सौ. उज्ज्वला केळकर
☆ शुभेच्छा व शुभेच्छा पत्रे… ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
मला लहानपणापासून वाचनाची लेखनाची अतिशय आवड आहे. विशेषत: कविता लिहिण्याची. अर्थात आवड असणं आणि जमणं यात फरक आहे. पण मी नव वर्ष, संक्रांत, गुढी पाडवा, दिवाळी, ख्रिसमस, आशा काही काही निमित्ताने, र ला र आणि ळ ला ळ जोडत चार दोन ओळी रचते आणि कविता करण्याची माझी हौस भागवून घेते आणि मित्र-मैत्रिणींना नातेवाईकांना या काव्यमय शुभेच्छा पाठवून मला तुमची आठवण आहे, बरं का ! असंही जाणवून देते.
आता हेच बघा ना, यंदाच्या वर्षी, मावळतं वर्ष आणि नवीन वर्ष यांची सांगड घालत मी लिहीलं होतं,
गत वर्षाच्या सरत्या क्षणांबरोबर विरून जाऊ दे
उदास मलीन धुके, कटू स्मृतींचे
येऊ दे सांगाती सौरभ सुमधुर स्मृतींचा
जो सेतू होऊन राहील भूत – भविष्याचा.
आणि पाडव्याला लिहिलं होतं,
‘नववर्षाचा सूर्य नवा, निळ्या नभी प्रकाशेल.
त्याच्या प्रकाश दीप्तीने, अंतरंग उजळेल.
अनातरीच्या उजवाडी हीण- मालिन्य जळावे.
नव आशांचे, नव स्वप्नांचे झरे वाहावे वाहावे.
अशा तर्हेची शुभेच्छाची देवाण-घेवाण करणारी अनेक प्रकारची रंगीत, मनोहर, आकर्षक चित्रे असलेली ग्रीटिंग्स, त्या त्या दिवसाच्या आधीपासून दुकानात सजलेली, मांडलेली दिसतात.
विविध, भाषांमधली, विविध प्रकारचे संदेश देणारी ही भेट कार्डे आताशी इंटरनेटच्या महाजालावरून किंवा व्हॉट्स अॅपवरूनही आपल्यापर्यंत येऊ लागली आहेत.
अलीकडे, कधी कधी वाटू लागतं, या सार्याला फार औपचारिकपणा येऊ लागलाय. अनेकदा पुनरावृत्ती झालेली असते. पण त्यात काही असे वेगळे, वैशिष्ट्यपूर्ण संदेश असतात की ते मनात रुजून रहातात. अत्तरासारखे दरवळत असतात.
शुभेच्छा पत्रे, महणजेच भेटकार्डं व्यवहारात कधी आली, मला माहीत नाही. पण मी साधारणपणे, आठवी – नववीत असल्यापासून आमच्याकडे ग्रीटिंग्स येत असल्याचा मला
आठवतय. एक जानेवारी, दिवाळी, संक्रांतीला ती यायची. पुढे पुढे, वाढदिवस, विवाह, अमृत महोत्सव अशी त्यांची व्याप्ती वाढत गेली.
एकदा सहज मनात आलं, भेट कार्डे पाठवण्याची परंपरा कधीपासून सुरू झाली, याचा शोध घ्यावा आणि खूपच गमतीदार माहिती मला कळली. हिंदुस्थानात पुराण काळापासून शुभेच्छापर संदेश पाठवण्याची परंपरा दिसते. त्या काळात संदेशवाहक दुसर्या राजाच्या दरबारात जाऊन आपल्या राजाच्या वाटेने त्याला शुभसंदेश देत. युद्ध, विजयोत्सव, विवाह, पुत्रप्राप्ती, या निमित्ताने ते पाठवले जात. मध्ययुगातही ही परंपरा कायम होती. पाश्चात्य राष्ट्रांचा विचार करताना कळलं की अमेरिकन विश्वकोशात असा उल्लेख आहे की येशू ख्रिस्ताच्या जन्मापूर्वी 600 वर्षे रोममध्ये शुभेच्छा देणारा संदेश प्रथम तयार झाला. एका धातूच्या तबकावर अभिनंदनाचा संदेश लिहून रोमच्या जनतेने आपल्या सम्राटाला तो भेट म्हणून दिला.
इंग्लंडमधील सुप्रसिद्ध कादंबरीकार चार्लस डिकन्स याला ग्रीटिंग कार्डाच्या नव्या परंपरेचे जनक मानले जाते. सुंदर हस्ताक्षरात शुभ संदेश लिहून तो छोटी छोटी भेटकार्डे तयार करी व आपल्या परिचितांना ती, तो पाठवी. अमेरिकेमध्ये बोस्टन लुईस याने १८७५मध्ये पहिले ग्रीटिंग कार्ड बनवले होते. जगातील सगळ्यात महाग ग्रीटिंग म्हणजे, रेसॉँ या चित्रकाराची दुर्मिळ अशी कलाकृती. त्यावर शुभसंदेश लिहून एका जर्मन नागरिकाने आपल्या मित्राला पाठवले होते. आज त्याची किंमत लाखो डॉलर्स आहे.
जगातील सगळ्यात मोठं ग्रीटिंग कार्ड केवढं असेल? त्याची लांबी ७ किलोमीटर एवढी आहे. १८६७ मध्ये व्हिएतनामयेथील युद्धाच्या वेळी अमेरिकन जनतेने आपल्या सैनिकांना त्यावर शुभ संदेश लिहून पाठवले होते. त्यावर एक लाख अमेरिकन जनतेने सह्या केल्या होत्या.
आहे ना भेट कार्डाचा इतिहास मनोरंजक…..
सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३ सेक्टर – ५, सी. बी. डी. – नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र
मो. 836 925 2454, email-id – kelkar1234@gmail.com
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈