श्री सुनील शिरवाडकर

??

☆ अगदी सरळ रेषेत… ☆ श्री सुनील शिरवाडकर

दारावर टकटक झालं म्हणून मी दार उघडलं.. समोर लॉंड्रीवाला उभा होता.. हातात दोन तीन पिशव्या.. त्यात इस्त्री केलेले कपडे.

मी हिला हाक मारली.. अगं.. लॉंड्रीवाला आलाय.. काही कपडे द्यायचे आहे का?

हिने आतुन कपड्यांचा गठ्ठा आणला.. तो धोब्याला दिला.. इस्त्री केलेले कपडे ताब्यात घेतले.. मोजले.. त्याचं काय बील झालं ते ट्रान्स्फर केले.. मी दरवाजा बंद केला आणि आत आलो.

सहजच विचार मनात आला.. हा माणूस धोब्याचा व्यवसाय करतो.. लॉंड्री वगैरे शब्द आत्ताचे.. मुळ शब्द धोबीच.. तर हा धोब्याचा धंदा किती जुना आहे ना! अगदी रामायणात पण धोब्याचा उल्लेख आहे.. गुरुचरित्रात पण आहे. कपडे धुण्याचा हा व्यवसाय खुप जुना.. पण त्याकाळी इस्त्री करत असतील?

जुन्या लोकांकडुन ऐकलेलं.. अमुक अमुक हे.. त्यांची फार गरीबी होती.. इस्त्रीला पण पैसे नसायचे.. तांब्यात पेटलेले निखारे घालून इस्त्री करायचे वगैरे.

मी तर इस्त्रीचे कपडे वापरायला सुरुवात केली ती कॉलेजला जायला लागल्यावर.. शाळेत असताना फक्त पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला शर्ट चड्डी वरुन इस्त्री फिरवली जायची. मग कॉलेजला जायला लागल्यावर मीच माझी शर्ट पँट इस्त्री करायला लागलो.

कपडे लॉंड्रीत टाकण्याची वेळ कधीतरीच यायची.. लग्न कार्य वगैरे असलं तर.. एबीसी लॉंड्रीत कपडे टाकायला जायचो. तिथला माणूस प्रत्येक कपडा उलगडून बारकाईने बघायचा.. कुठे फाटला आहे का.. कुठे काही डाग आहे का.. असला तर त्याचे वेगळे पैसे होतील का.. कुठे रफु करायचं का.. सगळं बघून मग पावती करणार..

मग चार दिवसांनी पावती घेऊन जायचं.. ती पावती घेऊन तो आत जायचा.. हॅंगरला सतराशे साठ कपडे लटकवलेले.. त्यातुन तो नेमकेपणाने आपले कपडे घेऊन यायचा. मोठ्ठा ब्राऊन पेपर काऊंटरवर अंथरायचा.. त्यावर कपड्यांचा गठ्ठा.. मग कुठुन तरी दोर्याचं टोक पकडायचा आणि व्यवस्थितपणे तो गठ्ठा बांधायचा. एखादं लहान मुलं हातात घेऊन आपण सांभाळुन घेऊन जातो.. तसं ते कपडे घरी घेऊन जायचो.

आमचे दादा.. म्हणजे वडील कपड्यांच्या बाबतीत फार काटेकोर.

पॉपलीनच्या कापडाचा शर्ट.. त्याच कापडाचा पायजमा.. आणि गांधी टोपी. त्यांचे कपडे इस्त्री साठी नेहमी लॉंड्रीतच असायचे. टोपी खादीची. ती खादी पण ठरलेली. चांदवडकर लेन मध्ये खादी भांडार आहे. तिथे ते जायचे. त्यांना कुठल्या प्रकाराची खादी हवी असते ते तेथील माणसांना माहीत होतं. कधी ती स्टॉक मध्ये नसायची.. मग चार दिवसांनी ते परत जायचे.

खादीचं ते पांढरं कापड घरी आणलं की एक रात्र पाण्यात टाकायचं.. सकाळी दोरीवर वाळत टाकायचं.. मग त्याच्या टोप्या शिवायच्या. त्यांचा शिंपी ठरलेला होता. असंच घरात शिवणकाम करणारा होता तो.

आता टोपीत कसले आले मापं.. पण नाही.. दादांना ते पटायचं नाही. पहीले सॅम्पल म्हणून तो एक टोपी शिवायचा. दादांना आणुन दाखवायचा‌. दादा ती घालुन बघायचे.. ‌इंचपट्टीने लांबी रुंदी उंची बघायचे. पुढे असणारं टोक त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे.. त्याला दिवाल म्हणत.. ती दिवाल अगदी त्यांना हवी तशी लागायची.. थोडेफार फेरफार करून मग ते फायनल करायचे.

दुसऱ्या दिवशी टोप्या शिवून तो शिंपी यायचा. दादा एकदम डझनभर टोप्या शिवायचे. त्याची धुलाई.. इस्त्री घरीच.. त्यांचं टोप्यांना इस्त्री करणं बघत रहावं असं.

पांढऱ्या शुभ्र टोप्या ते घेऊन बसायचे.. सगळ्या डझनभर.. त्याला पाणी मारुन ठेवायचे.. टोपीला तीन घड्या असतात.. मग एक एक स्टेप.. त्या ओलसर टोपी वरुन दाबुन इस्त्री फिरवली की अशी वाफ यायची.. त्याचा एक वेगळाच वास असायचा. मग एक एक घडी.. शेवटी पुर्ण दाब देऊन इस्त्री फिरवायचे.. खास करून पुढच्या टोकावर.. ते टोक खुप महत्वाचं.

अश्या डझनभर टोप्या इस्त्री झाल्या की त्या वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून काळजीपूर्वक कपाटात ठेवायचे.. दर दोन दिवसांनी संपूर्ण ड्रेस बदलायचे.

सकाळी देवपूजा झाली की ते देवदर्शन करण्यासाठी. ‌भाजी आणण्यासाठी बाहेर पडायचे. पांढरा शुभ्र पायजमा.. शर्ट आणि टोपी. ती टोपी डोक्यावर ठेवायचे.. कपाळावर गंधाचा लाल टिळा.. आरश्यासमोर उभे रहायचे… टोपीची पुढची बाजु.. त्यांच्या भाषेत ‘दिवाल’.. एकदम सरळ हवी.. अगदी नाकाच्या सरळ रेषेत.. एकदा मान डावीकडे फिरवायचे.. ‌‌एकदा उजवीकडे.. त्यांच्या दृष्टीने ती केवळ कडक इस्त्री केलेली टोपी नव्हती.. तर तो एक शिरपेच होता..

त्या काळातील पिढीचं जगणं असंच होतं ना.. स्वच्छ.. कुठेही डाग नसलेलं.. इस्त्री केल्यासारखं प्लेन.. आणि डोक्यावरच्या टोपीसारखी सरळ.. एका रेषेत असलेलं..

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments