सौ. बिल्वा शुभम् अकोलकर

? मनमंजुषेतून ?

☆ हरवणे, सापडणे… – लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव ☆ प्रस्तुती – सौ.बिल्वा शुभम् अकोलकर 

सोनेरी रंगाचं टोपण असलेलं काळ्याभोर रंगाचं एक जुनं, देखणं, महागाचं फाउंटन पेन माझ्या वडिलांच्या कपाटातून मला नेहमी खुणावत असे. आपण त्या पेनाने छानसं काहीतरी लिहून बघावं असं मला फार वाटत असे. “पैसे देऊनही आता असं पेन मिळणार नाही” असं बाबांचं मत होतं. त्यांचं ते फार आवडतं पेन होतं. पण मग सातवी, आठवीत गेल्यावर मला फार आवडतं म्हणून ते पेन त्यांनी मला दिलं. आणि कसं कोण जाणे, एका शनिवारी सकाळी शाळेतून परत येताना ते पेन माझ्या दप्तरातून रस्त्यात खाली पडलं, हरवलं.

पेन हरवलं म्हणून बाबा मला रागावतील, ही माझी भीती नव्हती. बाबांचं आवडतं पेन आपल्या हातून हरवल्याचं आणि बाबांना त्याचं वाईट वाटेल याचं मला दुःख होतं. पण पेन हरवल्याचं कळल्यावर बाबा मला म्हणाले होते, “ रस्त्यात पडलं असेल तर मिळेलही कदाचित आणि समज जर नाही मिळालं, तर तू मोठी झालीस की यापेक्षा सुंदर पेन तू माझ्यासाठी आण. अशीही कोणती गोष्ट कायम टिकते? “ 

त्यांच्या या वाक्यामुळे, पेन हरवल्याच्या दुःखापेक्षा, हरवलेलं पेन परत मिळू शकतं हा आशावाद आणि आपण मोठे झाल्यावर बाबांसाठी सुंदरसं पेन आणू शकू हा बाबांनी दाखवलेला विश्वास मला उमेद देऊन गेला.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुलांना शाळेत सोडून परत जाणाऱ्या एका पालकांना हे पेन रस्त्यात मिळालं आणि त्यांनी ते शाळेच्या ऑफिसमध्ये जमा केलं. हरवलेलं पेन परत मिळालं.

“वस्तू हरवणे” ही कोणाच्याही आयुष्यात, कधीही घडू शकणारी एक घटना असते. आपल्या चुकीमुळे वस्तू हरवली की एक प्रकारची चुटपुट लागून राहते, काहीसं अपराधीही वाटतं. वस्तू मौल्यवान असेल तर ती आठवण कायमच स्मरणात राहते. अशावेळी वस्तू हरवणाऱ्या माणसाला, “ धांदरट, बेफिकीर” अशी विशेषणं लागू शकतात आणि ती जास्त दुखावणारी असतात. हरवणाऱ्याचा पुढे वाद घालण्याचा, आपली चूक कशी नव्हती हे सांगण्याचा हक्क जवळजवळ संपुष्टात आलेला असतो. आणि जर आपली चूक असेल तर गप्प बसण्याला पर्याय नसतो.

परंतु हरवणं या अनुभवाला इतरही सकारात्मक बाजू असतात हे मला माझ्या बाबतीत घडलेल्या पेन हरवण्याच्या घटनेवरून कळलं. लोकं चांगली असतात, शाळेच्या आवारात मिळालेले पेन त्यामुळेच परत मिळू शकलं हा चांगुलपणावरचा विश्वास तर वाढलाच, पण “ तू मोठी झाल्यावर माझ्यासाठी एक सुंदर असं पेन आण” या बाबांच्या शब्दांनी पेन हरवण्याच्या बदल्यात मला एक “स्वप्न” बक्षीस दिलं. मोठी झाले की मी माझ्या पहिल्या पगारातून, कमाईतून बाबांसाठी एक किंमती पेन विकत घेण्याचं स्वप्न त्यानंतर मी कायम बघितलं आणि ते पूर्ण झाल्याचा आनंदही घेतला.

वस्तू हरवण्याला अशा कितीतरी बाजू असतात. लाकूडतोड्याची कुऱ्हाड लाकडं तोडताना नदीत पडली म्हणजे हरवलीच. देवाने त्याला त्याच्या लाकडी कुऱ्हाडी बदली सोन्याची, चांदीची कुऱ्हाड देऊ केली. पण प्रामाणिक लाकूडतोड्याने ती नाकारली. मग देवाने त्याला त्याची हरवलेली कुऱ्हाड तर दिलीच पण सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाड त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस म्हणून दिली. बालपणी ऐकलेली ही भाबडी गोष्ट खरी वाटो, न वाटो पण प्रामाणिक असण्याचा संस्कार करते इतकं नक्की.

इथे मला विशेषत्वाने आठवते ती फ्रान्झ काफ्का ( Franz Kafka) ची गोष्ट. आवडती “बाहुली” हरवली म्हणून रडणारी एक लहानशी, गोड मुलगी तुमच्या, माझ्यासमोर येऊन उभी राहिली, तर आपण काय करू? आपण तिची समजूत काढू, तिला नवीन बाहुली आणून देऊ. पण फ्रान्झ काफ्काने तसं केलं नाही.

काफ्का हा जर्मन कथा कादंबरीकार होता. बर्लिनच्या पार्कमध्ये फिरत असताना त्याला बाहुली हरवली म्हणून रडत असलेली एक छोटी मुलगी भेटली. त्या दोघांनी मिळून बाहुली खूप शोधली. परंतु बाहुली मिळाली नाही. काफ्काने ह्या छोट्या मुलीला दुसऱ्या दिवशी परत बाहुली शोधण्यासाठी पार्कमध्ये बोलावले.

दुसऱ्या दिवशी काफ्काने या छोट्या मुलीला बाहुलीने लिहिलेलं एक पत्र दिलं. त्यात बाहुलीने लिहिलं होतं की ती जगप्रवासाला चालली आहे. आणि ती, या प्रवासाचे वर्णन पत्रातून नियमितपणे ह्या छोट्या मुलीला लिहित राहील.

अशा रीतीने, काफ्काने बाहुलीच्या नावाने लिहिलेल्या जगप्रवासाच्या साहस कथांना सुरुवात झाली. काफ्का ही पत्रे स्वतः त्या मुलीला वाचून दाखवत असे. ज्या पत्रातील साहसकथा आणि संभाषणे त्या मुलीला आवडू लागली.

नंतर बरेच दिवसांनी काफ्काने प्रवास करून बर्लिनला परत आलेली बाहुली ( म्हणजे त्याने विकत आणलेली ) छोट्या मुलीला दिली. “ही माझ्या बाहुलीसारखी अजिबात दिसत नाही, ” मुलगी म्हणाली.

काफ्काने तिला दुसरे पत्र दिले ज्यामध्ये बाहुलीने लिहिले होते : “माझ्या प्रवासाने मला बदलले आहे. ” चिमुरडीने हरवलेली बाहुली मिळाली म्हणून तिला आनंदाने मिठी मारली आणि ती बाहुली घरी नेली. बाहुली “हरवण्याच्या निमित्ताने” छोट्या मुलीने पत्रातून जग बघितलं.

काफ्काच्या मृत्यूनंतर, आता वयाने काहीशी मोठी झालेल्या या मुलीला बाहुलीच्या खोक्यात एक पत्र सापडले. काफ्काने स्वाक्षरी केलेल्या छोट्या पत्रात लिहिले होते:

“तुम्हाला जे आवडते ते कदाचित कधी हरवले जाईल, परंतु दुसऱ्या मार्गाने ते नक्कीच परत येईल. “!!!!

काफ्काची गोष्ट इथे संपते.

हरवलेलं बालपण? हरवलेलं प्रेम? हरवलेलं रूप? असे प्रश्न पडले तर त्याची उत्तरं निसर्ग आणि ऋतू देत असतात. ऋतूंना परत बहर येत असतात. बालपण मुलं, नातवंड यांच्या रूपात आजूबाजूला वावरत असतं आणि आयुष्यातील प्रेम कधीच दूर गेलेलं नसतं. आपली माणसं असतातच आपल्या अवतीभवती, प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ! 

– – – हे एकदा कळलं की मग हरवणं आणि सापडणं हा केवळ उन्ह सावलीचा खेळ भासतो.

लेखिका : सुश्री माधुरी ताम्हाणे देव 

संग्रहिका: सौ.बिल्वा शुभम् अकोलकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments