श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
मनमंजुषेतून
☆ रंग मनाचे… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’☆
☆
कोकणांतील एक गावात गायत्रीचा जन्म झाला. पु. ल देशपांडे यांनी ‘अंतु बरवा ‘चे केलेलं वर्णन आणि गायत्रीच्या बाबांचे केलेले वर्णन यात फार फरक नसावा. एक काळ होता, तेव्हा अर्धी अधिक घरे पेंढ्यांनी शाकारलेली, एखादं दुसरे घर कौलारू असायचे. गावात एखाद दुसरा श्रीमंत असायचा, बाकीचे सर्व गरीब. त्यामुळे गरिबीची कोणाला लाज वाटतं नव्हती. कोकण आणि गरिबी या एकाच नाण्याच्या दोन बाजू समजल्या जायच्या.
गायत्रीच्या कुटुंबात ६ जण. आई वडील आणि चार भावंडे. ही सर्वात मोठी, मग दोन बहिणी आणि दोन भाऊ. वडिलांची शेती/वाडी. काटकसरीने संसार करुन त्यांनी चारी मुलांना शिकविले. उपवर झाल्यावर गायत्रीच्या लग्नाचा विचार सुरू झाला. बरेच प्रयत्न केल्यानंतर तिचे लग्न ठरले. सासर शहरात होते. शहरात कधीही न राहिलेली मुलगी आता कायम शहरात राहण्यासाठी जाणार होती..
लग्न झालं, संसार सुरू झाला. मग सामान्य घरात ज्या गोष्टी घडतात त्या घडू लागल्या. सासू आणि सून…. हे एक न उलगडणारं कोडं आहे. दोघींची बाजू ऐकली तर आपल्याला दोघींचे म्हणणे पटते, बाजू कोणाची घ्यायची? समजूत कशी काढायची आणि सल्ला काय द्यायचा ? तिची घुसमट व्हायला लागली. गाव दूर, संपर्काचे साधन नाही. पत्र टाकले तर घरात सर्वांना कळणार. त्यामुळे तिने ‘मौन’ राहायचे ठरवले.
एकदा तिचा भाऊ आला तिला भेटायला. भावाशी तिचं नातं एकदम घट्ट होतं. भाऊ वयाने तिच्यापेक्षा लहान होता, पण तिची समजूत काढण्याइतपत विचारी होता. त्याने सर्व ऐकून घेतले आणि एकच वाक्य बोलला, “ ताई !! प्रत्येक जण आपल्या कुवतीनुसार बोलत असतो…. कुत्रा भुंकणार, मांजर म्याव म्याव करणार….. “
… या एका वाक्याने गायत्रीला उभारी आली…. मग गायत्री कधीच दुःखी झाली नाही.
☆
© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’
थळ, अलिबाग
मो. – ८३८००१९६७६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈