? मनमंजुषेतून ?

☆ देवनागरी ☆ श्री मयुरेश गद्रे ☆ 

आजच्या लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीमध्ये सुभाष अवचटांचा “देऊळ” म्हणून लेख आलाय. गावातल्या जुन्या दगडी, हेमाडपंथी देवळाची गोष्ट. त्या वास्तूशी जवळीक सांगणाऱ्या कोवळ्या वयातल्या आठवणी. आणि मग अचानक गावकीनं निर्णय घेऊन देवळाला केलेली ऑइल पेंटची रंगरंगोटी. सुंदर देवळाचं असं विद्रूप होणं त्यांच्यातल्या कलाकाराला किती अस्वस्थ करून गेलं असा तो एकंदर लेखाचा नूर….!

हे वाचता वाचता, सहज मी ते वर्तमानाशी जोडत गेलो.

गेलं साधारण वर्षभर मी व्हॉट्सअप वापरतोय. खाजगी कमी. बहुतांशी दुकानाच्या ऑर्डर्ससाठी. वेगवेगळ्या प्रांतातील सर्वभाषिक मंडळी आमची ग्राहक आहेत. त्यामुळं हिंदी, मराठी, इंग्रजी सर्वच भाषांतून विचारणा सुरू असतात. इतर भाषिकांचं सोडून देऊ. पण माझं सर्वसाधारण निरीक्षण असं की मराठी भाषकांना आपल्याच देवनागरी लिपीचं भयंकर वावडं आहे.

यातले हाताच्या बोटावर मोजण्याइतके अपवाद वगळता सगळे जण सर्रास रोमन स्क्रिप्ट मध्ये मराठी टाईप करतात.

काय प्रॉब्लेम आहे हा? कुणालाच त्यात काही गैर वाटत नाही. मी त्यातल्या अनेकांना न राहावून हा प्रश्न विचारतो की बाबांनो, का करता असं? तर सार्वत्रिक उत्तर म्हणजे ” मराठी टाईप करायचं म्हणजे कसलं कंटाळवाणं काम ! त्यापेक्षा हे सोप्पं आहे “

खरंच इतकं कठीण आहे का देवनागरी लिहिणं? इतकं वेळखाऊ का वाटतं आपल्याला आपल्याच लिपीत लिहिणं? की देवनागरी हा फक्त कॅलिग्राफी (सुलेखन) करण्यापुरता वापरून सोडून द्यायचा विषय आहे?

कितीतरी लोक आमच्या दुकानात आता गणपतीस्तोत्र, मारुतीस्तोत्र, रामरक्षा इंग्रजीत आहे का असं विचारतात. म्हणजे आता

भीमरूपी महारुद्रा

हे

Bheemroopee Mahaarudraa असं छापायचं का?

उद्या कुणी म्हणेल म्हणून

लाभले आम्हांस भाग्य

बोलतो मराठी

हे

Laabhale amhans bhagya

Bolato marathi

असं छापायचं?

आणि मग छत्रपतींच्या घोषणा

Har Har Mahadev

अश्या लिहायच्या?

त्यासुद्धा “आम्ही मराठी” असं छातीठोकपणे सांगणाऱ्या  माणसांसाठी??

 

ज्या लिपीत केवळ २६ वर्ण – त्यातही ५ स्वर आणि २१ व्यंजनं – आहेत ती रोमन समृद्ध?

की ज्यात अ ते ज्ञ असे तब्बल ४८ वर्ण – त्यात अ आ इ ई….असे १२ स्वर आणि क ते ज्ञ अशी ३६ व्यंजनं आहेत ती देवनागरी लिपी?

कृपया लक्षात घ्या मी भाषेबद्दल बोलत नाहीये, लिपीबद्दल बोलतोय. इंग्रजी भाषेच्या समृद्धीबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. पण रोमन  लिपी ( स्क्रिप्ट) मराठी भाषेसाठी का वापरावी किंबहुना का वापरू नये याबद्दल हे पोटतिडकीने केलेलं लिखाण आहे.

आज कालनिर्णय दिनदर्शिकेच्या तमीळ, तेलगू, हिंदी इत्यादि भाषेतल्या आवृत्त्या बघा. आकडे हा दिनदर्शिकेचा प्राण आहे. पण या सगळ्या छपाईमध्ये समान गोष्ट म्हणजे त्यांचे आकडे इंग्रजी भाषेत म्हणजेच रोमन लिपीत आहेत. आपणही असेच बेछूट वागत राहिलो तर साळगावकरांवर मराठी दिनदर्शिकेत इंग्रजी आकडे छापण्याची वेळ येईल हे सांगायला ज्योतिषाची गरज नाही.

भाषा हा आत्मा असला तरी लिपीचं शरीर घेऊनच तो वावरतो.

लिपी म्हणजे काय तर चिन्हांचा खेळ. त्यातून विचार आणि भावना व्यक्त केल्या जातात. म्हणून मग आपण आता सर्रास इमोजी वापरतो. शब्द लिहायचा कंटाळा आणि व्यक्त व्हायला सोप्पं माध्यम !  म्हणजे  एका अर्थी पुन्हा आपण आदिमानवाच्या सांकेतिक भाषेकडे चाललो आहोत. ( माझ्या कोणत्याही लिखाणात मी कधीही इमोजी वापरत नाही.)

आज जगभर हेच मंथन चालू आहे. अनेकांचं म्हणणं हेच की भावना कळल्या की झालं ! पण भाषा म्हणून जसं सौंदर्य आहे तसं लिपी म्हणून आहेच की ! ते नाकारून कसं चालेल? आपलं नुसतं नाव लावून भागतं का….. आपल्या नावापुढे वडिलांचं नाव, आडनाव हे सगळं लावावसं वाटतं ना? परंपरा आणि वारसाच  तर सांगतो त्यातून. भाषा आणि लिपी यांचं नातंही असंच परंपरेचं आणि वारशाचं नातं आहे.

आज एकट्या अच्युत पालवांच्या सुलेखनाच्या जोरावर आपण देवनागरी नाही वाचवू शकत. ( जर्मनीत जगातल्या सर्व लिपींचे नमुने असलेलं संग्रहालय आहे. तिथलं देवनागरी लिपीतलं लिखाण पालव सरांच्या हातातून सजलंय…). भाषा आणि लिपी हा समूहाचा हुंकार आहे.

जागतिकीकरणाच्या फायद्यांबरोबर येणारे जे छुपे आणि भयंकर उत्पात घडवणारे तोटे आहेत त्यातला महत्त्वाचा एक म्हणजे जीवनाच्या प्रत्येक अंगातलं संपुष्टात येणारं वैविध्य…! भाषा, लिपी, आहार, शेती, पोशाख या सगळ्यात येणारा एकजिनसीपणा आणि त्यातून समूळ नष्ट होत चाललेलं “देशी वाण” हा गांभीर्याने घ्यायचा विषय आहे. जागतिकीकरणाला विरोध नाही पण त्यापुढे लोटांगण घालताना स्वत्व हरवणं भयावह आहे.

एकच सांगतो, आजही मी माझे बँकेचे चेक लिहिताना स्वच्छ मराठी भाषा आणि देवनागरी लिपीचाच वापर करतो. अगदी आमच्या रोटरी इंटरनॅशनलचे चेकसुद्धा..( आणि ते पासही होतात)!

अवचटांच्या आजच्या लेखातलं हेमाडपंथी मंदिर आणि त्याला फासलेला ऑइलपेंट हे चित्रं मला का अस्वस्थ करून गेलं हे एव्हाना तुमच्या लक्षात आलं असेलच.

माझं हे लिपीपुराण वाचून रोमन स्क्रिप्टमध्ये मराठी टायपिंग करणाऱ्या एका तरी बहाद्दराचे किंवा वाघिणीचे मतपरिवर्तन झाले तरी,

याचसाठी केला होता अट्टाहास……!

 

श्री मयूरेश गद्रे

गद्रे बंधू, डोंबिवली

(१६ मे २०२१)

संग्राहक – श्री आनंद  मुळे

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments