श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? मनमंजुषेतून ?

☆ “आकाश मोजतांना” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

वळवाचा पाऊस नुसताच पडून गेला व्हता. गावातल्या लाईटी गेल्या व्हत्या. मेणबत्ती लावून मी चटई टाकून पडलो होतो. रात्रीचे अकरा वाजून गेले होते. आई झोपली होती. बायको आणि पोरं बडबड करत कसला तरी खेळ खेळत होती. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन उशालाच व्हता. मी पटकन उचलला. सवयी प्रमाणे मी फोन स्पीकर वर टाकला. आणि पलीकडून आवाज आला. हॅलो साहेब, दंगलकार बोलता का.. ? मी बी व्हय म्हणलं. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “आम्हाला तारीख हवी होती. गोंदियामध्ये तुम्हाला बोलवायचे आहे. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे तुम्हाला ऐकायची. 14 एप्रिल तारीख हवी आहे आम्हाला. बाबासाहेबांच्या जयंती निमित्त.. ”

तसा एप्रिल महिना सुरू व्हायला अजून पंधरा दिवस होते. बऱ्याच तारखा बुक झालेल्या होत्या. पण 14 एप्रिल कुणाला दिलेली नव्हती. पण गोंदिया खूप लांब होतं. मी त्यांना म्हणलं, “साहेब तुम्हाला तारीख द्यायला अडचण नाही पण, येण्याजाण्यात माझे चार दिवस जातील. अंतर खूप आहे आणि मला खूप अवघड होईल. ” त्यावर ती व्यक्ती जरा शांत झाली. आणि लगेच पुन्हा ते म्हणाले, ”आम्ही विमानाचं तिकीट करतो साहेब पण तुम्हाला यावं लागेल.. ” 

माझ्या पोटात एकदम गोळा आला. आणि माझे वडील माझ्या बाजूला येऊन फोनकडे एकटक कधी बघत बसले कळलं नाही. बायको पोरं एकदम शांत. आई पण जागी झाली. पलीकडची व्यक्ती म्हणाली, “ साहेब पुणे ते नागपूर विमान सेवा आहे. आम्ही येणे जाणे करून घेतो. आजच तिकीट बुक करतो तुमचं. आता नाही म्हणू नका. ”.. मला लै आनंद झाला. पण माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या वडिलांना झालेला होता. बाजूला बसलेल्या आईचा हात त्यांनी हातात गच्च दाबून धरलेला मला दिसला. अण्णा इमान इमान अस बडबड करत वरच्या पत्र्यावर नजर फिरवताना मला दिसले. मला फार गंमत वाटली. तेवढ्यात पलीकडची व्यक्ती काही बोलणार त्यांना मीच म्हणालो, ”साहेब तुम्ही पहिलेच आहात माझ्या आयुष्यात जे मला विमानाने बोलवत आहात. तुमच्यामुळे माझ्या आयुष्यातला पहिला विमान प्रवास घडणार आहे. तुमचे खूप आभार. पण, साहेब माझी एक विनंती होती बोलू का.. ?”त्यावर ते म्हणाले “बिनधास्त बोला दादा.. ”

त्यांना मी म्हणलं, ”साहेब हा पहिला विमान प्रवास माझ्या वडिलांच्या सोबत व्हावा अशी माझी खूप इच्छा आहे. तुम्ही मानधन नाही दिले तरी चालेल. पण आमच्या बाप लेकाची तिकीट तेवढी काढून द्या. आम्ही सोबत येतो. ” त्यावर ते म्हणाले, “ नितीन दादा अजिबात काळजी करू नका. तुमचं जे मानधन असेल ते ही करतो. आणि बाबुजीचे आणि तुमचे तिकीट ही बुक करतो. काळजी करू नका. फक्त दोघांचे आधार कार्ड चे फोटो पाठवा. ” मी आनंदाने होकार दिला. फोन कट केला. बाजूला वडिलांच्याकडे बघितले तर अण्णा गायब. आण्णा कपाट उघडून आधार कार्ड शोधत होते.

तासाभराने लाईट आली. लाईट आल्याबरोबर अण्णा आधार कार्ड घेऊन माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ”काढ लवकर फोटू याचा आणि पाठव त्याला.. ” मी आमच्या दोघांचेही आधार कार्डचे फोटो पाठवून दिले. आमची तिकीट बुकिंग झाली. आम्ही 14 एप्रिलला पहाटे पाच वाजता विमानात बसणार होतो. ते ही पुण्यातून. या भावनेने मला रातभर झोप लागत नव्हती. आण्णा तर रातभर बडबड करत होते. आजवर आकाशात उडणारे विमान पाहणारी आम्ही साधी माणसं. आमच्यासाठी हे खूप काही होतं.

त्या दिवसापासून आमचे अण्णा सगळ्या गावाला सांगत सुटले मी विमानात बसणार आहे म्हणून. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर आमच्या सगळ्या पाहुण्यांना फोन करून ते सांगू लागले. रोज दिवस मोजू लागले. अखेर तो दिवस आला. याचदिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला. त्याच निमित्ताने मी प्रमुख पाहुणा म्हणून निघालो होतो. आणि याच महामानवामुळे आम्ही आज आकाश मोजणार होतो.

माझे मित्र मिलिंद केदारे यांनी त्यांच्या चारचाकी गाडीतून आम्हाला विमान तळावर सोडले. आजवर एस. टी. स्टँड आणि रेल्वे स्टेशनवर उभं राहून गाडीची वाट पाहणारी आम्ही साधी माणसं आज विमान तळावर आलो होतो. मी विमानतळापेक्षा जास्त बापाच्या चेहऱ्यावरचा आनंद मनात साठवत होतो. आजूबाजूला बघून प्रत्येकाला विचारत आत जाण्याची प्रोसेस आम्ही पूर्ण केली. तिथून आम्ही बाहेर पडलो. एक बस न्यायला आली. त्यात बसलो. त्यावेळी अण्णा म्हणाले, “ आरे इमान कुठाय.. ? “ मी हसत म्हणलं, “ ही गाडी आपल्याला विमानाजवळ घेऊन जाईल. ” गाडी हलली तशी तिथल्या मैदानात उभी असलेली विमाने आम्हाला खिडकीतून दिसू लागली. अण्णा भान हरवून तिकडे बघत होते.

बस थांबली. आम्ही उतरलो. आमचं नागपूरसाठी जाणारं विमान समोर उभं होतं. त्या पायऱ्या चढून आम्ही आत आलो. आमची शिट पाहून बसलो. अण्णा संपूर्ण विमान नजरेत साठवत होते. विमान त्या रन वै वर उभं राहिलं. त्यातल्या हवाई सुंदरी असणाऱ्या पोरीनी हातवारे करून माहिती दिली. अण्णा त्यांच्याकडे एकटक बघत होते. आणि मी अण्णांना पाहत होतो. तेवढ्यात पाठीमागून माझ्या खांद्यावर एक हात पडला. मी मागे वळून बघितलं. तर तो माणूस हातात हात देत म्हणाला, ” साहेब जय भीम. मी वानखेडे. तुमचा लै मोठा फॅन आहे. ” त्याने माझ्यासोबत एक सेल्फी घेतला. मनात म्हणलं, ”एस. टी मध्ये आपले फॅन भेटतात पण विमानात बी आपल्यावर प्रेम करणारी माणसं हायती.. ” लै भारी वाटलं.

विमान धावू लागलं. आणि त्याने एका क्षणाला जमीन सोडली. त्यावेळी फक्त विमान आकाशात उडालेले नव्हते. एक मुलगा त्याच्या बापाला ओंजळीत धरून हवेत तरंगू लागलेला होता. जसं विमान उडाले तसे मी अण्णांकडे बघितले. अण्णा लहान मुलासारखे खिडकीतून वाकून पाहण्याचा प्रयत्न करत होते. मी त्यांच्या कडे पाहतोय हे लक्षात आल्यावर त्यांनी माझ्या डोळ्यात बघितलं. माझा हात गच्च हातात धरून भरलेल्या डोळ्यांनी माझा बाप एकच वाक्य बोलला. ” पोरा आपल्या अख्ख्या खानदानीत इमाणात बसलेला मी पहिलाच माणूस बरं का.. “ असं म्हणून अण्णांनी मान डोलावली.

थोड्या वेळाने हवाई सुंदरी आली. चहा हवाय का म्हणून विचारू लागली. मी किंमत विचारली. तिने दोन चहाचे दोनशे रुपये सांगितले. अण्णानी मला हळूच चिमटा घेत म्हणले. ”नको जाऊ दे. दोनशे रुपयात आठवड्याची भाजी येईल बाबा. तुझी आय काय म्हणल.. ?” आम्ही तो चहा घेतला नाही. पण जी माणसं चहा पीत होती त्यांच्याकडे मात्र आम्ही एकटक पाहत राहिलो. तेवढ्यात अण्णा म्हणले. ” व्हय रे” यात सगळी सोय असती ना.. ?” मी व्हय म्हणलं, त्यांना बाथरूमबद्दल विचारायचं होतं हे कळलं. मी म्हणलं. मागे आहे टॉयलेट या मोकळं होऊन.. ’” आण्णा हसत म्हणले, तशी काय गरज नाही, मला काय आलेली नाहीय. पण जाऊन येतू बघून येतु” अस म्हणून आण्णा ते ही सगळं करून आले.

आम्ही आकाशात उडत होतो. आम्ही आकाश मोजत होतो. टिव्ही, पिचर, पेपर, मोबाईल, आणि हवेत उंच उडणाऱ्या जागी विमान पाहणारी साधी माणसं आम्ही. आज विमानात बसलो होतो. हा आकाश मुठीत घेणारा पहिला विमान प्रवास मी बापासोबत केला याचं समाधान होतं. ज्या बापाच्या मांडीवर मी लहान असताना झोपलो. त्याचं बोट धरून पहिलं पाऊल टाकलं. त्याच बापाने आज त्याचं डोकं हळूच खांद्यावर टेकवत आण्णा भरलेल्या डोळ्यानी मला म्हणाले, “ नितीन आयुष्यात सगळं मिळालं. जे स्वप्नात ही वाटले नव्हते ते जगायला मिळालं. ”.. असं म्हणून दोन पोरांचा बाप असलेला मी. या वयात माझ्या बापाने माझ्या गालाचा हळूच मुका घेतला. मी डोळे झाकले. हुंदक्यांची दाटून आलेली जत्रा मी आतल्या आत अडवून धरली. आणि बंद पापणीच्या आड बापाच्या खांद्यावर हात टाकून धरण फुटल्यासारखा झिरपून गेलो..

…आता सतत विमान प्रवास असतो पण तो पहिला प्रवास मात्र मनात घर करून आहे.

थॅन्क्स बाबासाहेब….

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments