श्री मयुरेश उमाकांत डंके
मनमंजुषेतून
☆ कृत्रिमतेची स्टिरॉइड्स घेताय ? ☆ श्री मयुरेश उमाकांत डंके ☆
“सर, तुमच्याकडे जरा काम होतं. घरी कधी भेटता येईल?” माझ्या चांगल्या परिचयाचे एक इंटिरियर डिझायनर आहेत. आमच्या घरची पुस्तकांची कपाटं त्यांनीच डिझाईन केली आहेत. त्यांचा फोन आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही घरी भेटलो. ते म्हणाले, “सर, मला तुमची मदत पाहिजे. माझे एक क्लायंट आहेत. त्यांना तुमची पर्सनल लायब्ररी दाखवायची आहे. तुम्हाला चालेल का?”
“पुस्तकं उसनी मागणार नसतील तर चालेल. ” मी सांगून टाकलं.
पुस्तकांच्या बाबतीतला मुखदुर्बळपणा किंवा भिडस्तपणा मी आता आवरता घेतला आहे. “जरा वाचायला नेतो आणि परत आणून देतो” असं शपथेवर सांगणारे लोकसुध्दा नंतर पुन्हा उगवत नाहीत, हा अनुभव मी शेकडो वेळा घेतला, अनेक उत्तमोत्तम दुर्मिळ पुस्तकं गमावली आणि स्वतःचं नुकसान करुन घेतलं आहे. त्यामुळं, कुणी पुस्तक मागितलं की मी स्पष्ट नकार देतो.
दोन दिवसांनी एका चौकोनी कुटुंबाला घेऊन ते घरी आले. त्यांनी सगळी लायब्ररी पाहिली आणि मला विचारलं, “सर, एखाद्या चांगल्या मराठी घरात कोणकोणती पुस्तकं असावीत, हे तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? आम्ही यादी लिहून घेतो. ” ते क्लायंट गृहस्थ म्हणाले.
“माझं घर हे सुध्दा एक चांगलं मराठी घरच आहे. माणसानं अवश्य वाचावीत अशी हजारों पुस्तकं माझ्या संग्रहात आहेत. त्यांची आम्हीं वयोगटानुसार यादी केली आहे. ती दाखवतो. ” असं सांगत मी त्यांना यादी दाखवली. त्यांनी फोटो काढून घेतले. आणि चमत्कारिक प्रश्न सुरु झाले –
“फास्टर फेणे की हॅरी पॉटर? तुम्ही काय सजेस्ट कराल?”
“तरला दलाल, संजीव कपूर की रुचिरा?”
“मृत्युंजय, स्वामी, श्रीमान योगी यांच्याशिवाय आणखी ऐतिहासिक पुस्तकं कोणती असावीत?”
“पु. ल. देशपांडे आणि व. पु. काळे यांचे संपूर्ण सेट घेतले तर स्वस्त पडतात का? असे अजून कुणाकुणाचे सेट्स आहेत?”
मी चक्रावून गेलो. त्यांचा मुलगा आणि मुलगी माझ्या लिस्ट मधून “फेमस बुक्स” शोधत होते आणि नावं सापडली की त्या पुस्तकांचे फोटो काढून घेण्यात गुंतले होते. काहीच उमगत नव्हतं. दोन अडीच तासांनी ते सगळे गेले.
साधारण दीड महिन्याने पुन्हा त्यांचा फोन आला. “सर, आम्हीं मागच्या आठवड्यात तुमच्याकडे लायब्ररी बघायला आलो होतो. ”
“बोला”
“तुम्ही आमची लायब्ररी बघायला आमच्या घरी याल का?” त्यांनी विचारलं.
“म्हणजे?”
“म्हणजे तुमची लायब्ररी बघितल्यानंतर आम्हीं आमची पण तशीच लायब्ररी तयार केली आहे. तुम्ही एकदा पाहायला आलात तर फार बरं होईल. ”
“बघतो, प्रयत्न करतो” असं म्हणून मी वेळ मारुन नेली खरी. पण चार पाच दिवस त्यांचें वेळीअवेळी सारखेच फोन यायला लागले. शेवटी रविवारी त्यांच्याकडे गेलो.
प्रशस्त मोठा फ्लॅट होता. अगदी नवा कोरा. बहुतेक ते राहतं घर नव्हतं. काम सुरु होतं. त्यांनी हॉल दाखवला. सेम टू सेम बुक केस, आणि त्यात सेम पुस्तकं.. जवळपास दीड-दोनशे पुस्तकं असतील.
“सर, आतमधून एलईडी लायटिंग केलं आहे, त्याला डीमर बसवला आहे. खास टफन ग्लासचे शेल्फ बसवले आहेत. आणि लाकूड सगळं सागवानच वापरलं आहे. तुम्ही वेगळ्या अर्थानं घेऊ नका, पण तुमच्यापेक्षा भारी मटेरियल वापरलं आहे. ” ते भडाभडा सांगत होते. मी ऐकत होतो.
पाडगावकरांची बोलगाणी स्टीलच्या कपाटात ठेवली काय किंवा उंची फर्निचरमध्ये ठेवली काय, त्यातला आस्वाद बदलणार आहे का? शो केसमध्ये पॉश पोझिशनमध्ये लावल्याशिवाय पु. लं च्या पुस्तकांतून विनोदच खुलत नाही, असं कुठं असतं? पुस्तकं आपल्याला त्यांच्या अंतरंगात रमवण्यासाठी असतात. आपण त्यातून शिकतो, अंतर्मुख होतो, त्यांच्याशी जोडले जातो, प्रभावित होतो. कधी ती हसवतात, कधी रडवतात, कधी प्रेरणा देतात, कधी शहाणपण शिकवतात. पण हे सगळं त्या पुस्तकातल्या आशयावर अवलंबून असतं, पुस्तकं जिथं ठेवतो त्या फर्निचरवर अवलंबून नसतं.
“सर, हा डेस्क बघा. ह्यात काय केलंय, ते आत एक गोल खाच पाडली आहे. त्या खाचेत एक कॉफीमग बरोबर बसतो. म्हणजे वाचताना कॉफी घेऊन बसलं तरी प्रॉब्लेम नाही. कप हिंदकळण्याचा प्रश्नच नाही. ” त्यांनी ते छोटं डेस्क दाखवलं.
तेवढ्यात त्यांच्या मुलीनं दाखवलं, “सर, या अँगलनं इथं खुर्चीत पुस्तक घेऊन बसलं की, फोटो पण परफेक्ट येतो. पुस्तक वाचतानाच्या फोटोंना सोशल मीडियावर ऑल टाईम डिमांड.. “
मी त्या इंटिरियर डिझायनरकडं पाहिलं, त्याच्या चेहऱ्यावरून अभिमान अगदी ओसंडून वाहत होता.
थोड्या वेळानं मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो, घरी आलो. संध्याकाळी ते इंटिरियर डिझायनर माझ्या घरी पुन्हा हजर..
“सर, तुम्ही पुस्तकांविषयी एवढं गाईड केलं, वेळ दिला, स्वतः साईट व्हिजिट केली. तुमची फी सांगा ना. ”
“कसली फी? कुठली साईट व्हिजिट ?”
“सर, पुढच्या महिन्यात त्या घराचा गृहप्रवेश आहे. ‘एकदम सुसंस्कृत घर’ अशी थीम धरुनच इंटिरियर केलं आहे. त्यांच्यातले कुणीही ही पुस्तकं वाचणारच नाहियत. घरातली माणसं पुस्तकं वाचतात, असा फील देण्यासाठी मोठी बुक केस आणि त्यात ठेवलेली पुस्तकं हा डिझाईन चा भाग आहे. म्हणून तर तुमचा स्पेशल गायडन्स घेतला आणि त्याचे स्पेशल चार्जेस सुद्धा मी क्लायंटच्या बिलात लावलेत. तुम्ही सांगितलेली पुस्तकं मीच खरेदी केली आणि आणून लावली. आता गृहप्रवेशाच्या वेळी सगळ्यांना बघायला मिळेल ना, म्हणून साईट कंप्लीट करुन दिली. ” त्यांनी सरळ सांगून टाकलं.
“सर, घरात पुस्तकं असणं चांगलं असतं, येणाऱ्या लोकांवर इम्प्रेशन पडतं, असं क्लायंटचं म्हणणं होतं. ते म्हणाले, ‘उत्तम बुक केस डिझाईन करा आणि पुस्तकं पण तुम्हीच आणून फिट करा’, त्यानुसार मी तुमचं गायडन्स घेऊन काम केलं. ”
आत्ता माझ्या डोक्यात प्रकाश पडला. नोकरीसाठी बायोडेटा किंवा लग्नाळू मुलामुलींची प्रोफाईल्स वाचताना ‘आवडी निवडी’ असं शीर्षक दिसलं की, हमखास दिसणारी पहिली आवड म्हणजे वाचन.. खरोखरच आवड असो किंवा नसो, सहज खपून जाण्याजोगं एकमेव उत्तर म्हणजे वाचन.. ! त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण मी आत्ता प्रत्यक्ष अनुभवत होतो.
मग त्या घरमालकांच्या संवादातली एकेक गोष्ट उलगडायला लागली. उंची सागवान, एलईडी दिवे, टफन ग्लास, प्रोफाईल डोअर्स, फोटो येईल अशी चेअर सेटिंग… या सगळ्या गोष्टींची लिंक लागली.
आश्चर्य वाटलं, वाईट वाटलं आणि खरं सांगायचं तर कीव आली. पैसा ओतून सुसंस्कृत किंवा अभ्यासू असण्याचा आभास निर्माण करण्याचा जो रोग माणसाला जडतोय ना, त्याचं वर्णन चोखोबांनी शेकडो वर्षांपूर्वीच करुन ठेवलंय. “काय भुललासी वरलिया रंगा” असा त्यांचा अभंग जगद्विख्यात आहे.
पूर्वी “तो मी नव्हेच” असं दाखवण्यासाठी माणसं धडपड करायची. आता “असा मी असामी” असा आभास निर्माण करण्यासाठी धडपडतायत, याचं हे एक नवं उदाहरण अनुभवायला मिळालं. आपलं बाह्य रूप विकत घेता येतं, तशी आपली प्रतिमासुध्दा विकत घेण्याचा उद्योग कुठल्या स्तरावर गेला आहे, हे पाहिल्यावर मन ढवळून निघालं. रोज एक पुस्तक धरुन त्या बुक केससमोर खुर्चीत बसायचं आणि फोटो काढून सोशल मीडियावर पोष्टायचा, म्हणजे इमेज क्रिएट होईल ? वा रे लॉजिक.. !
“थ्री इडियट्स” मधला श्यामलदास छांछड आठवतो का? “वाट्टेल ते करा, पण या पोराला माझ्या मुलाच्या नावानं इंजिनियर करा. माझ्या मुलाच्या नावाची इंजिनिअरिंगची डिग्री या भिंतीवर लागली पाहिजे” असा दम देणारा श्रीमंत माणूस आठवला? तीन तासांच्या संपूर्ण सिनेमात हा तीस सेकंदांचा सीन आपण विसरुन जातो. पण वाट्टेल ते करुन स्वतःची प्रतिमा विकत घेण्याच्या मागं लागलेली माणसं सोशल मीडियाचं प्रस्थ वाढायला लागलं, तशी वाढतच चालली आहेत.
लोकांमध्ये, समाजात आपली ईमेज भव्यदिव्य दिसावी म्हणून लोकं काय काय करतात, याचे काही विचित्र नमुने पाहिले तर, कपाळावर हात मारुन घेण्याची वेळ येते. “मी अमुक अमुक दुकानातूनच भाजी घेते, अमुक अमुक ठिकाणाहूनच आंबे घेते”, इथपासून ते “अमुक अमुक देवालाच मी दर चतुर्थीला जातो” इथपर्यंत सगळ्या जगाला अभिमानानं सांगणारे कितीतरी लोक तुम्हाला दिसतील. “एकवीस हजार रुपये भरुन तिकीट काढून तिरुपतीचं स्पेशल दर्शन घेऊन आलो” असंही सांगणारे लोक आहेत आणि “दरवर्षी काहीही न खाता पिता एकवीस तास रांगेत उभारुन दर्शन घेतो” असंही सांगणारे लोक आहेत.
“आम्हीं अमुक ठिकाणचाच वडापाव खातो”, “मला तर दुसरी कुठली भेळ आवडतच नाही”, “मी एसी शिवाय तर प्रवासच करत नाही”, “मी आणि लाल डब्यातनं प्रवास? बापजन्मात शक्य नाही”, ” रेग्युलर ब्लड शुगर लेव्हल चेक करायला सुद्धा मी तिथं जात नाही, माणूसच घरी बोलावतो. त्याला सांगतो, शंभर रुपये जास्त घे पण तिथं बोलावू नकोस, मला जमणार नाही” असले अनेक तोरे मिरवणारे कितीतरी जण आहेत.
आपल्या गळ्यातली सोनसाखळी मुद्दाम दिसावी असा शर्ट घालणारी जशी माणसं आहेत, तशीच अमुक एखाद्या ग्रंथालयाची मेंबरशिप नुसतीच घेऊन ठेवणारीसुद्धा माणसं आहेत. त्यांना वाचनाचा छंद नसतो पण आपल्या गावातल्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेचा मी सभासद आहे, हे सगळ्यांना सांगण्यातच त्यांना खरा रस असतो.
मध्यंतरी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरुंचे पाय धुवायचे आणि पाय धुताना, फुलं वाहताना ढसाढसा रडतानाचे फोटो, व्हिडिओ काढून ते सोशल मीडियावर फिरवायचे, ही एक जबरदस्त ‘तथाकथित इमोशनल’ क्रेझ निर्माण झाली होती. अशी गुरुपूजनं गल्लोगल्लीचे फ्लेक्सजिवी करत सुटले होते. आनंदाच्या क्षणी ओक्साबोक्शी का रडायचं? याचं उत्तर मला अजूनही मिळालेलं नाही.
मी जसा आहे तसं दाखवणं कठीणच आहे, माझी ईमेज बिघडेल. म्हणून मग खोटी बेगडी ईमेज पैशाच्या जोरावर विकत घ्यायची, हा रोग बळावतोय. मग ते कपडे असोत, महागड्या वस्तू असोत किंवा मोठाली कर्जं काढून घेतलेल्या गोष्टी असोत.. पण आता छंद आणि आवडी निवडीसुध्दा विकत घेण्यापर्यंत माणसं पोचली ? आणि त्या ईमेज बिल्डिंग साठीसुध्दा स्पेशल कन्सल्टिंग सुरु झालंय? हे लोकांना आणखी खड्ड्यात घालणारं ठरेल.
छंद आणि व्यासंग हे आपल्या व्यक्तीमत्वाच्या खऱ्याखुऱ्या विकासासाठी असतात. आपलं व्यक्तिमत्त्व उत्तम व्हावं, चांगल्या गुणांचा विकास व्हावा, समाजात आपलं चांगलं स्थान निर्माण व्हावं, अशी इच्छा असणं मुळीच गैर नाही. पण त्यासाठी स्वतःला घडवावं लागतं आणि तसं घडण्यासाठी फार मनापासून, सातत्यानं कष्ट घ्यावे लागतात. ते विकत घेता येत नाही.
स्वतःची ईमेज बिल्ड व्हावी म्हणून कोणत्याही संतवर्यांनी साहित्य निर्मिती केली नाही. जगाला दाखवण्यासाठी म्हणून त्यांनी काही केलं नाही. अतिशय साधं, संतुलित, प्रामाणिक आणि समाज प्रबोधनाला वाहिलेलं आयुष्य अशीच त्यांची जीवनपद्धती होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असूनसुद्धा त्यापासून सतत दूर राहणारी कित्येक माणसं असतात. वास्तविक त्यांच्याकडं ज्ञान असतं, वकूब असतो, यश असतं, कौशल्य असतं, पण तरीही ते त्याचं भांडवल करत नाहीत. स्वतःच्या यशाविषयी स्वतःहून एक अक्षर सांगत नाहीत, पुढं पुढं करत नाहीत, स्वतःचं प्रस्थ तयार करत नाहीत आणि लोकांनाही स्वतःविषयी असलं काही करु देत नाहीत. हाच तर त्यांचा सगळ्यात मोठा आणि त्यांच्याकडून आवर्जून घेण्यासारखा सद्गुण असतो.
डॉ. कलाम, स्व. बाबा आमटे, स्व. दाजीकाका गाडगीळ, स्व. श्रीनिवास खळे, उस्ताद बिस्मिल्ला खाँ साहेब, अत्यंत साधी राहणी असणारे स्व. मनोहर पर्रीकर अशी कितीतरी उदाहरणं देता येतील. ही माणसं त्यांच्या अंगच्या गुणांमुळेच लोकांसाठी प्रेरणास्थान बनली, आदर्श बनली. आदर्श होण्यासाठी म्हणून त्यांनी हेतुपूर्वक काही केलं नाही. स्वतःचं प्रस्थ तयार करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तो मार्ग जाणीवपूर्वक टाळला.
जसजशी आपली सोशल अकाउंट्स तयार झाली, तसतशी आपली इतरांना दाखवण्याची धडपड सुरू झाली. राहणीमान जगाला दाखवण्याचा पायंडा पडला. खरंखुरं जगण्यापेक्षा नसलेलं दाखवण्याची इच्छा मनात कायमची मुक्कामालाच येऊन राहिली. आणि तीच कृत्रिमता आता गळ्यापर्यंत आली आहे.
लोकांचे डोळे दिपवून टाकून मिळवलेला आनंद किंवा प्रतिष्ठा कशी आणि कितपत टिकेल ? आणि त्यासाठीच सतत जगत राहिलो तर खरं समाधान तरी कुठून मिळणार? खरं समाधान प्रत्यक्ष जगण्यातूनच मिळवायचं की केवळ त्याच्या आभासातच जगत राहायचं, हे आता आपणच ठरवायला हवं.
लोकांवर सतत इम्प्रेशन मारत बसण्याचा शौक कितीही गोड वाटत असला तरीही नंतर त्याची ओझी झेपण्यापलीकडं जातात. आणि ते नाटक फसलं की, खोटेपणा उघडा पडतोच. म्हणूनच, कृत्रिमतेच्या स्टिरॉइड्सचे न परवडणारे साईड इफेक्ट्स टाळायचे असतील तर, जगण्याचं हे शहाणपण जितक्या लवकर आत्मसात होईल, तितकं उत्तम.
© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,
संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.
8905199711, 87697 33771
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈