श्री मयुरेश उमाकांत डंके

? मनमंजुषेतून ?

☆ असा डोसा नेहमी मिळो… ☆  श्री मयुरेश उमाकांत डंके ☆

“मयुरेश, तू जिंकलास. आम्हीं हरलो. त्यामुळं, म्हणशील तेव्हा आणि म्हणशील तिथं डोसा खायला जाऊया. ”

आज सकाळी आठ वाजता फोन आला अन् मी मनापासून हसलो. बायकोनं चेहऱ्यावर नुसतंच प्रश्नचिन्ह आणलं. “तोच ठरलेला फोन. पण आज मी जिंकलो. ते हरले. ” मी हसत हसत म्हटलं.

“अन् ते कसं काय? ”

“देवाची कृपा.. ” असं म्हणून सकाळी मी त्या विषयाला पूर्णविराम दिला.

त्याचं असं आहे की, रोज सकाळी मी चालायला जातो. तेव्हां अनेक परिचित माणसं भेटत असतात. मौन व्रतात चालायचं असल्यामुळं तेव्हां बोलणं होत नाही, पण नंतर चहा घेताना थोड्या गप्पा होतात. जवळपास सगळेच माझ्या वयाच्या दुप्पट किंवा त्याहूनही ज्येष्ठ असतील. रोज “बिनसाखरेचा चहा दे रे” असं ठासून सांगून त्या चहावाल्याकडून दीड चमचा साखर एकस्ट्रा घेणारी महामिश्कील मंडळी सगळी.. तो सकाळचा पहिला चहा फार भारी असतो.

अशीच ती १४ ऑगस्टची सकाळ.. एक काका त्या दिवशी जरा गरम होते. ‘घरातली नातवंडं किंवा मोठी माणसं सुद्धा हातातला स्मार्टफोन सोडतच नाहीत. त्या फोन पुढं त्यांना कुणाचीच किंमत नाही. घरी आल्या-गेल्यांशी चार गोड शब्द सुद्धा ते बोलत नाहीत. ‘ अशी त्यांची तक्रार… “अरे, घरातल्या घरात सुद्धा मेसेज पाठवतात. ” ते रागावून म्हणाले. अशा वेळी आपण काहीही न बोलता नुसतं शांत बसायचं असतं, हे मला चांगलं ठाऊक आहे.

“काल मला माझ्या नातीनं तिच्या खोलीतून मेसेज पाठवला. जेवायला कधी बसायचं म्हणून.. ही कुठली पद्धत? ” ते म्हणाले.

“अरे, मला तर आज सकाळी घरातून बाहेर पडतानाच मेसेज आलाय – फिरून झाल्यावर घरी येताना बूट बाहेरच काढा. पावसामुळं भरपूर चिखल असतो. दारातून आत आणू नका. ” दुसरे एकजण म्हणाले.

“मग बरोबरच आहे ते. ” मी म्हटलं.

“अरे, निरोप बरोबरच आहे. पण तो प्रत्यक्ष द्यायला काय होतं? मुलगा डायनिंग टेबलाशी चहा घेत बसला होता. त्यानंच पाठवला मेसेज. ” ते काका खरोखर चिडलेले होते.

आजकाल हे सगळं नित्याचंच झालंय. साधनं इतकी उदंड झाली की, त्यात संवादच आटला. आता बऱ्यापैकी उरलीय ती औपचारिकता. ‘तुमच्या वेळेला तुम्ही वागलात. आता आमची वेळ आहे. ‘ असं जाणवून देण्याकडे तरुणाईचा कल वाढतो आहे. त्यामुळं, घराच्या उंबरठ्याच्या आत निराळेच प्रश्न उभे राहतायत आणि त्याची रामबाण उत्तरं सध्यातरी उपलब्ध नाहीयत. ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वाढतायत, त्याचं एक कारण हेच आहे की, ‘त्यांची उपयुक्तता संपली आहे’ असं इतरांना वाटतं आणि त्यांना स्वतःलाही वाटतं.

पन्नास-साठ वर्षं आयुष्य जगलेली माणसं खरोखरच अशी निरुपयोगी होऊ शकतात का? हा खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे. कदाचित नव्याने पैसे कमावण्यासाठीची त्यांची क्षमता उतरणीला लागलेली असेलही, पण तेवढ्या एकाच गोष्टीवर माणसांच्या आयुष्याची उपयुक्तता ठरवता येत नाही. अर्थार्जन करण्याची क्षमता कमी झाली असली तरीही ते निर्धन झालेले नसतात, हेही पक्कं लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यांचा अनुभव, त्यांची जीवनशैली, त्यांचं ज्ञान सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नक्कीच मौल्यवान ठरु शकेल आणि हे मुळीच नाकारता येणार नाही. म्हणूनच, “आता आम्ही अडगळ झालो, जुनं फर्निचर झालो, डस्टबिन झालो” असा समज करून घेण्याचं काहीच कारण नाही आणि गरजही नाही.

“काका, तुमच्या कुटुंबात मुलांनी, नातवंडांनी तुमच्याशी चांगलं वागावं, तुमच्याशी बोलावं असं तुम्हाला मनापासून वाटतं ना? ते शक्य आहे. पण थोडा प्रॉब्लेम आहे. ” मी हळूच माझं प्यादं पुढं सरकवलं.

“मला खरंच वाटतं की, घरातल्यांनी थोडा तरी वेळ आम्हाला दिला पाहिजे. पण कुणाकडेच आमच्यासाठी वेळ नसतो. उलट सगळेच म्हणतात, ‘आम्हीं खूप बिझी आहोत. ‘ आता काय करायचं? ”

“तुमची कष्ट घ्यायची तयारी असेल तर प्लॅन सांगतो. रिझल्ट १००% मिळेल. पण तुम्हाला वेळ द्यावा लागेल. आणि जर हा प्लॅन सक्सेसफुल झाला तर मी सांगेन तिथं पार्टी द्यावी लागेल. मान्य आहे का? ” मी म्हटलं.

सगळे तयार झाले आणि आम्ही प्लॅन ठरवला. १५ ऑगस्ट पासून सुरुवात झाली. प्रत्येकानं एकेक काम वाटून घेतलेलं होतं. फुलवाती तुपात भिजवून त्याचे मोल्ड्स तयार करणं, ‘संपूर्ण चातुर्मास’ मधून निवडक सात आरत्या काढून त्या टाईप करुन घेणं, माळावस्त्रं कशी तयार करतात हे शिकणं, फुलांची तोरणं आणि गजरे करायचा सराव करणं अशा छोट्या छोट्या कृती घरी सुरु झाल्या.

तीन चार दिवसांतच घरात हे सगळं शांतपणे, एकाग्रचित्तानं सुरु असलेलं बघून नातवंडांचे प्रश्न सुरु झाले. “ह्याला काय म्हणतात? हे कसं करायचं? का करायचं? त्याचा उपयोग काय? हे विकत मिळत असताना आपण घरी का करायचं? ” अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. पण कसलीही लेक्चरबाजी न करता, ‘आमच्यावेळी अमुक होतं – तमुक होतं’ असा सूर कटाक्षानं न लावता, त्यांना समजावून सांगायचं आणि त्यांना दररोज थोडावेळ तरी सहभागी करुन घ्यायचं असं आमचं ठरलं होतं. मग आमच्या योजनेत काही आज्या सुद्धा सामील झाल्या. खोबरं किसायला शिकवणं, तांदळाची पारी करायला शिकवणं, पंचखाद्याची तयारी, रांगोळीत काढायची शुभचिन्हं शिकवणं असा एक आणखी नवा योग जुळला.

आजी-आजोबा आणि नातवंडं अशी हळूहळू एक टीम झाली. रोज शाळा-कॉलेज मधून आलं की, एखादा तासभर गणपतीची तयारी सुरू झाली. शिकताना मजा यायला लागली. शिकता शिकता भरपूर गप्पा सुरु झाल्या. कुठलाही प्रश्न आला आणि त्याचं मुलांना पटेल असं उत्तर आपल्याला ठाऊक नसेल तर प्रश्न टाळायचा नाही. “उद्या सांगतो” असं म्हणायचं आणि तो प्रश्न मला पाठवायचा असं ठरलं होतं. त्यानुसार रोज प्रश्न यायचे. मी उत्तरं पाठवायचो. मग दुसऱ्या दिवशी मुलांचं शंकानिरसन..!

कासवगतीनं का होईना पण एक बदल घडत होता. मुलं घरी आल्यावर त्यांच्या त्यांच्या खोल्यांमध्ये जाऊन बसायची, ते कमी झालं होतं. बाहेर हॉलमध्ये बसल्यावर किंवा जेवताना सुद्धा त्यांच्या हातांना चिकटलेले मोबाईल फोन आता थोडावेळ तरी सुटत होते. घरी आल्यावर ” काहीतरी खायला दे” असं म्हणून तडक आपल्या खोलीत निघून जाणारी मुलं आता “चला, आज काय करायचंय? ” असं विचारत होती. त्यांच्या खोल्यांची दारं पूर्वी सगळ्यांसाठी बंद असायची, ती आता उघडी राहायला लागली. आरास कशी करायची याचे प्लॅन्स नातवंडांच्या खोल्यांमध्ये बसून सुरु झाले. हे सगळं घडत होतं, ते नक्की सुखदच होतं. पण ते आळवावरचं पाणी ठरु नये, याचं मला टेन्शन होतं. त्यामुळं, रोज रात्री मी सगळ्यांच्या मेसेजेसची वाट बघत बसायचो.

बघता बघता गणपती आले. घरोघरी उत्सव साजरे व्हायला सुरुवात झाली. कुणाच्या घरी दीड दिवसांचा गणपती होता, तर कुणाकडं पाच दिवसांचा.. पण यावर्षी एक मोठ्ठा चमत्कार झाला, तो आरतीच्या वेळी.. घरातल्या नातवंडांच्या पाच आरत्या तोंडपाठ..! कुणीही हातात पुस्तक घेतलं नाही किंवा नुसत्याच टाळ्या वाजवत “जयदेव जयदेव” असं मोठमोठ्यानं म्हटलं नाही. मुलांनी नैवेद्याची पानं वाढली. अगदीं उजव्या-डाव्या बाजू परफेक्ट वाढल्या. बिल्डिंग मधल्या इतरांना घरी जाऊन दर्शनाला येण्याची निमंत्रणं दिली, तीही व्हॉट्स ॲप न वापरता.. ही मोठी गोष्ट होती. पंधरा दिवसांच्या एका पुढाकारानं घरातलं वातावरण बदललं, नाती घट्ट झाली.

मी आमच्या घरच्या गणपती उत्सवाच्या निमित्तानं सोलापूरला होतो. त्यामुळं, या आनंदी उत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव मला घेता आला नाही. पण एक चांगला बदल या निमित्तानं घडल्याचा मला फार अभिमान वाटला.

लावलेली पैज मी जिंकलो होतो. पैज जिंकल्याचा आनंद तर आहेच. पण त्याहीपेक्षा जास्त समाधान आहे ते दोन टोकं जुळवल्याचं. एक टोक “आम्ही आता निरुपयोगी” या मनस्थितीतलं, अन् दुसरं टोक “आमच्या हातात फोन, इंटरनेट आणि पैसा असला की आम्हाला कुणाची गरज नाही” या मनस्थितीतलं.. फार अवघड गोष्ट होती, देवाच्या कृपेनं ती साधली. “सत्यसंकल्पाचा दाता नारायण” असं म्हणतात, ते १००% खरं असल्याचा अनुभव मला आला.

आज रविवारी सकाळी फोन आला. उद्या डोसा खायला जायचंय..! उद्याचा डोसा माझ्या आयुष्यातला ‘द बेश्ट डोसा’ असेल…!

© श्री मयुरेश उमाकांत डंके, मानसतज्ज्ञ,

 संचालक-प्रमुख, आस्था काऊन्सेलिंग सेंटर, पुणे.

 8905199711, 87697 33771

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments