प्रा. भरत खैरकर

परिचय

शिक्षण : DME, AMIE, Diploma in Design.

जन्मतारीख: ७/८/७२

साहित्य:- कथा, कविता, ललित लेख, स्तंभ लेखन महाराष्ट्रातील नावाजलेल्या दैनिक, दिवाळी अंक आदीमधून.. आकाशवाणी नागपूर, युवावाणी, दैनिक सकाळ, लोकमत, तरूण भारत, मटा,जनवाद, लोकसत्ता, लोकशाही वार्ता, नावाजलेल्या विविध दिवाळी अंकासाठी लिखाण…

साहित्य पुरस्कार:-  शब्दवर्षा, तेल्हारा, अकोला, कालिदास पुरस्कार, वर्धा, काव्य साधना , भुसावळ, उ.रा.गिरी. अमरावती असे लिखाणासाठी पुरस्कार

संपादन:- (१) इंद्रायणी काठी… कवितेसाठी.. त्रैमासिक (२) आशा दिवाळी अंक (३) अभियान वार्षिकांक

? मनमंजुषेतून ?

☆ “सोन्याची पानं, बॅडमिंटन आणि खिचडी…” ☆ प्रा. भरत खैरकर 

३० x ९ x६ =१६२० दिवस! निकेतनात घालविलेले हे दिवस.. तब्बल एक हजार सहाशे वीस जवळपास.. ह्यातल्या एका एका दिवसाविषयी लिहायचं म्हटलं तर एकूण एक दिवसच खूप खूप लिहीण्याजोगा.. प्रत्येक दिवस कधी मित्रांचा.. कधी शिक्षकांचा. कधी कर्मचाऱ्यांचा.. तर कधी एकूणच सर्वांचा. असा असायचा.

निकेतनात व्यक्तिशः असा अनुभव फार कमी यायचा.. त्यात ग्रुप सामील असायचाच.. निदान दोघे तिघे तरी असायचेच.. एकाटं दुकाटं उनाड पोर इथे मिळणं कठीणच..! जोडी जोडीने बऱ्याचश्या जोड्या होत्या. आठवण परस बागेतली असो.. हॉलमधली असो.. एनसीसी मधली असो… स्काऊट मधली असो किंवा वर्गामधली.. नाहीतर मेस मधली. असे एक ना अनेक दिवस आणि आठवणींनी निकेतन अंगात संचारतं त्यातलेच हे तीन दिवस…

बहुदा माझ्या सातवीतला तो दसरा असावा. विद्यानिकेतनात सर्व मुलांची दसरा मैदानावर कार्यक्रम बघायला जाण्याची गडबड चालली होती. मी मात्र कुठल्याशा आजाराने फणफणलो होतो. डोळ्यावर गुंगी होती. रूम बाहेर चाललेली मुलांची लगबग मला कळायची.. पण उठवेना आणि काही त्राणच माझ्या अंगात नव्हते. हळूहळू सर्व कोलाहल शांत झाला( की मला झोप लागली होती!) नक्की सांगता येत नाही! रात्री सात आठ वाजता चांगला दरदरून घाम फुटला.. जाग आली.. तेव्हा सर्व हॉस्टेल सामसूम झालं होतं. कर्मचारीही लवकर जेवण आटोपून बाहेर गेले असावे कारण दसरा असल्याने आपापल्या घरी नातेवाईकांसह सण साजरा करीत होते बहुदा..

मला खूप एकटं-एकटं वाटत होतं. घरची खूप आठवण येत होती. आपण आता घरी असायला पाहिजे होतं. ह्या विचारानं स्पुंदून स्पुंदून मी रडत होतो. ऐकायला कोणीच नव्हतं. किती वेळ रडलो माहिती नाही.. मग खूप खूप गाढ झोपलो. तर सकाळ झाली होती.. तेव्हा माझ्या अंथरुणावर चांगली अर्धा टोपली भरेल एवढी सोन्याची पानं म्हणजे आपट्याची पानं होती.. रात्री बहुदा एकटा एकटा असलेल्या मला माझे एवढे सवंगडी, एवढे नातेवाईक कधी भेटून गेले कळलंच नाही!! रात्री दसरा मैदानाहून परतल्यावर मित्रांनी, शिक्षकांनी, आठवणीने मी झोपलो असतानाच दिलेल्या शुभेच्छा.. नंतरच्या कितीतरी दसऱ्यांमध्ये मला मिळाल्या नाहीत. ती रात्र.. ती सोन्याची पानं.. अजूनही दर दसऱ्याला मला, बायकोला, मुलाला माझ्या होस्टेलची आठवण करून देतात..

असाच एक दिवस सकाळी सकाळी पिटी आटपून आलो.. तर नेहमीप्रमाणे नंदकिशोर आणि विकास मधल्या चौकात बॅडमिंटन खेळत होते. कां कुणास ठाऊक या खेळाचे एक अनामिक आकर्षण मला पूर्वीपासूनच आहे.

मला हे ठाऊक नव्हतं की ह्या दोघांनी आपापल्या पैशाने ती रॅकेट अन फुल( शटल कॉक) आणलेलं म्हणून! मला वाटायचं की स्पेशल ह्यांनाच कसं खेळायला देतात.. ?? वगैरे.

खूप दिवसाचा तो खेळ खेळायचा म्हणून मी चंग बांधला होता. पण दुसरा पार्टनर हवा ना! कारण आम्हांला दोघांचीही रॅकेट हिसकावून गेम खेळायचा होता. एकाची हिसकावून चालणार नाही कारण दुसरा मग खेळणारच नाही. आता काय करायचं? दुसरा एवढा  ‘प्याशीनेट’ गडी शोधायचा कुठे? म्हटलं अजून नको वेळ घालवायला.. मधल्या चौकात जाऊन सरळ सरळ नंदकिशोर जवळून जवळपास मी रॅकेट हिसकावली.. तो लहान जीव.. लागला त्याच्या परीने विरोध करायला.. !! मी इकडे विकासला ” अरे, चल टाक सर्विस.. ” म्हणून एकदम रंगात आलो होतो.. शटल कॉक मागे नंदकिशोर इकडून तिकडे धावत होता.. मला गंमत वाटायची.. पण ही सगळी गंमत आमचे सर कुठून तरी बघत होते.. मला कळलं नाही ! मी आपला गुंग होतो. इतर सीनियर मुलही सरांच्या मागे मागे हळूहळू पुढे होणाऱ्या मनोरंजनाची वाट बघत होते.

सर दबक्या पावलांनी आले. त्यांनी माझी मानगुट पकडली आणि सपकन ‘व्हीसल कॉड ‘माझ्या पोट-यांवर उमटविला.!! आकाशात उडालेलं फुल आता ताऱ्यांमध्ये रूपांतरित झालं होतं! दुसरा ‘व्हीसल कॉड ‘ बसेस्तोवर.. प्रकरण काय आहे.. ते माझ्या ध्यानात आलं होतं. म्हटलं “नाही सर, नाही.. आता नाही करणार. “

“लहान मुलांना त्रास देतोस त्यांची वस्तू आणि त्यांनाच मारतोस.. ” वगैरे.. वगैरे.. पुढचं काही आठवत नाही.

पण बॅडमिंटनचे फुल आजही सकाळी बायकोसह बॅडमिंटन खेळताना निकेतनाची आठवण करून देत आणि सांगतं आपल्याच वस्तूवर हक्क सांगा.. दुसऱ्यांच्या नाही.. हवी असल्यास ती कष्टाने मिळवा.. ओरबाडू नका..

मोझरी… राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गाव… ह्या गावापासून साधारण तीन-चार किलोमीटर अंतरावर  “दास टेकडी” आहे. त्या दासटेकडीच्या पायथ्याला दरवर्षी अमरावती जिल्हा स्काऊट गाईड आणि एनसीसीचे कॅम्प त्याकाळी भरायचे..

सन १९८६ ची घटना असावी.. आम्ही सर्व ‘ शिवाजी पथक ‘ नावाने स्काऊट गाईड कॅम्पला सरांच्या मार्गदर्शनाखाली मोझरीला गेलो होतो.. तिथे दास टेकडीच्या पायथ्याला आम्हांला दिलेल्या जागेवर एक चौकोनी आकाराची जागा स्वच्छ करून आम्ही आमचा तंबू उभारला होता.. तंबूभोवती कुठल्याही प्रकारचा सरपटणारा प्राणी येऊ नये, म्हणून खोल खड्डा करून घेतला होता..

दुसऱ्या दिवशी सकाळी आमच्या ग्रुप मधील आठपैकी सहा जणांसह सर कुठल्यातरी ऍक्टिव्हिटी मध्ये भाग घ्यायला गेले होते. मी आणि सोहेल या दोघांकडे त्यादिवशी स्वयंपाकाची जबाबदारी होती. आम्ही दोघेही स्वयंपाकात तसे हुशारच(!).. मग करायचं काय? तर खिचडी करायचं ठरलं… तर पाणी एवढं टाकलं गेलं की खिचडी काही केल्या घट्ट होईना.. पाणी काही आटता आटेना!

आम्हांला ते जास्त पाणी बाहेर काढून टाकावं एवढं साधं ज्ञानही त्यावेळी नव्हतं! आता काय करायचं ? तोवर खिचडीचा चांगलाच ” घाटा ” तयार झाला होता.

थोड्यावेळाने इतर मित्र परतले.. भुकेलेले होते पटकन जेवायला द्या.. म्हणू लागले.. आमचे चेहरे पाहून सरांनी ओळखलं होतं “कुछ तो गडबड है ” त्यांनी चुलीवरचं भांड बघितलं.. त्यात भरपूर पाणी असलेला ” भात कम खिचडी कम घाटा ” त्यांना दिसला. त्यांचं डोकं चांगलं सटकलं.. सटकणारच.. कारण भुकाचं तेवढ्या लागल्या होत्या.. पण ते मारू शकत नव्हते.. कारण ” स्काऊट गाईड “होता ना! एनसीसी नव्हे!

पण शिक्षा तर द्यायलाच हवी. मग आम्हां दोघांनाच तो घाटा.. ती खिचडी.. दोन दिवस खाऊन संपवावी लागली.. तेव्हापासून मी स्वयंपाकात परिपक्व झालो.. स्पेशली “फोडणीचा भात ” मी अप्रतिम बनवितो! आणि खिचडीही तेव्हापासून माझी आवडती झाली ती आजतागायत.. !!

© प्रा. भरत खैरकर

संपर्क बी १/७, काकडे पार्क, तानाजी नगर, चिंचवड, पुणे ३३. मो.  ९८८१६१५३२९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments