श्री संभाजी बबन गायके

? मनमंजुषेतून ?

सुरकुतलेले स्पर्श ! ☆ श्री संभाजी बबन गायके 

“अहो, आजोबा ! मी जेंव्हा स्वत:चा स्वत: जेवायचा प्रयत्न करतो ना… तेंव्हा माझ्या हातातला चमचा हातून निसटून पडतो कधी कधी!

“अरे, माझंही असंच होतं!”

“नाही, पण तुम्ही माझ्यासारखा बिछाना ओला करीत नसाल.. मोठे आहात न तुम्ही!

“अरे नाही रे, बाबा! बरेचदा काही समजतच नाही. घराचे चिडचिड करतात ना तेंव्हा ध्यानात येतं!”

“पण तुम्ही थोडंच माझ्यासारखं रडत असाल?”

“म्हणजे काय? मला सुद्धा रडू येतंच की… फक्त तुझ्यासारखं भोकाड पसरत नाही मी… पण कधी कधी कोणत्याही गोष्टीमुळे डोळे भरून येतात… !”

“पण आजोबा… सगळ्यांत वाईट गोष्ट कोणती आहे माहीत आहे?”

“कोणती?”

“मोठी माणसं लक्षच देत नाहीत माझ्याकडे!”

आजोबांनी आपल्या सुरकुतलेल्या हातांत त्या बालकाचे दोन्ही हात घेतले…. हातांच्या मऊ स्पर्शातली उब त्याला जाणवली.. !

आजोबा त्याला म्हणाले… ”तुला नक्की काय वाटत असेल याची कल्पना मला आहे… तुझी आणि माझी भूक सारखीच आहे…. प्रेमाच्या स्पर्शाची! कुणी आपल्याकडे लक्षच देत नाही… ही जाणीवच अधिकाधिक गडद होत चाललीये हल्ली !”

– – – शेल सिल्वारस्टीन यांनी लिहिलेल्या “ The Little Boy and the Old Man “ या कवितेचा हा स्वैर मराठी अनुवाद – – –

आयुष्याच्या मध्यातच कुठे तरी मृत्यूने नाही गाठले तर वृद्धत्व कुणाला चुकत नाही. पुनरपि जननं… नेमाने बाल्य, तारुण्य आणि वार्धक्य हे तीन ऋतू एका मागोमाग एक येतच राहतात. या क्रमाने वार्धक्यानंतर बाल्यावस्था यायला हवी… पण बालपणाला आयुष्यात पुन्हा परतायची कोण घाई… म्हातारपण पुरते संपत नाही तोच माणूस लहान व्हावयाला लागतो… कधी कधी अगदी एखादे अर्भक वाटावे एवढा. प्रौढत्वी निज शैशवास जपण्याची मुद्दाम कसरत करावी लागत नाही… शैशव जाणत्या पावलांनी जवळ येतच असते.

आणि हे उतरत्या वयातले बालपण काढणे केवळ आई-वडीलांनाच शक्य असते.. पण ते तर आधी जन्मले म्हणून पुढे निघून गेलेले असतात. मग अपत्यांनी त्यांच्या प्रौढत्वात पालकत्व नाही स्वीकारले की – – 

‘नामा म्हणे घार गेली उडोन… बाळें दानादान पडियेली.. ’. अशी अवस्था निश्चित.

बालकांना समजावणे तुलनेने तसे सोपे आणि पालकांच्या अधिकारातले. परंतु, वयाने वाढलेल्या पण बुद्धीने लहान लहान होत चाललेल्या, जाणिवेच्या झुल्यावर स्मरण-विस्मरणाचे हेलकावे घेणा-या मोठ्यांना सांभाळणे मोठे कठीण. ज्यांना ही कसरत साधली आणि ज्यांच्या बाबतीत ही कसरत साधली गेली ते दोघेही नशीबवान म्हणावे लागतील !

मागील जीवघेण्या आपत्तीत स्पर्श दुरावले होते… मरणासन्न असलेल्या बापाच्या हातात लेकाला हात द्यावासा वाटायचा… पण लेक त्या आपत्तीशी डॉक्टर म्हणून लढतो आहे… त्याला हातात मोजे घालावेच लागताहेत… आणि ह्या मोज्याताला स्पर्श बापापर्यंत पोहोचतच नाहीये… केवढा दैव दुर्विलास! काय होईल म्हणून शेवटी लेक हातातील मोजा काढून बापाच्या हाती हात देतो… तेंव्हा जणू नदीच्या दोन काठांना जोडणारा सेतू बांधला जातो ! आणि कर्तव्यावर जाताना बापाचा निरोप घेताना बापाच्या हातांवर तो जंतूनाशक औषध घालायला विसरत नाही !

आपली बालके मोठी होत राहतात… आणि ही मोठी बालके हळूहळू शेवटाकडे वाटचाल करीत असतात…. त्यांचे शक्य तेवढे अपराध पोटात घालून त्यांना काळाच्या उदरात गडप होईपर्यंत सावरून धरणे… प्रयत्नांती शक्य आहे ! त्यांच्या मागे उभा असलेला काळ… आपल्याही मागेच उभा आहे, ही जाणीव ठेवणे हिताचे !

शेल सिल्वारस्टीन यांनी लिहिलेली “The Little Boy and the Old Man“ ही मूळ कविता……

Said the little boy, “Sometimes I drop my spoon. ”

Said the little old man, “I do that too. ”

The little boy whispered, “I wet my pants. ”

“I do that too, ” laughed the little old man.

Said the little boy, “I often cry. ”

The old man nodded, “So do I. ”

“But worst of all, ” said the boy, “it seems

Grown-ups don’t pay attention to me. ”

And he felt the warmth of a wrinkled old hand.

“I know what you mean, ” said the little old man.

— –(From ‘A Light In The Attic’ by Shel Silverstein)

(कविता आंतरजालावरून साभार.)

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments