सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ वाड्यातली दिवाळी… ☆ सुश्री शीला पतकी ☆
७६२ दक्षिण कसबा भाग, काळी मशीद, या ठिकाणी आम्ही राहत होतो एकाला एक असलेले दोन वाडे जोडून होते मालक राहत असलेल्या वाड्यातून आमच्या वाड्यात येण्यासाठी एक चोरवाट होती. एका घराच्या खोलीमध्ये ती वाट उघडत असे तिथे एक कपाट होतं अगदी हिंदी सिनेमा प्रमाणे ते कपाट पुढे सरकवलं की मालकाच्या घरात जायचं जिना असे. अशा दुहेरी वाड्याचा उपयोग रझाकार जेव्हा सोलापूरला होते तेव्हा त्या दंगलीच्या वेळी लोकांना खूप झाला त्याच्या ऐकलेल्या गोष्टी कधीतरी पुन्हा सांगेन
तर वाड्यामध्ये दिवाळी साजरी व्हायची ती आमची पहिली सत्र परीक्षा म्हणजे सहामाही परीक्षा सत्र हा शब्द अलीकडे आलाय तर ती झाली की वाड्यातली सगळी पिलावळ एकत्र जमायची. मग तिकडे सो कॉल मीटिंग लावायच्या साधारण 25 ते 30 लहान मुले आम्ही होतोच 15 वयोगटापासून ते अगदी तीन-चार वर्षापर्यंत. मग सुरुवात व्हायची वर्गणी जमा करण्यापासून साधारण दोन आणि चार आणे अशी ऐपतीप्रमाणे वर्गणी गोळा होत असे. त्यातून वाड्याचे मालक जरा जास्त द्यायचे त्या पैशातून पिवडी नावाचा एक रंग मिळत असे त्या रंगाने वाडा रंगवायचा तत्पूर्वी आधी जाळ्या काढून तो स्वच्छ झाडून घ्यायचा 12 बिराडकरूंचा तो वाडा दोन मजली सगळ्या भिंती वगैरे सगळं झाडून घ्यायचं मग वाड्यात एक पेंटर राहत होते खरंतर ते खूप महान होते बुगाजी पेंटर ते बालगंधर्वांचे पडदे रंगवण्याचे काम करीत त्यांची नातवंड तीही त्याच उद्योगात हातात प्रचंड कला त्यांच्या मार्गदर्शनाखाली काथ्याच्या ब्रशने वाडा रंगवला जायचा भंग्याकडून संडास स्वच्छ करून घेतले जायचे कारण पूर्वी वाड्याचा तोंडाशीच संडास असायचे त्यानंतर वाड्यासमोरचा नगरपालिकेचा रस्ता नगरपालिकेत जाऊन पत्र देऊन स्वच्छ केला जायचा मुरूम टाकण्याविषयी त्यांना बजावण्यात यायचे मग त्यांनी मुरूम टाकला की आम्ही ती चालून चालून जमीन धुमस करून घेत असू. त्यामुळे तिथे आम्हाला रांगोळी काढायला येत असे या बुगाची पेंटरच्या घरची मुलं रांगोळी काढण्यात वाकबगार पाडवा भाऊबीज लक्ष्मीपूजन या दिवशी आमच्याकडे वाड्यासमोर ती दृश्य साकारणारी रांगोळी असायची. हे सगळं आता अलीकडे नंतर आले भाऊबीजेची रांगोळी बघायला तर आमच्या वाड्यासमोर गर्दी व्हायची.
अशी सुंदर सगळी व्यवस्था झाली की मग घराघरातून फराळाचे वास यायचे भाजणी मसाले कुटणे इत्यादी कामे सुरू व्हायची जात्यावर दळणे उखळात कांडणे. काही गोष्टी धुवून वाळवन करणे घरात सावलीत अनारश्याच्या पिठासाठी तांदूळ पसरून एका चांगल्या पांढऱ्या शुभ्र फडक्यावर घालणे आणि मग ते उखळात गुळ घालून कुटणे असे बरेच प्रोसेस सुरू होत असत.
आम्ही मुले पणत्या करणे, त्याच्यावरती पणत्या भिजत घालणे आकाश कंदील बनवणे. . . आमच्या वाड्यात प्रभाकर आणि बंडू नावाची दोन मुले होती ती आकाशकंदील बनवत असत. ते बनवत असताना अत्यंत भक्तिभावाने आणि आदराने आम्ही त्यांच्याकडे पाहत असू. एक मोठा आकाशकंदील वाड्यात बांधला जायचा. प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे छोटे-मोठे कंदील असायचे. दारासमोर रांगोळी काढायला कोणाला दार नव्हतं. समोरची गॅलरीचे दोन फूट जागा त्यामुळे खाली काढलेली सामुदायिक रांगोळी किंवा उंबऱ्यात काढलेली छोटीशी रांगोळी एवढाच रांगोळीचा संबंध !
एका बाथरूममध्ये तीन बिऱ्हाडं आंघोळ करायची. त्यासाठी रात्री पाण्याची पिप भरून ठेवले जायचे. त्या तीन दिवसात मात्र अजिबात कोणी भांडत नसे, सोयी गोयीने प्रत्येकाच्या बंबातले कोणाचेही पाणी घेतले तरी चालत होते आणि सकाळी सहापूर्वी सगळ्यांच्या आंघोळी व्हायच्या. मग फटाके उडवण्याचा कार्यक्रम व्हायचा. मग फराळ…. फराळाची ताटे पहिल्याच दिवशी शेल्याने झाकून (विणलेल्या) एकमेकांच्या घरी जायचे. आता ते एवढे एवढे पाकीट मध्ये बांधून देतात तसं नव्हतं. मोठ्या ताटात सगळे पदार्थ असायचे …. चकली चिवडा करंजी अनारसे शंकरपाळ्या कडबोळी चिवड्याचे दोन-तीन प्रकार शेव. . . ताट कसे गच्च भरलेलं असायचं. वर्तमानपत्रात इतर जे कोणी सेवक असत त्यांच्यासाठी म्हणजे रामोशी, त्यानंतर वाडा साफ करणारा माणूस, कचरा उचलणारा माणूस, यांच्यासाठी पुड्या बांधल्या जायच्या. हे काम प्रत्येक घरी चालत असे. चार दिवस कुणी कुणाच्याही घरी फराळ करत असे. . . . दिवाळी संपली की मग प्रत्येकाच्या घरी फराळाचे निमंत्रण चकली चिवडा लाडू. आमच्या घरी मात्र आई सगळ्यांना उपीट करत असे … चकली चिवडा लाडवाबरोबर गरम गरम उपीट आणि मुख्य म्हणजे आमच्याकडे बसायला थोडीशी गच्ची होती, त्यामुळे तिकडे मस्त मैफिल जमत होती. वडिलांचे मित्र त्यांचा फराळ, आईच्या मैत्रिणी, आमचे मित्र मैत्रिणी, आमच्यापेक्षा तरुण मुली असलेल्या आमच्या घरातल्या बहिणी भाऊ त्यांचे मित्र मैत्रिणी, असे चार-पाच फराळाच्या पार्ट्या व्हायच्या. जेवायला रोज टोमॅटो घातलेली आमटी संध्याकाळी असायची. आमटी आणि भात हे संध्याकाळचे साधे जेवण असे.
दिवाळी अंकाची रेलचेल … मामाची लायब्ररी होती त्यामुळे दोन-तीन दिवाळी अंक सहज आमच्या हाती लागत असत. पालथे पडून दिवाळी अंक दुपारभर वाचणे हा कार्यक्रम. त्यानंतर दिवाळी संपली की मग उरलेल्या सर्व फराळांचा विचार करून बाहुला बाहुलीचे लग्न, आमच्या वाड्याचे मालक हुंडेकरी यांची एक मोठी गच्ची होती त्या गच्चीवर लावायचे. दोन गच्ची होत्या एक वरची आणि एक खालची. एकीकडे वधू पक्ष – एकीकडे वर पक्ष. आमच्या घरात एक तीन चाकी सायकल होती त्यावरून वरातीची व्यवस्था केली जायची. पताका लावल्या जायच्या. सगळे वाड्यातली मोठी माणसं सुद्धा लग्नाला झाडून हजर असायचे. लग्न झाल्यानंतर सगळे विधी मात्र व्यवस्थित केले जायचे आणि मग वरात काढली जायची. वाड्यातील ही सर्व मंडळी काडेपेटी टिकलीच्या डब्या याच्यामधून पैसा 2 पैशाचा आहेर पॅकिंगसह आम्हाला करत असत त्यामुळे आपण खरोखरच लग्न लावले असे वाटत असे. बाहुला बाहुली सजवण्याचे काम हे फार नेटाने केले जाई. मग गच्चीवरती आमच्या मालकीण बाई सर्वांसाठी पोहे उपीट चिवडा यासारखे पदार्थ करून पत्रावळीचे अर्धे अर्धे तुकडे करून सर्वांना फराळ दिला जात असे. . तेच लग्नाचे जेवण होय.
इथे पावे तो निम्मी सुट्टी संपलेली असायची. मग आमच्या वाड्यामध्ये राहणाऱ्या राणूअक्का या नावाच्या एक बाई होत्या, एकट्याच राहत असत त्या. अतिशय देखण्या होत्या. . स्मिता तळवळकरसारख्या त्या दिसायच्या. मी नेहमी त्याना म्हणायची. . ‘ यांना ना छत्रपती शिवाजी महाराजांवर चित्रपट काढला तर त्यात कामाला घ्यायला पाहिजे. ‘ इतक्या सुंदर होत्या. त्यांच्या घरी चूल असायची आणि शेगडी. आम्ही सगळी मंडळी म्हणजे लहान मुलं घरून गुळ डाळ मसाले वगैरे आणून अगदी कणीकसुद्धा त्यांच्या घरी जमा करीत असू आणि म्हणायचो की राणूअक्का तुमची पुरणाची पोळी झाली पाहिजे आणि कटाची आमटी. त्यांची कटाची आमटी खाल्ली की अर्धा तास हात झिनझिनला पाहिजे अशी मस्त तिखट असायची. मग कटाची आमटी आणि पुरणाची पोळी, बटाट्याची भाजी असा बेत. त्यांच्याकडे एक गोठा होता त्या गोठ्यात पत्रावळ्यावरती होत असे ती 40 माणसाची म्हणजे मुलांची पंगत उठायची. फार प्रेमाने करायच्या. त्या जातीने धनगर होत्या. वाड्यात कधी कुणी कुणाची जात विचारली नाही आणि कधी ती जाणवली सुद्धा नाही. माळी धनगर सोनार वाणी लिंगायत सारस्वत ब्राह्मण मराठा गुरव अशा अठरा पगड जातीने वाडा राष्ट्रीय एकात्मतेची साक्ष देत होता. वाड्याच्या मालकीणबाई साक्षात लक्ष्मी होत्या सुकन्या मोने इतक्या देखण्या होत्या. त्यांचे डोळे आणि भुवया अतिशय कोरीव, काळेभोर डोळे, छान कुरळे केस – साक्षात लक्ष्मी वावरते आहे असं वाटायचं आणि तितकीच पोटात माया. पाच रुपये भाडं सुद्धा न परवडणारी माणसं वाड्यात सुखाने नांदायचे. मालकाने कधी तगादा केला नाही. उलट एखाद्याच्या घरी कमी असेल तर मालक ते आणून देत असत. इतका माया करणारा मालक जगात कुठे नसतील. . कोणाला जागा सोडण्याचा तगादा नाही, कुणाला भाड्यासाठी किरकिर नाही, ते तरी खूप श्रीमंत होते असं नाही, पण मन मात्र खूप मोठं होतं. सगळ्या पोरी बाळी बघायचे कार्यक्रम त्यांच्याच घरी व्हायचे. सगळा वाडा त्यांना भाऊ आणि वहिनी असेच म्हणत होता, आणि ती नाती त्यांनी शेवटपर्यंत निभावली. करोडोंची स्टेटस असलेली ती मंडळी पण आजही त्यांची पुढची पिढी सुद्धा अतिशय विनम्र आहे. राणूअक्काची पुरणपोळी संपली की मग आमचे उरलेल्या फराळांची भेळ असायची. कार्यकर्ते बाईंची छोट्या मुलांची लायब्ररी असायची, कॅरम बोर्ड खेळायचा, भोवरे फोडायचे, काचा पाणी खेळायचे, नाटक बसवायचे असे सगळे करण्यामध्ये आमची सुट्टी मजेत जाई…
… अशी दिवाळी पुन्हा कधीच झाली नाही. लाईफबॉय साबणाच्या वडीच्या डब्यात मोती साबण आणि दुसऱ्या डब्यात मैसूर सॅंडल दिसला की खूप आनंद व्हायचा. हळूहळू पंधरा दिवसात त्या वड्या झिजायच्या, मग सुट्टी संपताना पुन्हा त्यामध्ये लाईफबॉय ठाण मांडून बसायचा वर्षभर. . . पण त्या लाईफ बॉय ने उर्वरित वर्षभर आमच्या शरीरावरील घाण स्वच्छ केली, तजेला दिला, आम्ही प्रसन्न झालो. त्यालाही आमच्या आयुष्यात खूप मोठे स्थान आहे.
अशी ही सुंदर दिवाळी साडेतीन हजार स्क्वेअर फूटच्या बंगल्यात, दारासमोरच्या प्रशस्त गाडीत ढीगभर खरेदी एकावेळी करून आणावी अशी पैशाची श्रीमंती असतानाही आज आम्ही बघू शकत नाही. त्या दिवाळीची चव अंगावर जिभेवर मनामध्ये रेंगाळतेच आहे नव्या कपड्याना तो वास येत नाही. टाटाच्या तेलाच्या बाटलीचा वास भारी तेलाने नाही… नाही म्हणायला फक्त एक गोष्ट टिकून राहिली ती म्हणजे मोती साबण … मैत्रिणींनो आज मी जो हा लिहिलेला आहे तो बुद्धीने नाही.. अंतःकरणांनी लिहिलेला आहे कदाचित त्याच्यामध्ये समन्वय असेल नसेल, पण त्या सगळ्या भावना मात्र व्यक्त झाल्या. त्या आठवणी डोळ्यासमोर येऊन पुन्हा एकदा शब्दात चितारल्या गेल्यात !
मला वाटतं आपल्या पिढीची सर्वांची दिवाळी थोडीफार अशीच होती जिने अनेक मनं आजतागायत उजळून ठेवली आहेत. आताच्या पिढीला फुसके फटाके शोधून दुपारी सगळी घरातली मंडळी झोपली की ते उडवण्याचा कार्यक्रम माहित नाही… किंबहुना त्यांना काटकसरीने काही वापरणेच माहीत नाही… समृद्धी आली ना की सुख संपतं… हे मात्र खरे की मला वाटते सुख असले तरी समाधान नसतं… हे तर अधिक खरे नाही का?
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈