श्री नितीन सुभाष चंदनशिवे

 

? मनमंजुषेतून ?

☆ तिचे पावसाळी ओठ… ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

मीरेच्या प्रेमाचं भजन गात गात वारा मंद वाहत होता. रात्रभर सुरू असलेली पावसाची रिमझिम थकून हळुवार झालेली असल्यामुळे गारवा गुलाबी झाला होता. पहाटेचं तांबडं आज फुटलेलं नव्हतं तर नटलेलं होतं. वर्षा ऋतुने मातीवर हात फिरवून अंगाई गायल्यामुळे माती चिखल झालेली होती. नव्या अंकुराला जन्माला घालण्यासाठी तिची तयारी सुरू होती. मी झोंबनाऱ्या वाऱ्याचा हात धरून नदीच्या किनारी पोहचलो होतो. संथ वाहणारी नदी आज माहेरवाशीनी सारखी लंगडी घालत पळत होती. तिचे दोन्ही किनारे झिम्मा खेळत असल्यासारखं जाणवत होतं. मी नदीत पाहता पाहता नदीचा केव्हा झालो कळलेच नाही.

नदीच्या पात्रातून बाहेर आलेली वाळू माझ्या तळपायाला कुरवाळत होती. काळजावर मोर पिस फिरतय असं वाटत होतं. वाऱ्याने जरा हलकासा वेग वाढवला. तसे गर्दी करून थांबलेले ढग वाट दिसेल तिकडं पळू लागले. मधून मधून एखादी चांदणी मला खुणावत होती. मी वर ढगात बघता बघता माझ्या डोळ्यात ढग कधी दाटले कळलेच नाही. कारण खुणावत राहणारी माझी चांदणी अजून आलेली नव्हती.

पाखरांचा किलबिलाट जाणवू लागला. तांबड्या रंगात घारी उडताना दिसल्या. कोकिळेने सूर लावायला सुरवात केली. तिच्या पैंजनांचा आवाज नदीकिनारी वाजू लागला. नदीची सळसळ त्या संगीतात हरवून गेली. तिच्या पावलांचा आवाज माझ्या कानावर आदळू लागला. श्वास गरम झाले. मी मागे वळणार तेवढ्यात तिने मागूनच मला गच्च मिठी मारली. तिचे दोन्ही हात माझ्या छातीवर विसावले. वाऱ्याने त्या हातांना गोंजारायला सुरवात केली. झटकन मी मागे वळलो. आणि तिच्या मिठीत विसावलो. नाकावर नाक अतिक्रमण करू लागलं. तिच्या डोळ्यात माहेरवाशीण झालेली नदी उसळताना दिसू लागली. तिच्या ओठावर पावसाळा तुडुंब भरलेला होता. त्या पावसाळ्यात माझे दुष्काळी ओठ मिसळून माझा दुष्काळ संपवायची हीच वेळ होती. मी ओठांना तयार केलं. तिने डोळे बंद केले. श्वासांनी जाळ काढायला सुरवात केली. मिरेच्या भजनात कृष्णाची नोंद झालेली वाऱ्याने कबुली दिली. पायावर पाय कधी आले कळलेच नाही. तिने टाच उचलली. आणि ओठ पुढे केले.

एवढ्यात आमच्या गल्लीत बोंबाटा झाला. पाणी आलं, पाणी आलं, मी पालथा पडून उशी आवळून धरलेली होती. आईने पाटीवर बुक्की हाणली. भजन गाणारा वारा डीजे वर नाचू लागला. उशी टाकून मी नळाकडे पळालो. एखादं मूल मुतावं तस नळातून पाणी येत होतं. आणि त्याच्याखाली हंड्यावर हांडे आदळत होते. अजून झिंज्या धरून युद्धाला सुरवात व्हायची होती. प्रत्येकीची पिपाणी सुरू झाली होती. मी मात्र त्या नळातून गळणाऱ्या पाण्याकडे पाहत आतल्या आत पाझरत होतो.

भजन गाणारा वारा, लंगडी खेळणारी नदी, पळणारे ढग, आणि माझी ती…इश्श आणि तिची मिठी…सगळं आईच्या बुक्कीने काच फुटावी तसं फुटून गेलेलं होतं. तिचे पावसाळी ओठ आठवत आठवत माझी जीभ कधी मिशिवर रेंगाळू लागली कळलंच नाही. एवढ्यात आमची आय बोंबलून म्हणली, कडू नंबरातच थांब. कुणाला मधी घुसू देऊ नकोस…मी सैनिकासारखा ताठ झालो. हातातली कळशी गच्च आवळून धरली. कुठून तरी एक कोंबडं बांग देऊ लागलं. त्याच्या तालावर कवायत करत मी त्या नळापर्यंत जाण्याचा जीवघेणा प्रवास सुरु केला. तेवढ्यात झिंज्या धरून जो कालवा सुरू झाला त्या गोंधळात माझं गुलाबी स्वप्न मिसरी लावून थुकावं तसं कुणीतरी थुकून टाकत होतं.

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे (दंगलकार)

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments