सौ राधिका भांडारकर

??

☆ माझी जडणघडण… भाग – १२ ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(सौजन्य : न्यूज स्टोरी टुडे, संपर्क : ९८६९४८४८००)

आम्ही पाच – १

हाताची पाच बोटं सारखी नसतात. खरं आहे. आम्ही पाच बहिणी पण दिसण्यात, वागण्यात, स्वभावात आणि एकंदरच आम्हा पाच बहिणींच्या पाच तर्‍हा होत्या. तसं पाहिलं तर आम्हा बहिणींच्या वयातली अंतरही जरा जास्तच होती. म्हणजे पहा ना.. माझ्यात आणि ताई मध्ये (मोठी बहीण) पाच वर्षांचं अंतर. छुंदा माझ्यापेक्षा सात वर्षांनी लहान आणि उषा— निशा या जुळ्या बहिणी, यांच्यात आणि माझ्यात दहा वर्षांचे अंतर.
एक सांगते भावंडांची संख्या जास्त असली की आपोआपच त्यांच्यात ग्रूपीजम होऊन जातो. छुंदा, उषा, निशा यांचा एक ग्रुप होता. मी आणि ताई मोठ्या बहिणी म्हणून आमचं घरातलं स्थान जरा वेगळं असावं, पण या मोठेपणातही पुन्हा वयातल्या अंतरामूळे भागीदारी झाली होती. कधी मला वाटायचं मी ना इथली ना तिथली पण त्यातल्या त्यात छुंदा जरा माझ्या गोटा मधली असायची. त्यामुळे तिचं आणि माझं एक निराळंच सख्य होतं.

ताईची आणि माझी कधी भांडणं वगैरे झाली नाहीत पण मला तिचा रागच यायचा. कारण ती अतिशय हट्टी होती आणि तरीही पप्पा तिला “बाबी” म्हणायचे. कसली बाबी.. आईला वेण्या घालताना भंडावून सोडायची. जिजी ला तर नकोसं करायची. बस ! तिच्या मनात काही आलं की ते “आत्ताच्या आत्ता” झालंच पाहिजे. जिजी तिचं सगळं ऐकायची. म्हणेल तेव्हा तिच्याबरोबर सागर गोटे, पत्ते खेळायची. बाहेर रणरणीत ऊन असायचं पण हिला मैदानात सायकल फिरवायला जायचं असायचं. जिजी बिचारी त्या उन्हातही तिला सायकल चालवायला घेऊन जायची. घरात तिचा पाय काय स्थिरावयाचा नाही. मी तर तिला “भटक भवानी”च म्हणायचे. आज तिचं वय ८२ आहे पण अजूनही ती तशीच आहे बरं का ? कुठून येते तिच्यात इतकी ऊर्जा देव जाणे !

पण ताई मॅट्रिक झाली. आमच्या वेळेला अकरावीला एसएससी बोर्डाची परीक्षा असायची. अकरावी पास म्हणजे मॅट्रिक पास. जणू काही एक पदवीच असायची आणि मग पुढे कॉलेजगमन.

तर ताई मॅट्रिक झाली आणि ग्रँटरोडला आजोबांकडे कायमची राहायला गेली. आमची मावस बहीण संध्या जन्मल्यापासूनच आजोबांकडे राहत होती. आता ताई आणि संध्या ज्या एकाच वयाच्या होत्या.. या जोडीने आजोबांच्या आयुष्यात एक वेगळीच हिरवळ निर्माण केली. असो ! तो एक संपूर्ण वेगळा विषयच आहे पण ताईचे असे इमिग्रेशन झाल्यामुळे आमच्या घरात एक प्रकारचे सत्तांतर झाले म्हणा ना. आता या घरात मी मोठी होते. या मोठेपणात एक पॉवर होती आणि मला ती पॉवर माझ्या लहान बहिणींवर वापरायला नक्कीच आवडायचे पण त्याही काही बिचाऱ्या वगैरे नव्हत्या बरं का ? चांगल्याच कणखर, सक्षम आणि फायटर होत्या. त्यातल्या त्यात छुंदा जरा सौम्य होती. तिला नक्की काय वाटायचे कोण जाणे पण तिची अशी एक मनोधारणा असायची की बिंबा (म्हणजे मी) सांगते ना म्हणजे ते तसंच असलं पाहिजे. तिचं ऐकायलाच पाहिजे. माझा स्वभाव तसा जरा खट्याळ, फिरक्या घेणारा आणि काहीसा वात्रटच होता.

एकदा छुंदाच्या हातून बरणीतलं मीठ सांडलं. मी तिला म्हटलं.. गमतीनेच बरं का ?

“छुंदा ! मीठ सांडलंस ? पाप केलंस. आता पाण्यात घालून पिऊन टाक. नाहीतर देवाच्या दरबारात तुला डाव्या डोळ्याच्या पापणीने मीठ उचलावं लागेल. ”

बिच्चारी छुंदा !

तिला सगळं खरंच वाटायचं. ती खूपच घाबरली. तिने लगेच ग्लासात मीठ घातलं, पाणी ओतलं आणि ती खरोखरच पिऊ लागली. मी कोपऱ्यातून मज्जा बघत होते पण तिला भली मोठी उलटी झाली म्हणून जीजी लगेच धावली. जीजीला सगळा प्रकार कळल्यावर तिने माझ्या पाठीत बुक्केच मारले. सगळा गोंधळ.

“मस्तवाल कार्टी, वात्रट कुठली.. ” म्हणून मला ओरडणे, माझे जीजीचा मार चुकवत निलाजरे हसणे आणि छुंदाचे रडणे असा एक मोठ्ठा सीन झालेला. आजही जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. गंमत वाटते पण वाईटही वाटते. या आठवणी बरोबरच त्यावेळी न म्हटलेलं आज ओठावर येतं. “सॉरी छुंदा. अगदी मनापासून सॉरी !”

डावीकडून.. उषा छुंदा निशा ताई (अरुणा) आणि मी

उषा निशा तर फारच लहान होत्या. मी अकरा वर्षाची असताना त्या एक वर्षाच्या होत्या. माझ्यासाठी तर त्या खेळातल्या बाहुल्याच होत्या. घरातली शेंडेफळं म्हणून आई— पप्पा— जीजी आणि सर्वांच्या अत्यंत लाडक्या. सगळ्यांचं सतत लक्ष या दोन बाळांवर असायचं. मला तर कधी कधी दुर्लक्षितपणाचीच भावना यायची आणि त्यामुळे मी खरोखरच कधी कधी त्यांच्यावर, मला जन्मानेच मिळालेली मोठेपणाची पॉवर वापरायची पण या मोठेपणाच्या बुरख्यामागे माझ्या मनात त्यांच्याविषयी अपार मायाही होती. जणू काही त्यांचं या घरात आमच्याबरोबर मोठं होणं ही माझीच जबाबदारी असंही मला वाटायचं. त्या झोपल्या का, त्यांनी वरण-भात खाल्ला का, त्यांची आंघोळ झाली का, त्यांना कपडे घालायचे, पावडर लावायची.. बापरे ! केवढी कामं पण मला ती माझीच कामं वाटायची. छुंदाची पण मध्ये मध्ये शांतपणे लुडबुड असायचीच कित्येक वेळा मी आणि ताईने त्यांना मांडीवर घेऊन शाळेच्या परीक्षेचा अभ्यास केला आहे.

आमचं घर लहान होतं. फारसं सोयीसुविधांचही नव्हतं. वास्तविक आमच्या घराच्या खालच्या मजल्यावर, जी दोन, एक खणी घरं होती ती भाड्याने का दिली होती ? नाहीतर आमच्यासाठी खालीवर मिळून एक मोठं घर नसतं का झालं ? पण हा विचार आता येतो. तेव्हा कधीच आला नाही. आम्ही पाच, आई पप्पा आणि जीजी असं आमचं आठ जणांचं कुटुंब, तीन खोल्या, एक गॅलरी आणि मागची मोरी एवढ्या परीघात सुखनैव नांदत होतं. “स्पेस” नावाचा शब्द तेव्हा डिक्शनरीत आलाच नव्हता.
आमच्या या गोकुळात सगळं होतं. खेळणं, बागडणं, भांडणं, रुसवे—फुगवे, दमदार खाणं पिणं, आईची शिस्त, टापटीपपणा, पप्पांचा लेखन पसारा आणि जीजीचं तुडुंब प्रेम! काय नव्हतं त्या घरात !

पप्पा पहाटे उठून सुरेल आवाजात ज्ञानेश्वरांच्या ओव्या, तुकारामाचे अभंग गात. आई, जीजी अंग तोंड धुवून लगबगीने घर कामाला लागत. चहापाणी, स्वयंपाक, घरातला केरवारा, झटकफटक, आमच्या शाळेत जाण्याच्या वेगवेगळ्या वेळा, वेण्याफण्या, कपडे, डबे, पप्पांची कधीही न चुकलेली ठाणे ते व्हीटी (म्हणजे आताचे सीएसटी. ) दहा पाचची लोकल, त्यांचे जेवण, त्यांची बॅग भरणे आणि त्यांना ऑफिसात जाण्यासाठी घरातून निघण्यापूर्वी खिडकीतल्या मोठ्या लक्षवेधी महादेवाच्या फोटोला, ”नमस्कार केलास का ?” म्हणून न चुकता जीजीचा केलेला प्रश्न आणि हमखास नमस्कार न करता निघून गेलेल्या पप्पांच्या मागे जीजीनेच मग खिडकीतल्या महादेवाला नमस्कार घालत पुटपुटणे.

या सगळ्याच्या दरम्यान सकाळची साडेसात ते साडेआठ ही पप्पांची आम्हा बहिणींसाठी घेतलेल्या शिकवणीची वेळही कधी चुकली नाही. आमच्या वयानुसार या पप्पांच्या शिकवणीत बदल घडत गेले. सुरुवातीला मी आणि ताई असायचो. पप्पा मध्ये आणि पप्पांच्या डाव्या उजव्या हाताला चौरंग मांडून भारतीय बैठकीत आमचा अभ्यास चालायचा. एक राहिलं.. आमचा चौथीपर्यंतचा अभ्यास आई घ्यायची आणि पाचवी नंतर पप्पांच्या ॲडव्हान्स अभ्यास वर्गात आम्ही जायचो. मी पाचवीत असताना ताई दहावीत होती. हा असा वेगवेगळ्या इयत्तांचा अभ्यास पप्पा कसा काय घेत होते ? पण मुळातच त्यांचा अभ्यास पाठ्यपुस्तकापुरता मर्यादित नसायचा. त्यांच्याबरोबर आम्ही तरखडकारांचे इंग्लिश व्याकरण, हितोपदेश, मोरोपंतांच्या आर्या, गोखलें अंकगणित, हँन्स अंडरसनच्या फेरी टेल्स, साॅमरसेट मॉमच्या कथांचं वाचन, शेक्सपियरची नाटके, संतवाङ्मय तर होतंच… तर पप्पांबरोबरचा अभ्यास हा असा चतुरंगी होता. शाळेतल्या माझ्या अनेक हुशार मैत्रिणी गाईडचा वापर करून अभ्यास करत. वरचा नंबर पटकावत पण पप्पांचा गाईड वापरून केलेल्या अभ्यासाला जोरदार विरोध असायचा. अभ्यास परीक्षेपुरता करायचाच नाही. तो सखोल असला पाहिजे. विषयाच्या गाभ्यापर्यंत झाला पाहिजे असे त्यांचे ठाम मत. गाईड सारखे शॉर्टकट त्यांना कधी पटलेच नाहीत. तरीही पप्पांनी त्यांची मतं आमच्यावर कधीच लादली नाहीत पण पप्पांच्या विरोधात जाण्याची आमच्यातही हिम्मत नव्हती. खरं म्हणजे माझा स्वभाव लहानपणापासून, सौम्यपणे असला तरी विरोध करणारा, रीव्होल्टींग, काहीसा विद्रोही होताच पण पप्पांपुढे मात्र तो पार लुळापांगळा होऊन जायचा. आज जेव्हा या सगळ्या आठवणी येतात तेव्हा प्रकर्षाने जाणवते आम्हा पाचही जणींना दिलेली ही पप्पांची शिकवण आयुष्यभर साथ देत राहिली.

आता मी इथेच थांबते कारण का कोण जाणे हे सारं लिहीत असताना अचानकच मला प्रचंड ठसका लागला आहे आणि तो थांबत नाहीये. हातातलं पेनही गळून पडले आहे. कदाचित ब्रम्हांडात कुठेतरी अस्तित्वात असलेल्या, ज्यांच्या छत्राखाली आम्ही पाच जणी वाढलो त्या आई, जीजी आणि पप्पांनाही या क्षणी आमचीच आठवण झाली असेल का ?

— क्रमश: भाग १२

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

मो.९४२१५२३६६९

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments