☆ मनमंजुषेतून : चाळ- एक संस्कृती – श्री राजीव दिवाण ☆
ह्या चाळीत जन्माला आलेली नि वाढलेली ही तिसरी पिढी. पण कामानिमित्त इतरत्र रहायला गेलेले, कोणी मुंबई बाहेर,कोणी परदेशी तर कोणी जागा लहान पडते म्हणून वेगळी चूल मांडलेले. पुढील आठवड्यात शक्यतो सर्वांनी एकत्र येऊन,बसून ठरवायचं होतं कि आता ही चाळ पाडून नवी इमारत बांधून काढायची. चाळमालकानी तशी सर्वांना रितसर नोटीस पाठवली होती …. कोर्टाची..
महानगरपालिकेने ऑडिट करून “ सदरहू इमारत जुनी असून धोकादायक म्हणून जाहीर करणेत येत आहे” असा बोर्ड लावला.
सत्तरीच्या जवळ पोहोचलेली ही इमारत….तीला “चाळ”म्हणून संबोधलं जायचं. पंधरा बाय पंधराच्या पंचवीस खोल्या,म्हणजे पंचवीस कुटूंबं…सर्व जाती,धर्माच्या माणसांनी व्यापलेली ही ” चाळ” म्हणजे “आसेतूहिमाचल” भारताची प्रतिनिधीच… गेल्या तीन पिढ्यांचा जन्म ते मृत्यू हा प्रवास ह्याचाळीनं पाहिला…ती हि “चाळ”. ह्या चाळीत काय साजरं झालं नाही ते विचारा… एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर या कालात येणारा प्रत्येक सण,प्रत्येक कुटूंबाच्या सहभागानेच साजरा झाला. संक्रांतीचा तिळगुळ जोशी-देवधरांच्या घरातून निघून व्हाया पाटील खोतांकडून अगदी शेख-फर्नांडिसांपर्यंत वाटला जायचा… तीच बाब इतर सर्व सणांची… होळीला तर बोंबलायला झाडून सगळी पोरं उत्साहाने हजर. चाळीच्या गणपतीच्या सजावटीची सगळी जबाबदारी शेखसाबची..चाचा मंडप,सजावट, टेबल,खूर्च्या भाड्याने देत होते ना…ईदचा शीरकुर्म्याची लज्जत सगळे लुटायचे. देवधरांच्या सुली( सुलेखा) ची डिलीव्हरी झाली..मुलगा झाला तो ईदच्या दिवशी तर भाभीला काय आनंद झाला..म्हणाली..”चाळमंदी महम्मद आया….शुभशकून हूया” . हीच सुली शाळेचा अभ्यास जिन्यावर बसून करताना ,इस्त्रीवाल्या भैय्याला ओरडायची ” चाचाss..गावो मत,मै अभ्यास करती हूँ “..” हां हां मालूम है.बडी आयी डागदर बननेवाली” . दिवसातून चारवेळा तरी दोघाचं असं भांडण व्हायंचच…सुली दहावीच्या पेपरला जाताना सगळ्यांच्या घरी जाऊन नमस्कार करून निघाली नि जाता जाता जिन्याखाली बस्तान ठोकलेल्या इस्त्री वाल्या भैयालाही नमस्कार करायची विसरली नाही. सुली ग्रॅज्युएट झाली…दोन वर्ष नोकरी झाली नि लग्न ठरलं… लग्नाला निघताना चाचाला नमस्कार करायला गेली तेंव्हा भरल्या डोळ्यांनी चाचा बोलला” हे गंगामैया..का बोलू , हमार बिटूवा भी अब बडी हुई होगी..!!!”
पाटील काकांचा अर्जुन लहानपणापासून एक नंबरचा दंगेखोर नि , टग्या. सगळ्यांना अगदी नको जीव करून सोडलेलं.हाच टग्या मिलीट्रीत भरती झाला तेंव्हा प्रत्येक घरातल्या प्रत्येक आईच्या डोळ्यात अश्रू तरारले होते. एकेक घुंगरू एकमेकांना बांधून तयार करतात त्यालाही ” चाळ” म्हणतात..सार्यांचाताल,सूर,लय,जसं एकंच असतं ना तशीच एकरूपता ह्या इमारतीच्या माणसांच्या वागण्यातून व्यक्त व्हायची ..म्हणूनच ती “चाळ”असावी.
अशीही चाळ आता पडली. दोनतीन वर्षात उंच मनोरेवजा फ्लॅटसिस्टीम उभी राहिली. कुटूंबं रहायला आली. काळ पुढे जात होता, पण चाळीतला जिवंतपणा नि जिव्हाळा काही जाणवेना. चाळ असताना सदैव उघडे असलेले घराचे दरवाजे आता सेफ्टी डोअरसह सतत बंदच दिसू लागले. पोरांचा किलबिलाट नाही, जिन्याखालील भैयाचं गाणं नाही. कुणाकडे कोण आला,कोण गेला कशाचा कशाला पत्ता नाही.
मोडक्या चाळीतून निघताना पाहिलेली सारी स्वप्नं ह्या फ्लॅटसिस्टीम मधे जणू “ फ्लॅट” होवून गेली.
© श्री राजीव दिवाण.
भ्रमणध्वनी ९६१९४२५१५१
वॉटस्अप ८२०८५६७०४०
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
सुंदर रचना