श्री सुहास सोहोनी
? मनमंजुषेतून ?
? जेव्हा संगीत येतं तुमच्या दारात ? श्री सुहास सोहोनी ?
(एक सांगीतिक कोडं! खाली दिलेल्या लेखात भारतीय संगीतामधील 37 रागांच्या नांवांची गुंफण केलेली आहे. लेख नीट लक्ष देऊन वाचा आणि ते राग ओळखून दाखवा!!)
पूर्वी शिमगा, दसरा या सणांच्या दिवशी कोंकणात घरोघरी गोमू, बाल्ये, बहुरूपी, वासुदेव – हे लोक गाणी म्हणत यायचे. आताच्या काळात त्यांचं प्रमाण कमी कमी होत चाललेलंय्. त्यात जसे कोंकणातले स्थानिक लोक असायचे, तसे परराज्यातले लोक सुद्धा असायचे. मारवाडी, गुजरीतोड्ये, गौड प्रांतीय, तिरंगी, या समाजातले हे फिरस्ते लोक असायचे. हे सारे विविध भाषांतली लोकगीत म्हणायचे. तेव्हा प्रत्येक शब्दाचा अर्थ कुठे समजत होता? पण चाल ठेका धरायला लावायची. कोंकण, गोवा या प्रांतातल्या लोकांच्या रक्तातच संगीत भिनलेलं आहे! राजस्थानी फिरस्ते तर जौंधपुरी नाचही करून दाखवत असत. डोक्यावर भला मोठा, भुसा भरलेला पांढरा पक्षी घेऊन हंसाचा ध्वनी काढून दाखवणं, ही त्या पहाडी कलाकारांची खासियत होती. त्यांना तोडीस तोड म्हणून कुडाळ देसकार हिंडोल पक्ष्यांचा आवाज काढून मजा आणायचे. त्यातले काही दशावतारी नट देखील होते. ते नाटकांतली गाणी सुद्धा गायचे. ही नाट्यकला व तिचा मालवणी अविष्कार या गोष्टी परंपरेतून आलेल्या असत. फाल्गुन सरल्यावर वसंताचं आगमन झालं की निसर्गात रंगीबेरंगी फुलांचं बहारदार प्रदर्शन भरायचं. अशा वेळी अंगावर पट्टे ओढलेले, काहीसे सुधारलेले, स्वतःला शंकराचे भक्त – भैरव वंशीय समजणारे, जंगलातले भिल्ल फुलांच्या माळा गळ्यात घालून यायचे आणि अडाण्यासारखे काही-बाही गायचे. काही वेळा बंगाली बैरागी जादूगार यायचे. ते स्वतःला दरबारी जादूगार मानायचे. कालीसह दुर्गामातेची पूजा करून ते जादूचे अघोरी प्रयोग करीत असत. एका कलिंगडाचे नुसत्या हातांनी क्षणार्धांत दोन तुकडे करून त्याच्या पोटातून बर्फाच्या गारा, मुलतानी मातीचे खडे, अशा वस्तू काढून जनांवर संमोहिनी घालीत असत. भीती वाटायची ते प्रयोग बघतांना. शहाणा माणूस पण वेडा व्हायचा. आणि हे सर्व चालू असतांना हातात डमरू आणि तोंडातून सतत ऱ्हाम्-ऱ्हीम्-ऱ्हुम् असं चालूच असे! कानडा प्रांतीय कलाकार प्राणी-पक्षी घेऊन यायचे. डमरूच्या ठेक्यावर बोकड, कुत्र्याचं पिल्लू, माकड, यांचे खेळ बघतांना हसून हसून पुरेवाट व्हायची! बोकडाचा नाच, माकडाच्या उड्या मस्तच! किती वेळ पाहिलं तरी समाधानच होत नसे. मग तो माकडवाला त्याच्या कानडी हिंदीत “अब बस हो गया जी! अब काफी हो गया जी” असं म्हणत पैसे गोळा करायला लागायचा. नंद म्हणजे उत्तर भारतीय गवळी समाजाचे लोक. हे गाई किंवा नंदीबैल घेऊन यायचे. ते श्रीकृष्णाची गाणी म्हणायचे. “लल्ला, बेडा कर दे पार, खोल दे बंद सरग के दार”. सोबत गोवंशीय वस्तू, म्हणजे गाईचं तूप, लोणी, घुंगुर, शिंगाना लावायचे गोंडे, अशा वस्तू (माल) सुद्धा ते विकायला घेऊन यायचे. काही वेळा पंजाबी सरदारजी खांद्याला हार्मोनियम लटकवून यायचे आणि नानकगुरूंची बिलावली भक्तीगीतं गायचे. कधी कधी नाथपंथीय अंगाला राख फासून यायचे व गोरखनाथांची कल्याणकारी हिंदी गाणी ऐकवायचे. अशी खूप खूप गाणी घरच्या घरी ऐकायला मिळाली त्या काळी!!
?????
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈