श्री मंगेश मधुकर
☆ नौटंकी… ☆ श्री मंगेश मधुकर ☆
रविवारी घराघरात असते तशीच निवांत सकाळ, सर्व काही अस्ते कदम चाललेलं असताना मोबाईल वाजला. अनोळखी नंबर असल्यानं दुर्लक्ष केलं. काही वेळानं पुन्हा त्याच नंबरवरुन फोन आला तेव्हा घेतला हॅलो, संडे डिश का?”
“हो, बोला सर”
“दर रविवारी वाचतो”
“अरे वा !!, धन्यवाद”
“धन्यवाद कशाला?घरबसल्या मिळतं म्हणून वाचतो. ”अनपेक्षित प्रतिक्रियेनं मला ठसका लागला.
“मी लिहिलयं म्हणून आभार मानले. ”
“आजकाल लिहिणारे सतराशे साठ आहेत. लिहिण्याचं कौतुक सांगू नका. ” काकांचा अजून एक तडाखा.
“नाही सांगत. ”
“आणि चार ओळी खरडल्या म्हणून स्वतःला लेखक समजू नका. ”
“अजिबात नाही”.
“सध्या लिहिणारे जास्त अन वाचणारे कमी झालेत. ”
“शंभर टक्के बरोबर. “
“उगीच हवेत उडू नका”.
“मी होतो तसाच आहे तरीही.. ”
“त्याच्याशी मला काही देणंघेणं नाही. तुमचं संडे डिश हे लिखाण मला ‘नौटंकी’ वाटते ” काकांनी मूळ मुद्द्याला हात घातला.
“डायरेक्ट नौटंकी.. ” आलेला संताप आवरत शक्य तितक्या मृदु आवाजात म्हणालो.
“स्पष्ट बोलण्याचा राग आला का?”
“वाचक देवो भव:”
“फुकट शब्दांची कारंजी उडवू नका. ”
“बरं !!. तुम्ही बोला, मी ऐकतो. ”
“खरंच तुम्ही लेखक आहात की डमी.. ”.. काकांच्या या बोलण्यानं चिडचिड वाढली.
“थोड्या वेळापूर्वी म्हणालात की स्वतःला लेखक समजू नका म्हणून आणि आता तुम्हीच.. ”
“शब्दांचे खेळ करून चुका काढू नका. ”
“राहिलं. उत्सुकता म्हणून विचारतो ‘संडे डिश’ वर एवढा राग?”
“कशाला रागावू. माझा काय संबंध !! कुणीही ‘वाच’ म्हणून बळजबरी, आग्रह केलेला नाही”
“तरीही वाचता”
“हो”
“चला, म्हणजे चांगलं नसेल पण ‘बरं’ लिखाण माझ्या हातून नक्कीच होतंय. करेक्ट ना !!” काय उत्तर द्यावं हे लक्षात न आल्यानं काकांचा गोंधळ उडाला.
“त्यापेक्षा सरळ सांगा की माझ्या तोंडून कौतुक ऐकायचयं. त्याचीच सवय असेल ना”
“असं काही नाही”
“असंच आहे”
“दर रविवारी लेखनाचा रतीब का घालता”
“समाधान आणि आनंद मिळतो म्हणून.. ”
“माईकवरून द्यायला हे उत्तर ठिक आहे. काही पैसे वगैरे मिळतात की नाही”
“त्यादृष्टिनं कधी विचार केला नाही आणि अपेक्षाही नाही. ”
“एवढं लिहून दोन पैशे हाती येत नसेल तर काय उपयोग !! सगळं लिखाण कवडीमोल”
“पसंद अपनी अपनी आणि प्रत्येक गोष्टीला पैशाचं मोजमाप लावायचं नसतं. ” चढया आवाजात मी उत्तर दिलं.
“राग आला वाटतं”
“का येऊ नये. इतका वेळ तोंडाला येईल ते बोलताय. ”
“ एक सल्ला देतो ”.. माझ्या चिडण्याचा काकांवर काहीही परिणाम झाला नाही.
“अजून आहेच का?मला वाटलं इतकं बोलल्यावर संपलं असेल. ”
“कसंय, तुमच्यापेक्षा चार पावसाळे जास्त पाहिलेत. त्याच अनुभवावर सांगतो. कौतुक सर्वांना आवडतं पण टीका नाही. आजकाल तर माणसं वागताना-बोलताना सुद्धा ‘नौटंकी’ करतात. ”
“संडे डिश मध्ये तुम्हांला काय नौटंकी वाटली”
“कथेतली बहुतेक पात्र इमोशनल असतात. भावनिक होऊन निर्णय घेतात. आजच्या जगात जिथं व्यवहार या एकाच गोष्टीला महत्व आहे तिथे असं लिखाण पटत नाही. ”
“अजून काय वाचता ? “
“व्हॉटसपवर येणारं सगळं !!. ”
“म्हणजे तुम्ही व्हाट्सअप विद्यापीठाचे स्कॉलर”
“टोमणा आवडला. एक आगाऊ सल्ला आता रविवारचा रतीब बंद करा. ” काकांचा बॉम्ब.
“आता स्पष्टच सांगतो. लिखाण चालू ठेवायचं की बंद करायचं हे वाचक ठरवतील आणि आता लिहू नका सांगणारे तुम्ही पहिलेच नाहीत. माझे काही हितचिंतकसुद्धा तेच म्हणतात. जेव्हा बहुसंख्य वाचक सांगतील तेव्हाच ठरवू. ” …. अजून बरंच बोलायचं होतं पण उगीचच तोंडातून वेडावाकडा शब्द जायला नको म्हणून फोन कट केला. डोकं भणभणत होतं. संताप अनावर झालेला. वाचकांचे फोन, मेसेजेस नेहमी येतात पण आज आलेला काकांचा फोन वेगळा, अस्वस्थ करणारा, विस्फोटक होता.
—
संध्याकाळी पुन्हा त्याच नंबरवरून फोन. मुद्दाम घेतला नाही. चार पाच वेळा रिंग वाजली. दहा मिनिटांनी पुन्हा फोन आल्यावर तेव्हा नाईलाजानं घेतला. “अजून काही राहिलयं का?”
“सॉरी !! रागावू नका. सकाळी मुद्दाम तुम्हांला चिडवलं. खरं सांगायचं तर संडे डिश आवडीनं वाचतो. ”काकांचा एकदम वेगळा सुर.
“सकाळी तर वेगळंच बोलत होता”
“ते मुद्दामच. मुलांच्या कृपेने पंधरा दिवसापूर्वी वृद्धाश्रमी बदली झाली. आता इथंच कायमचा मुक्काम. आयुष्यभर शिकवण्याचं काम केल्यामुळे बोलायची फार आवड आणि इथ कोणीच बोलत नाही. नातेवाईकांना, घरच्यांना फोन केला तर थातुर-मातुर कारणं देऊन फोन कट करतात. नेमकं काल म्हातारपणावरची ‘रिकामेपण’ ही संडे डिश वाचली अन तुमच्याशी बोलावसं वाटलं म्हणून फोन केला आणि ठरवून तिरकस बोललो. त्यामुळेच तर चक्क चौदा मिनिटं आपल्यात बोलणं झालं. नाहीतर माझ्याशी कोणी मिनिटभरसुद्धा बोलत नाही. म्हणून मीच नौटंकी केली ” …. काकांचं बोलणं ऐकून धक्का बसला. खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं.
“काका, सकाळी चुकीचं बोललो असेल तर माफ करा. ”
“तुमच्या जागी मी असतो तर तेच केलं असतं. जे झालं ते झालं. आजकाल संपर्क साधणं खूप सोप्पंयं पण माणसचं एकमेकांशी बोलणं टाळतात. ”
“पुन्हा एकदा सॉरी !!आपण फोनवर भेटत राहू. ”
“क्या बात है. जियो !! संडे डिश छान असतात. असच लिहीत रहा. हाच आशीर्वाद !!आणि ऐकून घेतलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद !! “
काकांनी फोन कट केला तरी बराच वेळ फोनकडे पाहत होतो. कधी कधी वस्तुस्थिती आपण समजतो त्यापेक्षा फार वेगळी असते.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈