या कृपा तुझी असू दे ।।

एकदा बोलायला सुरुवात केली की ऐकताना दीड तास कधी संपला कळतच नसे. अफाट जनसमुदाय,  pin drop silence.

व्यासपीठावर प्रभु रामचंद्रांचा हार घातलेला ‘ पंचायतन’ फोटो. उदबत्तीचा वातावरणात भरून राहिलेला दरवळ आणि मावशींचं ओघवतं, निर्मळ वक्तृत्व.  सग्गळा परिसर रामनामाने भारलेला असे.

प्रवचनात रामायणातल्या व्यक्तिंची,  त्यांच्या स्वभावांची , वर्तणुकीची आणि घडलेल्या घटनांची गोष्टीरूप ओळख करून देताना,  मावशी जीवनातल्या प्रत्येकाच्या जबाबदारी पेलण्याचे, वागण्याचे,विचारांचे स्वरूप कसे असावे यावरही बोलत असत. त्यावेळी हे सर्व कळण्याचं आमचं वय नव्हतं. खूपसं कळायचं नाही. राष्ट्रसेविका समितीचे कार्य हे व्यक्ती आणि कुटुंबापासून देशसेवेपर्यंत व्यापलेले होते. हे कार्य करताना व्यक्तिविकास, कुटुंबातली प्रत्येकाची कर्तव्ये आणि समाजातला आपला वावर हा देशसेवेसाठीच असला पाहिजे,  हे शिकवणारे.

राजूनं,  माझ्या भावानं  या संदर्भातली एक आठवण सांगितली.  एकदा प्रवचनाच्या आधी आई मावशींना भेटायला गेली. मी बरोबर होतो. आईनं विचारलं,  मावशी,  मी कशाप्रकारे देशसेवा करू शकते? त्यावर मावशी म्हणाल्या,  तू घरचं सगळं सांभाळतेस, पतीला योग्य सहकार्य देतेस, भविष्य काळातली चार आयुष्ये घडवते आहेस, हेच निष्ठेने करत रहा, हीच देशसेवा.

त्या दिवशीच्या प्रवचनात मावशींनी हाच विचार उलगडून दाखवला.  प्रत्येकाने आपले कर्तव्य निष्ठेने,  आपुलकीने आणि जबाबदारी ने करणे, हीच रामायणाची शिकवण आहे.

काही वर्षानंतर, राष्ट्र सेविका समितीच्या शिबिरात माझे व माझ्या बहिणीचे नाव आईने नोंदवले. 21 दिवसाच्या शिबिरात स्वावलंबन, स्वसंरक्षण, देशाभिमान, अशा अनेक मूल्यांवर आधारित बौद्धिके, खेळ, आणि परस्पर संवाद यातून व्यक्तिमत्व विकास घडवण्याचे  संस्कार नकळत आमच्यात रुजले.  खरंतर हे त्यावेळी कळले नाही, पण पुढे अनेक प्रसंगात आपोआप बुध्दी तसाच विचार करू लागली. हळूहळू खरेपणा  आयुष्यात किती महत्त्वपूर्ण आहे, ह्याची जाणीव झाली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे तडफदार, अभिमान वाटावा असं व्यक्तिमत्व.  जणु दुसरे शिवराय अशी देहयष्टी,  पेहराव, दाढी, डोळ्यांत तीच चमक आणि अस्खलित वाणी.

तर मावशी अतिशय नम्र, आणि केवळ आदर करावा अशा. माया, ममता, प्रेम हे सगळे शब्द एकाठिकाणी सामावलेलं व्यक्तिमत्व. शिस्त आणि करारीपणा ही त्यांची दुसरी बाजू.

श्रोत्यांवर नकळत संस्कार घडत होते. व्याख्याने,  प्रवचने ऐकून दुस-या दिवशी त्यावर गप्पा मारत जेवणे, हा आमचा आवडता छंद म्हणा किंवा काही, पण त्यावर बोलायला आवडायचे. कधी कधी न समजलेलं आई समजून सांगायची. त्यावेळी ह्याचं मोठंसं महत्व जाणवलं नाही. ते सहजरित्या होत होतं.

पुढे आयुष्यात कळलं की ते किती छान आणि महत्वाचं होतं.

बालपणीच्या आठवणी लिहिता लिहिता परत लहान झाल्यासारखे वाटले.

खरंच किती सुंदर असतं नाही बालपण! आई बाबा,  बहीण भाऊ, , छोटंसं जग. इथे स्पर्धा नाही, स्वार्थ नाही, राग नाही.

“या बालांनो या रे या” कवितेतली खरी

“सुंदर ती दुसरी दुनिया”

“बचपन के दिन भी क्या दिन थे”

“उडते बन की  तितली”

समाप्त

© सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments