श्री जगदीश काबरे
☆ “सुख म्हणजे काय ?” ☆ श्री जगदीश काबरे ☆
एक अत्यंत यशस्वी, परंतु कामाच्या ताणाने वैतागलेला एक अधिकारी होता. एकदा सुट्टी घेऊन तो एका निवांत गावी गेला. एके दुपारी त्याला एक कोळी आपली बोट किनाऱ्याला लावताना दिसला. त्याने सकाळी जे काही मासे पकडले होते. ते व्यवस्थित एका टोपलीत ठेवलेले होते. कुतूहलानं तो अधिकारी त्या कोळ्याजवळ गेला.
‘‘आज तुझी भरपूर कमाई झालेली दिसतेय. ’’ कोळ्यानं पकडलेल्या माशांकडे पाहत तो उद्गारला! ‘‘इतके मासे पकडायला किती वेळ लागला तुला?’’ त्यानं विचारलं.
‘‘फक्त काही तास!’’ दुपारच्या उन्हात अंगाला आळोखेपिळोखे देत कोळी उत्तरला. ‘‘माझं आजचं काम संपलं. ’’
हे ऐकून तो अधिकारी चक्रावला. ‘‘मग उरलेल्या दिवसाचं तू काय करणार?’’ त्यानं विचारलं.
कोळी हसून म्हणाला, ‘‘घरी जाईन, कुटुंबाबरोबर एकत्र जेवण करेन, एक डुलकी काढेन, माझ्या मुलांबरोबर खेळेन. संध्याकाळी गावात जाऊन मित्रांबरोबर संगीताचा आनंद घेईन. एवढं पुरेसं आहे. ’’
अधिकाऱ्याच्या भुवया उंचावल्या. तो काहीसा गोंधळला. त्याने विचारलं, ‘‘पण जर तू अधिक वेळ मासेमारी केली असतीस तर तुला आणखी पैसे मिळाले असते. त्यातून तू आणखी मोठी बोट विकत घेऊ शकला असतास, हाताखाली चार माणसं ठेवू शकला असतास आणि आणखी जास्त मासे पकडू शकला असतास. त्यात बस्तान बसल्यावर तुला बोटींचा ताफा विकत घेता आला असता, माशांची निर्यात करता आली असती, खूप पैसा मिळवून तू श्रीमंत झाला असतास. ’’
कोळ्यानं हसत विचारलं, ‘‘आणि इतक्या पैशांचं मी काय केलं असतं?’’
अधिकारी म्हणाला, ‘‘श्रीमंत होऊन तुला व्यवसायातून निवृत्ती घेता आली असती, हातात आरामासाठी भरपूर मोकळा वेळ असला असता, कुटुंबाबरोबर निवांत वेळ घालवता आला असता आणि तुला जे आवडेल ते करता आलं असतं. ’’
मंद स्मित करत कोळ्यानं त्या अधिकाऱ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, ‘‘पण… हेच सगळं तर मी आत्ताही करतो आहे ना!’’
साथींनो, या घटनेवरून आपल्या लक्षात यायला हरकत नाही की, ज्या सुखासाठी पैशाच्या मागे आपण धावत असतो ते सुख आपल्याला मिळतच नाही, उलट आपल्यापासून दूर गेलेले दिसते. परिणामी आपलीच दमछाक मात्र होते. एक प्रसिद्ध म्हण आहे, “ पैशाने गादी विकत घेता येईल, पण झोप नाही. ” अपेक्षा किती होती, आणि किती मिळालं यावर खरं सुख अवलंबून असते का?
सुख हे आयुष्यात बरेचदा निरनिराळ्या वेषात येते. तुम्ही आपली एखाद्या खास वेषात ते येईल म्हणून वाट पहात असता, पण ते सुख तुमच्या पुढे कधी कुठल्या वेषात येईल ते सांगता येत नाही. तुम्हाला फक्त त्या सुखाला ओळखता आलं पाहिजे, नाही तर ते तुमच्या दारात कुठल्यातरी वेषात येईल आणि तुम्ही त्याला न ओळखता दार बंद करून घ्याल. कदाचित ते दुःखाचा झगा पण घालून येईल, तुम्हाला त्याला फक्त ओळखता आलं पाहिजे. थोडक्यात काय तर, सुख ही एक मानसिक सवय आहे, ती लावून घेणं आपल्याच हातात आहे. तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल, तितकंच सुखी तुम्ही रहाल. तुमच्या सुखी रहाण्यावर केवळ तुमचाच अधिकार असतो. इतर लोकं तुम्हाला दुःख देऊच शकत नाहीत. ही गोष्ट एकदा लक्षात आली की जगणं फार सोपं होऊन जाईल, असं वाटत नाही का?
© श्री जगदीश काबरे
मो ९९२०१९७६८०
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूप छान कविता