श्री संभाजी बबन गायके
☆ “आज नव्हे… आत्ताच !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
कोणती भेट अखेरची असेल, कोणते शब्द अखेरचे असतील हे माहीत नसण्याच्या काळात आपण आजच्या, आताच्या गोष्टी उद्यावर का ढकलत असतो हे कळत नाही, हे नाकारता येणार नाही!
आपण महाभारतातील एक कथा निश्चित ऐकली असेल… ज्यात धर्मराज युधिष्ठीर एका याचकाला उद्या दक्षिणा घ्यायला ये! असे सांगतात. त्यावर बलभीम आश्चर्याने म्हणतात…. दादाला ते उद्या ती दक्षिणा द्यायला निश्चितपणे जिवंत असतील असा आत्मविश्वास आहे, असे दिसतं! या कथेतून घ्यायला पाहिजे तो बोध माणसं विसरून जातात…. किंबहुना तशी दैवाची योजनाच असावी किंवा आपले भोग!
परिचयातील एखादी व्यक्ती मरणासन्न अवस्थेत असते खूप दिवस. भेटीस जाण्याचं खूपदा ठरतं आणि राहून जातं! घरातली जाणती, म्हातारी माणसं सांगून सांगून थकतात… कर्त्यांना त्यांच्या व्यापातून सवड काढणं होत नाही… मग धावपळ करून अंतिम ‘दर्शना’चा सोपस्कार करावा लागतो… जो कितपत खरा असतो? कुणाचं दर्शन घेतो आपण? की आपण आल्याचं इतरांना दिसावं अशी योजना असते ती?
ज्या व्यक्तीबद्दल नंतर जे बोललं जातं… ते त्या व्यक्तीबद्दल असलं तरी त्या व्यक्तीला ऐकता येत असेल का? कोण जाणे? त्यापेक्षा त्या व्यक्तीच्या हयातीत त्याच्या कानावर हे शब्द पडले असते तर?
एखाद्या व्यक्तीचं कौतुक करायचं राहून जातं….. योग्य प्रसंगाची प्रतीक्षा करण्याच्या नादात. एखाद्याचं देणं द्यायचं राहून जातं…. देऊ की योग्य वेळी असं वाटल्यामुळे.
….. आपल्याकडे प्रेम शब्दांतून व्यक्त करण्याची पद्धत नाही…. पण कृतीतून व्यक्त करायला कुणाची आडकाठी आहे? पण हे सुचत नाही.
मी हे जे काही सांगतो आहे ते आधी कुणी सांगितलं नाही असं नाही! बेकी हेम्स्ली नावाच्या एका ब्रिटीश कवयित्रीने हे तिच्या भाषेत सांगितलंय नुकतंच. तिच्या त्या इंग्लिश शब्दांचं स्वैर भाषांतर इथं दिलं आहे.. शक्य झाल्यास तुम्ही ती कविता स्वत: वाचावी म्हणून… उद्या किंवा आजच!
तुझं माझ्यावर किती प्रेम होतं हे सांगण्यासाठी मी कायमचे निघून जाईपर्यंत वाट पाहू नकोस !
तुझ्या आसवांमधून माझी कीर्ती तू सांगशीलही पण ती ऐकायला मी असायला तर पाहिजे ना?
तुझं माझ्यावरच्या प्रेमाचं गुपित असं राखून ठेवू नकोस…. उद्या सांग किंवा सांगून टाक आजच !
मग मी ही तुला सांगेन तुझ्यातलं चांगलं …. तू कसा आहेस आणि कसं तू मला प्रेरित करतोस ते!
तू ऐकत असतानाच मी तुला सारं सांगेन अगदी हृदयापासून
….. ‘तू होतास’ ऐवजी ‘तू आहेस’ असं म्हणायला आवडेल मला
‘असं आहे’ हे ‘असं असायचं’ पेक्षा कितीतरी सुंदर आहे, नाही?
तुझ्या अस्तित्वाच्या उजेडात मी बोलेन तुझ्याविषयी ….
….. नंतरच्या अंधारात प्रेमाचे शब्द मनालाही ऐकू येत नाहीत!
म्हणून फार तर उद्याच मला सांग जे तुला वाटतं ते, किंवा आजच, आत्ताच का नाही सांगत?
…. कारण … उद्या असेल का आपल्या नशिबात कुणास ठाऊक?
…. कुणीतरी आपलं आहे… हे आपण ऐकत असताना कुणीतरी सांगणं किती महत्त्वाचं आहे नाही?
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈