सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

??

अशी ही एक दिवाळी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

दिवाळीच्या आधीचा दिवस ! सगळीकडे फटाक्यांचे आवाज ऐकू येऊ लागले होते. वसुबारसपासूनच

आकाश कंदिल आणि दिव्यांच्या माळा वातावरण सुशोभित करत होत्या. दारासमोर रांगोळ्या दिसत होत्या. नवीन कपड्याने बाजार गजबजलेला होता. दिवाळीच्या पणत्यांनी घरे उजळून निघाली होती. घराघरातून फराळाचे वास दरवळत होते. एकंदर वातावरण दिवाळीच्या उत्साहाने भारून गेले होते आणि मी मात्र हॉस्पिटलच्या दिशेने चालले होते, आज सासूबाईंची तब्येत कशी असेल या विचारात !

आठच दिवसापूर्वी सासूबाईना अचानक पॅरॅलेसिसचा अटॅक  आला होता, तसे त्यांना ब्लडप्रेशर होतेच. माझे मिस्टर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मेडिकल आॅफिसर म्हणून काम करत असल्यामुळे आम्ही त्यांना सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले होते. माझे मिस्टर तिथेच काम करत असल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटल आम्हाला घरच्यासारखेच होते! तिथे नेल्याबरोबर लगेच स्पेशल रूम, ऑक्सिजन, सलाईन सर्व चालू झाले. मॉनिटरिंग नीट होत असल्यामुळे त्यांना लवकरच आराम वाटू लागला. तरीही आठ दिवस हॉस्पिटलमध्ये राहावे लागल्याने आम्ही दिवाळीपर्यंत दवाखान्यातच होतो. त्या काळात अनुभवली ती  हॉस्पिटलची दिवाळी! आमच्या घरातील सर्वजण आळीपाळीने दवाखान्याच्या वेळा सांभाळत होतो. पण रात्रपाळी माझ्याकडेच होती. ज्या स्पेशल रूममध्ये ठेवले होती ती रूम वाॅर्डच्या  दाराजवळच असल्याने मला खोलीतूनच बाहेरील सर्व हालचाल दिसत असे.

खरंच, हॉस्पिटलचे वातावरण कसे असते ना! त्यातून सिव्हिल हॉस्पिटलचे! केव्हाही पेशंट्स येत- जात असत, कॅज्युअलिटी डिपार्टमेंट 24 तास चालू असे, कधी एक्सीडेंट  पेशंट तर कधी इमर्जन्सी पेशन्ट्स तर कधी डेड बॉडी अचानक येत! त्यांच्यासोबत पोलीसही आलेले असत. सतत काहीतरी घडामोडी चालू असत, पण मी होते त्यावेळी दिवाळी जवळ आल्याने जरा वेगळे वातावरण होते. हॉस्पिटलमध्ये वाॅर्ड स्वच्छ करणे, सुशोभित करणे यासंबंधी स्पर्धा लावलेल्या होत्या. त्यामुळे एरवी गॉज् तयार करणे, इंजेक्शन साठी कापसाचे बोळे तयार करून ठेवणे, ग्लोव्हज पावडर मध्ये घालून ठेवणे अशी कामे करणाऱ्या आया आता वाॅर्डच्या सुशोभीकरणाकडे वळल्या होत्या. रात्री जागून रंगीबेरंगी कागदांच्या पताकांच्या माळा तयार होत होत्या, प्रत्येक वार्डमध्ये आकाश कंदील लावले होते, वाॅर्डच्या दारात रांगोळ्या घातल्या होत्या. मेण पणत्या तेवत होत्या. आपले दुःख, आजारपण विसरून आजारी लोक आणि त्यांचे नातेवाईकही उत्साहाने यात जमेल तेवढा भाग घेत असत. मी रोज झोपायला जात असल्याने मला हे सर्व रात्री उशिरापर्यंत बघायला मिळत होते. नर्सेस आया आपली कामे उरकून दिवाळी सजावटीला हातभार लावत होत्या. आनंद कुठेही निर्माण करता येतो  आणि ती माणसाची मूलभूत प्रवृत्ती आहे हे खरं आहे!

दिवाळी घरी काय आणि इथे काय! जिथे आनंद तिथे दिवाळी! दिवाळीच्या दिवशीच सासूबाईंना डिस्चार्ज देणार होते, त्यामुळे आधीच्या रात्री मी हे सर्व पाहत होते. एरवी कोण सिव्हिल हॉस्पिटल ला जाते! सकाळी सकाळी फराळाचे खोकी तिथे आली होती. काही वाॅर्डात फळांच्या करंडयाही दिसत होत्या. लहान मुलांच्या वॉर्ड मध्ये तर बिस्कीट पुडे, फराळांची खोकी याची रेलचेल दिसत होती! आपापल्या परीने आनंदाची दिवाळी चालू होती. पहाट झाली, सनई वादनाची रेकॉर्ड लागली आणि आम्ही घरी जायच्या तयारीला लागलो. तिथे नेलेले सामान भरणे, डिस्चार्ज पेपर तयार करून घेणे, ॲम्बुलन्सची वेळ ठरवून घेणे वगैरे चालू होते. हे स्वतः ड्युटीवर असल्याने सकाळी कॅज्युअलिटी संपवून ते आमच्याबरोबर घरी येणार होते.

इकडे घरी काय चालले आहे याची कल्पना नव्हती. पण माझा भाऊ आणि वहिनी मी दवाखान्यात असल्यापासूनच घरी आलेले होते. त्यामुळे मला मुलांचे टेन्शन नव्हते. तसेच माझे दीर-जाऊबाईही तिथेच रहात होते. दिवाळीच्या सर्व फराळाचे सामान वहिनी घेऊन आली होती. आम्ही घरी पोहोचलो तेव्हा वहिनीने दारात सडा रांगोळी केली होती. सासूबाईंची तब्येतही आता बरी होती. त्यामुळे आमच्यामध्ये एक उत्साह निर्माण झाला होता. सासुबाईंची एका खोलीत व्यवस्था लावली आणि आम्ही जरा निवांत झालो. त्या पहिल्या अटॅक नंतर चार-पाच वर्षे सासूबाई होत्या. जवळपास 30 वर्ष होत आली या गोष्टीला! पण दिवाळी आली की  हॉस्पिटलमध्ये साजरा केलेला दिवाळीचा पहिला दिवस आठवतो. एरवी आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हटले की थोडे नाराजच असतो, पण तिथे राहून अनुभवलं की लक्षात येते तेथील सर्व लोक किती व्यस्त असतात. त्यांनाही सणवार सोडून  ड्युटी करावी लागत असते. सतत आजारी माणसांच्या सेवेत राहूनही आनंदाचे काही क्षण ते वेचत असतात आणि आनंद घेत असतात. या सिस्टर्स, ब्रदर्स आणि इतर स्टाफ सतत कार्यरत असतो. पेशंटची कुरकुर चालू असते, ते सर्व त्यांना संयमाने ऐकावे लागते अर्थात तिथेही काही काम चुकार लोक  असतात पण ते प्रमाण कमी असते. या आठ दिवसात हॉस्पिटलच्या वातावरणाबरोबरच तिथली दिवाळीची तयारीही मला पाहायला मिळाली !

अलीकडे आपण कोरोनाच्या काळात हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स, नर्सेस आणि सर्व स्टाफ किती काम करीत होते हे पाहिले, ऐकले. हॉस्पिटलची सेवा म्हणजे लोकसेवेचे, चिकाटीचे, काम ! संयमाने काम करीत असलेली  ही मंदिरे आहेत ! त्याबद्दल आपण कृतज्ञ राहिले पाहिजे. हे सर्व अनुभव स्वतः घेतले म्हणून त्याबद्दल आत्मीयता वाटली आणि अशी ही एक आठवणीतील दिवाळी कायमच माझ्या स्मरणात राहिली !

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments