श्री प्रमोद वामन वर्तक

? मनमंजुषेतून ?

तोंडी लावणं ! 😅 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मंडळी लेखाचं शीर्षक परत एकदा नीट वाचा ! ते “तोंडी लावणं” असं आहे, “तोंडी लागणं” असं नाही, हे कृपया ध्यानात घेऊन पुढे वाचा, लेख पूर्ण वाचणार असलात तर, 😅 म्हणजे तुमचा गोंधळ होणार नाही ! “तोंडी लागणं” हा दुसऱ्या स्वतंत्र लेखाचा विषय असू शकतो, हे आपण सूज्ञ असल्यामुळे, कोणाच्याही तोंडाला न लागता, नक्कीच मान्य कराल. तर त्या “तोंडी लागण्यावर” पुन्हा कधीतरी, पण ते सुद्धा आपण तशी इच्छा प्रकट केली तरच, बरं का ! 😅 नाहीतर मला स्वतःला कोणाच्या(ही) तोंडाला स्वतःहून लागायची सवय अजिबातच नाही, याची खात्री असू दे ! असो !

“चल रे, पटापट पोळी खाऊन घे ! शाळेत जायला आधीच उशीर झालाय. ” आईच असं फर्मान आल्यावर, “तोंडी लावायला काय आहे गं ?” असा प्रश्न लहानपणी आपल्या तोंडून निघाल्याचे, माझ्या पिढीतील लोकांना नक्की आठवेल ! त्यावर “भाजी अजून शिजत्ये, तुला गूळ तूप देवू का ?” असं म्हणून आई गरम गरम पोळीवर लोणकढ तूप घालून, वर गुळाचा चुरा घालत असे !

आमच्या काळी “तोंडी लावण्याचे” सतराशे साठ वेगवेगळे प्रकार होते आणि त्यातला एक जरी प्रकार जेवतांना असला म्हणजे झालं, त्यावर आमचं अख्ख जेवण होतं असे! नुसत्या मेतकूटात दही घाला, लसणीच्या तिखटात दही घाला नाहीतर तिळकुटावर तेल घ्या, “तोंडी लावणं” तयार ! आणि सोबत जर भाजलेला, तळलेला नाही बरं, पोह्याचा किंवा उडदाचा पापड असेल तर काय, सोन्याहून पिवळं! मग त्या दिवशी दोन घास जास्तच जायचे ! कधीतरी नुसतं गावच्या कुळथाच पिठलं पण जेवणाची बहार उडवून जायचं ! जेवतांना तांदूळ किंवा बाजरीची भाकरी असेल तर त्याच्या बरोबर कांदा ठेचून, कापून नाही आणि नाका डोळ्यातून पाणी आणणारी फोडणीची मिरची असली की काम तमाम. त्यातून ती मिरची गेल्या वर्षीची चांगली मुरलेली असेल, तर मग त्या मिरचीतली चढलेली मोहरी त्याचा अनोखा स्वाद, डोळ्यातून पाणी आणि तिचा ठसका दाखवल्याशिवाय रहात नसे ! अचानक रात्री अपरात्री कोणी पाहुणा आला आणि तो जेवायचा असेल, तर आईचा दहा मिनिटात मस्त पिठलं आणि भात तयार ! पाहुणा पण पिठलं भात खाऊन वर मस्त ताक पिऊन खूष व्हायचा ! पिकलेलं मोठ केळ आणि गरम पोळी यांची चव, ज्यांनी हा प्रकार खाल्ला आहे त्यांनाच कळेल ! इतकंच कशाला, गरमा गरम पोळी बरोबर वर म्हटल्या प्रमाणे तूप गूळ किंवा तूप साखर म्हणजे जणू स्वर्ग सुख ! सासुरवाडी गेल्यावर खाल्लेली सासूबाईंच्या हातची दारातल्या टाकळ्याची किंवा शेगटाच्या पाल्याची पौष्टिक भाजी, यांची चव अजून जिभेवर आहे मंडळी ! कधीतरी गावच्या आमसुलाच, नारळाच्या दुधात बनवलेलं सार किंवा रात्रीच्या ताकाची मस्त गरमा गरम कढी, आहाहा ! आणि जर त्या कढीत भजी असतील, तर मग काय विचारायलाच नको ! त्या काळी नुसती मुळ्याची, गाजरची किंवा काकडी टोमॅटोची कोशिंबीर सुद्धा जेवणाची खुमारी वाढवत असे !

तर हा “तोंडी लावणं” काय प्रकार आहे, हे माझ्या पिढीतील लोकांना माहित असला आणि त्यांनी तो माझ्या प्रमाणे चाखला असला, तरी आताच्या नवीन पिढीला हे पचनी पडायला थोडं जडच ! त्यांच्या भाषेत या “तोंडी लावण्याला” हल्ली “साईड डिश” का असंच काहीतरी म्हणतात म्हणे ! त्यात पुन्हा काहींचे चोचले असतातच. म्हणजे पोळी बरोबर एकच सुख्खी भाजी चालत नाही त्यांना, दुसरी कुठली तरी एक रस्सा भाजी लागतेच लागते ! आणि आपण जर म्हटलं, “की अरे आमटी आहे ना, मग ती खा की पोळी बरोबर. ” त्यावर वरकरणी हसत “अहो आमटी भातावर घेईन की” असं उलट आपल्यालाच ऐकायला लागतं !

पण आता, गेले ते दिन गेले, असं म्हटल्या शिवाय माझ्या समोर काहीच पर्याय नाही मंडळी ! आता कसं आहे ना, बेचाळीस वर्ष सुखाचा संसार करून सुद्धा, स्वतःच्या बायकोला, आज आमटी किंवा भाजी बिघडली हे सांगण्याचं धारिष्टय होतं नाही माझं ! 😞 तुमची पण कमी जास्त प्रमाणात हीच अवस्था असणार, पण आपण ती कबूल करणार नाही, याची मला खात्री आहे ! पण ते आपल्या बायकोला आडवळणाने कसं सांगायचं, याच माझं एक गुपित आज मी तमाम नवरे मंडळींच्या फायद्यासाठी उघड करत आहे, ते लक्ष देऊन वाचा आणि वेळ आली की त्याचा उपयोग जरूर करा, हा माझा सगळ्या नवरे मंडळींना मित्रत्वाचा सल्ला ! 🙏

आज काल पुण्या मुंबईत बारा महिने चकली किंवा कडबोळी उपलब्ध असतात. हल्ली या पदार्थांचा दिवाळी ते पुढची दिवाळी हा अज्ञातवास आता संपला आहे ! 😅 त्यामुळे आपल्या आवडत्या दुकानातून, पुण्यात असाल तर कुठून हे सांगायची गरज नाही 😅 पण मुंबईकर आणि त्यात दादरकर असाल तर खूपच चांगले ऑपशन्स तुम्हांला available आहेत ! तर अशा एखाद्या आपल्या आवडत्या दुकानातून, एक एक चकली आणि कडबोळीचे पॅकेट घरी आणून ठेवा. ज्या दिवशी आमटी किंवा भाजी थोडी बिघडली आहे, असं जेंव्हा आपल्याला वाटेल तेंव्हा, “अगं, परवा मी ते चकलीच पाकीट आणलं आहे बघ, त्यातल्या दोन चकल्या दे जरा” असं अत्यन्त नम्रपणे बायकोला सांगावं ! आणि ती चकली किंवा कडबोळी भातात आमटी किंवा भाजी बरोबर खुशाल चूरडून खावी ! मंडळी मी छातीठोकपणे तुम्हांला सांगतो, त्या दिवशी भाजी किंवा आमटी बिघडली आहे हे आपण विसरून जाल आणि दोन घास जास्त खाऊन मला मनोमन धन्यवाद द्याल, याची मला 100% खात्री आहे ! 😅

शेवटी, तुमच्या सगळ्यांवर आणि अर्थात माझ्यावर सुद्धा 😅 अशी स्वतःच्या बायकोकडे वारंवार, जेवतांना चकली किंवा कडबोळी मागण्याची वेळ येऊ देवू नकोस, हिच खऱ्या “अन्नपूर्णा देवीला” प्रार्थना !

रसना देवीचा विजय असो !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
4.5 2 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments