डॉ अभिजीत सोनवणे
© doctorforbeggars
-☆ डॉक्टर फॉर बेगर्स ☆ “No” म्हणजे… भाग – २ ☆ डॉ अभिजीत सोनवणे ☆
(आणि म्हणून मी लोकांच्या अंगात असलेले अंगभूत कौशल्य, समाजातल्या रूढी – परंपरा, पारंपारिक सण आणि श्रद्धा यांचा वापर चांगल्या कामासाठी करून व्यवसाय निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे !) इथून पुढे —–
दिवाळी आली, पणत्या विकायला द्या…
दसरा आला, झेंडूची फुल विकायला द्या…
गुढीपाडवा आला, साखरेच्या गाठी विकायला द्या…
संक्रांत आली, तिळगुळ विकायला द्या…
रंगपंचमी आली, रंग किंवा पिचकारी विकायला द्या…
आता नवीन वर्ष येईल, कॅलेंडर आणि छोट्या डायऱ्या विकायला द्या…
– – – असे काहीतरी मार्ग शोधतो आहे; अर्थात तुम्हा सर्वांच्या साथीने…. !!!
असो…
तर असं काम दिलेल्या या मुलाचा मला एका अनोळखी नंबर वरून कॉल आला… तो म्हणाला, ‘सर तुम्ही उद्या कुठे आहात ?’
‘मी उद्या अमुक अमुक ठिकाणी आहे… का रे… ?’
‘सर माझी जी पहिली कमाई झाली; त्यातून मला तुम्हाला एक गिफ्ट द्यायचं आहे… ‘
मला थोडा राग आला…
“ दोन पैसे मिळाले, त्यात लगेच गिफ्ट वाटायला लागलास…? मूर्खा, तुला काय सांगितलं होतं ? दिवसभरात जे पैसे मिळतील त्यातले 40 टक्के खर्च करायचे; पण 60 टक्के वाचवायचे… काय सांगितलं होतं तुला ? 40:60 गणित लगेच विसरलास का… ? एक तर आपले खायचे वांदे… त्यातून, जरा पैसे मिळाले की लगेच कुणालातरी गिफ्ट द्यायचं… ! मला तुझं कोणतंही गिफ्ट नको आहे… पैसे वाचवायची अक्कल येत नाही, तोपर्यंत मला भेटू नकोस “… मी तूसड्यागत बोललो…
“ ऐका ना सर…” तो बोलतच होता
“ तू जरा बावळट आहेस का रे… ? ठेव फोन आणि काम कर…. मला उद्या भेटायची काही गरज नाही… !”
मी रागाने बोलून गेलो…
एकदा व्यवसाय टाकून दिला की, माझे याचक लोक पैसे कसेही वापर करतात, उडवून टाकतात… बचत करा म्हणून सांगूनही बचत करत नाहीत आणि या गोष्टीचा मला राग आहे, आणि म्हणून बापाच्या भूमिकेतून मी त्याला रागावलो… !
मी फोन ठेवणार एवढ्यात तो म्हणाला, “ उगीच कोणालातरी नाही गिफ्ट देत सर, मला वडील नाहीत… वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा ते मला म्हणायचे; तू जेव्हा कमावशील तेव्हा मला काहीतरी छोटसं गिफ्ट दे….. आज ते नाहीत, म्हणून वडील समजून तुम्हालाच देतो आहे सर, प्लीज घ्या ना…. ! “
आता या वाक्यावर कोणीही विरघळून जाईल…
पण तरीही कोरडेपणाने मी त्याला म्हणालो, “ ठीक आहे, ये उद्या…” कारण कष्टाने मिळालेले पैसे फालतू गिफ्टवर खर्च करणे मला मान्य नव्हते… !
तो दुसऱ्या दिवशी दबकत दबकत आला… ! खिशातून एक पुरचुंडी काढून मला म्हणाला, “ सर हेच माझं गिफ्ट आहे… “
मी खोलून पाहिलं…. ती शेंगदाण्याची पुडी होती… आत खारे शेंगदाणे होते… मी त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं… “ काय आहे हे ? “
“सर माझ्या वडिलांना भाजलेले, खारे शेंगदाणे खूप आवडायचे… मी असा वाया गेलेला… बाबांच्या कोणत्याही अपेक्षा मी पूर्ण करू शकलो नाही… बाबा म्हणायचे, ‘ तुझ्याकडून फार काही अपेक्षाच नाहीत रे नालायका…. स्वतःच्या कमाईतून चार शेंगदाणे जरी मला तू खाऊ घातलेस, तरी मी शांततेत मरेन… !
एके दिवशी बाबा गेले… ! बाबांच्या पिंडाला कावळा शिवलाच नाही सर.. मी मागे नालायक उरलो सर…
जातांना ते चार शेंगदाणे माझ्यावर उधार ठेवून गेले… !.. स्वतःच्या कमाईतून, आज तेच शेंगदाणे घेऊन आलो आहे… सर तुम्ही खा ना… “ तो काकुळतीने बोलला…
काय बोलू मी यावर ? मला सुचेना…. ! पुडी उघडून मी हे शेंगदाणे तोंडात टाकले…
तो गळ्यात पडून हमसून हमसून रडला…
आज “पिंडाला कावळा” शिवला होता… !!! जिवंत असतानाही आज मी त्याचा मेलेला बाप झालो… !!!
सांगण्यासारखं आणखी खूप आहे….
पण लांबलेला लेख आणखी लांबेल, या भीतीने मी बऱ्याच गोष्टी लिहीत नाही…
माहेरी आलेल्या लेकीला; आई बापाला काय सांगू आणि काय नको असं होतं… तसंच माझं सुद्धा होतं… म्हणून लेख लांबतो…. आईबाप आहातच… आता लेक समजून पदरात घ्या.. !
80 वर्षाची एक आजी…. तिचा मुलगा आणि सून काम मिळत नाही म्हणून घरात आहेत…. दिवसभरात आजीला जी भिक मिळते त्यात घर चालतं…. मी या सून आणि मुलाला भेटलो…
सुनेला शिवणकाम येतं.. सुनेला म्हटलं, “ तुला जर शिलाई मशीन दिलं तर काम करशील का ? आणि काम केलं तर म्हातारीला घरात आणशील का ? “
… आजीला भीक मागू द्यायची नाही, या अटीवर सुनेला शिलाई मशीन दिलं आहे…
आज सून काम करत आहे आणि आजी घरात आहे…. ! येत्या काही दिवसात तिच्या मुलाला सुद्धा काम देणार आहोत…. !
अजुनही खूप काही सांगायचं आहे… मी तरी किती लिहू आणि तुम्ही तरी किती वाचणार ?
थोडक्यात सांगायचं, तर नवीन वर्ष आता येईल, याचक मंडळींना आता कॅलेंडर विकायला देणार आहे…
आज्या आणि मावश्या यांची खराटा पलटण नावाची टीम तयार करून त्यांच्याकडून स्वच्छता करून घेऊन त्यांना गरम कपडे, स्वेटर, सत्कारात मला मिळालेल्या शाली, ब्लॅंकेट दिल्या आहेत… स्वच्छता झाल्यानंतर पंधरा दिवस पुरेल इतका किराणा दिला आहे…
अन्नपूर्णा या प्रकल्पाच्या माध्यमातून, भीक मागणाऱ्या कुटुंबांकडूनच जेवण तयार करून घेऊन ते आम्ही विकत घेत आहोत आणि रस्त्यावर किंवा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गरीब रुग्णांना जेवणाचे डबे देत आहोत.
रस्त्यावर असहायपणे पडलेल्या लोकांवर रस्त्यावरच उपचार करत आहोत… काहींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करत आहोत… जगण्या आणि जगवण्याचा खेळ मांडत आहोत…
जे दुसऱ्याच्या आधाराशिवाय उभे राहू शकत नाहीत अशांना काठ्या कुबड्या Walker देऊन त्यांचा आधार बनण्याचा प्रयत्न करत आहोत…
अनेक लोक अनवाणी आहेत, त्यांना या महिन्यापासून चप्पल देणार आहोत…
सध्याच्या थंडीच्या काळात उघड्या नागड्या पोरांच्या अंगावर चादर चढवत आहोत… आणि म्हणून दर्गाहवर चादर चढवायला आमच्याकडे चादर उरतच नाही…
आम्ही अशिक्षित आहोत, परंतु सुशिक्षित लोकांना या महिन्यात मतदान करा म्हणून आम्ही सांगितलं…
मंदिरातून बाहेर येऊन, रस्त्यावर देवी आमची परीक्षा घेते… आपण केलेल्या मदतीमधून आम्ही रस्त्यावरच्या माऊलींना साड्या अर्पण करत आहोत…
…… खुद्द देवीच रस्त्यावर दर्शन देऊन आशीर्वाद देते आणि म्हणून मग कोणत्याही मंदिरात जायची गरज उरत नाही… !!!
या महिन्यात अजून सुद्धा खूप काही झालं आहे…. सांगेन पुढे कधीतरी…
– समाप्त –
डॉ अभिजित सोनवणे
डाॕक्टर फाॕर बेगर्स, सोहम ट्रस्ट, पुणे
मो : 9822267357 ईमेल : [email protected],
वेबसाइट : www.sohamtrust.com
Facebook : SOHAM TRUST
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈