सौ. सुनीता पाटणकर
मनमंजुषेतून
☆ कुंदाची फुलं… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆
माझ्या अंगणात एक कुंदाच झाड आहे. जाई, जुई, मोगरा, गुलाब, जास्वंदि यांच्या दिसण्याचा आणि सुवसाचा मोह सगळ्यांना, बिचाऱ्या कुंदाकडे कुणाचंच लक्ष नाही.
आता थंडी सुरू झाली, दरवळणारी जाई आणि जुई नाजूका गारठली, मलूल झाली. पण कोणताही गंध नसणारी, शुभ्र पांढरी कुंदकळी भरून आली. एकदम मस्त ताजीतवानी, भरभरून बहरली.
टपोरी, स्वच्छ, निर्मळ फुल परडीत विसावली. दातांच्या शुभ्र कुंदकळ्या अशी उपमा देतात, त्याचीच आठवण आली.
तिच्याकडे पाहिलं आणि वाटलं किती साधी, सरळ आहे ही, एरवी फारसं लक्ष देत नाही, म्हणून रागवत नाही, फुगत नाही, रडवेली होत नाही, आणि अजिबात उन्मळूनही पडली नाही.
खरचं खूप शिकता येईल हिच्याकडून … आपलं काम आपण चोख बजावत रहायचं, मग इतरेजन कसे वागतात, काय करतात त्याचा कशाला विचार करायचा !
मी सकाळी उठून देवासमोर उभी होते, तर लक्षात आलं, काल देवाला वाहिलेली कुंदाची फुलं काल होती तितकीच आज अजूनही शुभ्र आणि टवटवीत आहेत. अशी ही कुंदाची फुलं…… खरचंच खूप प्रेरणादायी वाटली…..
……. म्हणून हा लेखनप्रपंच.
© सौ. सुनीता पाटणकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈