श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

? मनमंजुषेतून ?

शिरसाष्टांग प्रणिपात… ☆ श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

प. पू. सद्गुरू श्रीमहाराज,

शिरसाष्टांग प्रणिपात.

मार्गशीर्ष कृ. ९, शके १९४६ …. आपली पुण्यतिथी. त्यानिमित्ताने मनात आलेले विचार इथे मांडण्याचा प्रयत्न करतोय. सामान्य मनुष्य मरतो आणि संत मात्र आपले जीवीत कार्य पूर्ण करतात आणि आपली अवतार समाप्ती करतात. त्यांचे जीवन कृतार्थ असते तर सामान्य मनुष्याला मतितार्थ कळतोच असे नाही. अनेक संत आपली मृत्यू तिथी आधीच सांगतात आणि मग आपला देह ठेवतात. सामान्य मनुष्याचे मात्र या उलट असते…. !

प्रत्येक मनुष्याला कसल्या ना कसल्या आधाराची गरज असते. अनेक वेळा मनुष्य नश्वर गोष्टींचा आधार शोधतो. त्याला कधी तो मिळतो अथवा मिळत नाही, पण नश्वर आधार शाश्वत समाधान देऊ शकेल असे मानणे हीच मोठी चूक ठरते आणि सामान्य मनुष्य मात्र कायम असमाधानी रहातो असे आपल्या लक्षात येईल. संताचा आधार, संतांच्या ग्रंथाचा आधार आणि संतांनी दिलेल्या नामाचा आधार हाच खरा आधार. हे लक्षात येण्यासाठी मात्र पूर्वसुकृत असावे लागते, याबद्दल वाचकांचे एकमत होऊ शकेल.

श्रीमहाराज, आपण स्वतः नाम घेतले आणि सर्वांना नाम घेण्यास सांगितले. नुसते (?) नाम घेऊन काय होते ? अनेक शिष्य नामाने गुरू पदाला नेऊन, असे मानणाऱ्या आमच्यासारख्या सामान्य जनांना, नामाने (नामस्मरणाने) काय होऊ शकते, याचे प्रत्यंतर आणून दिलेत.

जयांचा जनी जन्म नामांत झाला

जयाने सदा वास नामात केला

जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती

नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती ….

आपण नामाच्या प्रसारासाठी जन्म घेतला, आयुष्यभर अखंड नाम घेतले आणि सर्वांना नाम घेण्यास प्रवृत्त केले. सामान्य मनुष्याला नामाचा आधार दिला आणि आज आपले निर्वाण होऊन सुमारे १११ वर्षे झाली तरी नाम प्रसाराचे कार्य अव्याहत चालू आहे, ही आपल्या कार्याची महती म्हणता येईल. मनुष्य देहात असताना काम केले तर आपण समजू शकतो, पण देह सोडल्यावर देखील एखादे कार्य अव्याहत चालू रहाणे यात त्या कर्त्याची महानता दिसून येते. मी भाग्यवान आहे की मला आपण आपले शिष्यत्व दिलेत. आदरणीय भाऊसाहेब केतकर म्हणायचे की श्रीमहाराज भेटले आता काही मिळायचे बाकी राहिलें नाही. माझी सध्याची मनःस्थिती, वृत्ती अगदी तशीच आहे. फक्त ती कायम राहील असा आशीर्वाद आपण मला द्यावा.

आपलं एक वचन अतिशय प्रसिद्ध आहे. ” जेथें नाम, तेथें माझा प्राण। ही सांभाळावी खूण।।” हे वचन माझं तोंडपाठ आहे, परंतु माझी तितकी साधना नसल्याने, मी देहबुद्धीच्या आधीन असल्याने मला या वचनाची अल्पशी अनुभूती देखील नाही. मला गोंदवल्यात यायला आवडते, आपल्या घरचे अन्न (भोजनप्रसाद ) खायला आवडते. आपल्या सहवासात राहायला आवडते. पण तो योग अनेक दिवसांत आला नाही. आज आपली आठवण अनावर झाली, म्हणून हे पत्र लिहीत आहे. हे पत्र प्रातिनिधिक आहे, आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनात कमीअधिक प्रमाणात माझ्या सारखीच भावना असेल… !

रोज पोटाची खळगी भरण्यासाठी आणि आमच्या फाटक्या प्रपंचाला ठिगळं लावण्यासाठी आमचा जास्तीतजास्त वेळ खर्च होत असतो, त्यामुळे नामस्मरण करणे आम्ही लांबणीवर टाकत असतो.

आपण म्हणता की बाळ, अनुसंधान ठेवत जा, पण खरं सांगू महाराज, नेमके तेच मला जमतं नाही. सुखाचा प्रसंग आला की मी किती आणि कसा मोठा झालो आहे असे वाटते आणि दुःखाचा प्रसंग आला की मला आपली आठवण येते. आपण मला अनुग्रह देऊन कृपांकित केले आहे, परंतु मला तसे कायम वाटत नाही. माझी देहबुद्धि मला फसवते आणि ती माझ्यावर स्वार होते. सर्व कळलं असं वाटतं, पण प्रत्यक्ष आचरणात काहीच येत नाही. मी नामस्मरण या विषयावर खूप छान चर्चा करतो, चांगलं व्याख्यानही देतो, परंतु माझं नामस्मरण किती होतं, हे आपल्याला माहीत आहेच. जो सर्वज्ञानी आहे, त्यापासून काय लपुन राहणार… ?

मी या पत्रात काय लिहिणार आहे, हे सुद्धा आपल्याला माहीत आहे, परंतु आपल्याशी बोलून माझं मन हलकं होतं, म्हणून हा प्रयत्न….. ! आई पुढे चूक मान्य केली, तिची क्षमा मागितली की आई जवळ घेते, मायेने कुरवाळते आणि आपलं बाळ ‘द्वाड’ आहे हे माहीत असूनही म्हणते, बाळ माझं गुणांचं!!! हे मायेचे बोल ऐकण्यासाठी माझे कान व्याकुळ झालेत हो महाराज!! आपण अखिल ब्रह्मांडाच्या माऊली आहात. आपल्या मुलाला जवळ घ्या. मी अनेक वेळा चुकतो, करू नको ते करतो, अनेकांची मने दुखावतो, आपल्याला भूषण होईल असे वागत माही. हे सर्व अगदीच खरं आहे. पण काय करू महाराज, मला सर्व कळतं पण काहीही वळत नाही…… आणि जेव्हां कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते….

0श्रीमहाराज, एक करा…. तुम्हीच काहीतरी करा, जेणेकरून मला यातून बाहेर पडता येईल…. प्रपंचाच्या मोहात पडून अधिकाधिक बुडणारा मी, मला फक्त आपला आधार आहे. ज्याला जगाने दूर लोटलं, त्याला आपण मात्र स्विकारले…. आता आपणच माझे मायबाप !! 

प. पू. श्रीसद्गुरुंच्या समोर कसं बोलावं, कोणता विधिनिषेध पाळावा याचं ज्ञान आणि भान मला नाही. आपण माझ्या माऊली आहात आणि आईशी कसेही बोललं तरी ती माऊली लेकराला समजून घेत असते, साऱ्या जगाने अंतर दिलं, तरी आई कधीच लेकराला अंतर देत नाही. आणि याच भावनेने हे पत्र लिहिण्याचे धाडस मी केलं आहे….! 

या पत्रामागील माझा भाव आपण शुद्ध करून समजून घ्यावा आणि मला आपल्या चरणांशी स्थान द्यावे ही प्रार्थना!!!

…. प्रत्येकाला आपल्या जीवनाचे विहीत कर्तव्य आकळावे आणि नामस्मरण करण्याची आणि पर्यायाने स्वतःचा आणि समाजाचा विकास साधावा असा आशीर्वाद आपण द्यावा.

जानकी जीवन स्मरण जय जय राम !!

आपला,

संदीप

© श्री संदीप रामचंद्र सुंकले ‘दास चैतन्य’

थळ, अलिबाग

मो. – ८३८००१९६७६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments