सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ मय्यत… ☆ सुश्री शीला पतकी ☆
सकाळीच साडेसात वाजता मोबाईल वाजला. खरं तर हल्ली पहाटे छान झोप लागते आणि मग उठायला जरा उशीरच होतो… दिवसभर करायचं काय? त्यामुळे जरा निवांतपण चालू आहे…. मी फोन घेतला … कामवाल्या बाईचा फोन …बाई शेजारी मयत झाली, मी येत नाही ….मी रागाने फोन बंद केला. सकाळी उठून कसले फोन करतात … बरं कोणाचं तरी कुणीतरी मेलेलं असतं, पण ह्यांना तिथे जाणं अगदी जरुरीचेच आहे .मी नवीन कामवाली बाई ठेवताना तिला पहिला प्रश्न विचारला .. ‘ तुझं नाव काय आणि कुठे राहतेस? ‘ कारण तिचा आमचा पाण्याचा वार एक येऊ नये यासाठी ही धोरणात्मक हुशारी …दुसरा प्रश्न विचारला ‘ महिन्यातून मयत किती? ‘ ….. तिला काही कळलं नाही. ती गोंधळून गेली .. ‘ म्हणजे मयत झाले असे सांगून किती वेळा जाणार आहेस.’ . त्यावर तिचं केविलवाणं उत्तर.. ‘ आम्हाला जावंच लागतं बाई .. ते काय असंच आता सांगता येतं का.’ .. मी म्हटलं ‘ का ग तुम्ही गेला तर ते काय उठून उभारणार आहे ? का काम करावीत मग ? जावं …. तिथे जाऊन काय करता तुम्ही ? काहीच नाही … एकाला एक आवाज काढून रडत बसायचं. त्यांच्याबद्दल तुम्हाला प्रेम सुद्धा नसतं, मग असं का वागता ? पहिल्यांदा कर्माला महत्व द्यावं …..! ‘ डोंबलाचं कर्म … तिला काहीच कळत नव्हतं. ती म्हणाली, ‘ बाई आम्ही जर गेलो नाही तर आम्हाला कोण येणार ? ‘ .. ‘ अग तुला कुठे दिसणार आहे ..? ‘ हा वाद खूप वेळ चालला ती आपल्या उत्तरावर ठाम होती की मयत झालं तर मला जावं लागणार … सगळेच तसे … त्यामुळे मी तिला नाकारू शकत नव्हते .
मग त्या शब्दावरून लहानपणीचा एक प्रसंग मला आठवला. सहा-सात वर्षांचि मी असेन. वडिलांबरोबर कार्यक्रमाला जात असे. वडील एका सायकलवर आणि आमच्याकडे साथीदार असलेला डोके नावाचा मुलगा दुसऱ्या सायकलवर होता… त्याच्या सायकलवर मी डबल सीट बसलेली. वडील थोडे पुढे निघून गेले, आम्ही थोडे मागे होतो. एके ठिकाणी पोलिसांनी डबल सीट म्हणून आम्हाला पकडले आणि दंड काढा म्हणून सांगितले. याच्याजवळ पैसे नव्हते, मला तर काहीच कळत नव्हते. मी त्यांच्या तोंडाकडे बघत होते.. आधी पोलीस म्हणल्यावर मी घाबरून गेले.. तो डोके म्हणाला ‘ नाही हो बच्चे की मा मर गई है .. मयत मे जाना है .. बच्चे को मावशी की घर से लाया हु ‘ …. पोलीस हळहळला .. ‘ अरे अरे कितने छोटी बच्ची ‘ .. त्याने माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि आम्हाला सोडून दिलं … मला काही हा प्रकार कळला नाही. फक्त एवढं कळलं की त्याने मयत हा शब्द वापरला होता.. माझ्या मनात त्या शब्दाविषयी कुतूहल होते. असा या शब्दाचा काय अर्थ होता की सरकारी पोलीस सुद्धा हळहळला .. त्याने माझ्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि आम्हाला दंड न करता सोडून दिले. म्हणजे काहीतरी महान शब्द असावा. दोन दिवस मी त्याच्यावर विचार करत होते. दोन दिवसांनी मी वडिलांना एकदा विचारलं.. ‘ दादा मयत म्हणजे काय हो? ‘ वडील म्हणले ‘ तुला काय करायचे, कोणी सांगितलं तुला हे ‘ .. मग मी झाला प्रसंग सांगितला. वडील म्हणाले ‘ काही तसं नसतं. तुझ्या आईकडे तू निघाली आहेस अस त्याने सांगितलं.’ पण मला ते काही फारसं पटलं नाही.
पुढे दोन चार दिवसांनीच आमच्या तिथल्या मशिदीवरून अनाउन्समेंट झाली….’ इनके घर मयत हो गयी है और मयत दो बजे निकलेगी ‘ .. मला कळेना की मशिदीतला माणूस आईला भेटायला जायचे हे माईक वरून सगळ्यांना का सांगतो आहे आणि त्या दिवशी मला मयतचा खरा अर्थ कळला. मयत म्हणजे माणूस मेलेले असणे. मात्र मला खूप वाईट वाटले की आमच्या त्या डोके नावाच्या माणसाने माझ्या आईला मारले …. केवळ दंड भरावा लागू नये म्हणून. मग मी त्याला मात्र लहान असूनही बोलले व ‘ तुम्ही आमच्या आईला मारता काय ‘ आणि मी आईला गच्च मिठी मारली !…
कुठल्या शब्दाचे अर्थ संदर्भ आपल्याला कधी आणि कसे लागतील ते काही सांगता येत नाही. अगदी 70 व्या वर्षी सुद्धा काही शब्द नव्याने कळले आहेत. असो … ‘ मयत ‘ या एका शब्दावरून आज खूप काही आठवलं आणि तेच समोर लिहिलं. असला विषय आवडला का म्हणून विचारलं खरं .. नाही ना, असो….!
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈