श्री नितीन सुभाष चंदनशिवे
मनमंजुषेतून
☆ “जगणं साठवत राहायचं बस…” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆
खाकी चड्डी पांढरा शर्ट घालून, जुनी चप्पल पायात असायची. शाळेत जाईपर्यंत तिचा पन्ना चार वेळा निघायचा. तो बसवत बसवत शाळा गाठायची. नंतर दिवस बदलले.. संघर्ष बदलला. मग पुण्यात भाजीपाला भरलेली हातगाडी घेऊन ओरडत पुणे तुडवले.. नंतर वाचमन झालो… पुण्यात विमान दिसायचं म्हणून पुणे आवडू लागलेलं… काही काळ हाऊस किपिंगचे काम…. एखाद्या सिनेमातच दुसरा देश बघायला मिळायचा. लै वाटायचं आपण कधी इमानात बसणार.. कधी हा देश बघणार… मनातल्या मनात हे चालायचं..
कवितेने पोट भरत नाही हा टोमणा ऐकतच मी कवितेला जवळ धरलेलं… मी आज हक्काने सांगू शकतो, कवितेने पोट भरते, आणि कविता भरभरून खूप काही देते… फक्त कविता मिरवण्यासाठी नाही तर गिरवण्यासाठी लिहायची असते… तुम्हाला एक खरं सांगू का? आपल्या कवितेचा दराराच इतका वाढवला मी की जाती- धर्माच्या भिंती फोडून मी सीमा ओलांडून अलगद बाहेर पडलो…. आता फक्त राज्यातच नाही तर पूर्ण जगात फिरतोय.. फक्त सगळ्या अपडेट मी सोशल मीडियावर देत नाही किंवा त्याबद्दल व्यक्त होत नाही..
दर महिन्याला किमान एका तरी देशात कवितेचा कार्यक्रम होत आहे.. हे सगळं मी पुस्तकात लिहिणार आहे आणि ते पुस्तकच तुमच्या स्वाधीन करणार आहे..
आणखी एक.. अगदी खेड्यातल्या एखाद्या चौकात छोट्याश्या स्टेजवरसुद्धा मी कविता घेऊन उभा असतो. तिथं मानधन ही लै त लै तीन हजार असतं.. पण कधीच कुणाला नकार देत नाही.. मानधनाच्या रक्कमेवरून मी कुणाला नकार दिलाय असा संयोजक शोधूनही सापडणार नाही. कधी कधी तर संयोजकाची परिस्थिती फार बेताची आहे आणि त्याच्या खिशातून खर्च करून आपल्याला आणलं आहे हे जाणवू लागलं की, लगेच मिळालेलं मानधन परत द्यायला माझे हात कायम खुले होतात.. असं जेव्हा करतो तेव्हा संयोजक असणाऱ्या माणसाच्या डोळ्यात खळकन् पाणी आलेलं मी बऱ्याचवेळा अनुभवलेले आहे..
बाकी अती प्रसिध्दी नसावी, आपले फॉलोवर कमी असावेत पण रॉयल असावेत.. कमी प्रसिध्दी असली की रानटीपणाने हिंडता येतं जगता येतं… कधी कधी गर्दीत कुणी ओळखले आणि जवळ आले की छातीत धडक भरते.. नको वाटतं.. स्टेजवर असतो तेव्हाच काय तो नितीन चंदनशिवे.. इतर वेळी मला माझं मैदान हवं असतं.
बाकी काचेचा मॉल असो किंवा गावातला चौक, विमान असो किंवा एस टी, आपण कायम असाच हाताच्या बाह्या वर सरकवून रेडा फिरल्यासारख हिंडत राहायचं… शेवटी आयुष्य हे आपलं आहे.. अंगाला माती लावून जगत असताना आकाश मोजता मोजता ओंजळीत भरभरून जगणं साठवत राहायचं… बास इतकंच…
© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)
संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.
मो 7020909521
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈