डॉ. ज्योती गोडबोले
मनमंजुषेतून
☆ मोठ्या मनाचा छोटा सेल्समन — ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
४ ) मनमंजुषा —
“ स्मृतिगंध “ लेखक : अज्ञात प्रस्तुती : डॉ. ज्योती गोडबोले
स्मृतिगंध…..
मला आठवतंय,…
खूप मोठं होईपर्यंत आम्ही लहानच होतो !
सगळंच स्वस्त होतं तेव्हा, बालपण सुद्धा….
भरपूर उपभोगलं त्यामुळे…. उन्हापावसात, मातीत, दगडात, घराच्या अंगणात, गावाबाहेरच्या मैदानात… कुठेही गेलं तरी बालपणाची हरित तृणांची मखमल सर्वत्र पसरलेली असायची…
आता तसं नाही…
लहानपणीच खूप मोठी होतात मुलं !
खूप महाग झालंय बालपण…. !
पूर्वी आईसुद्धा खूप स्वस्त होती,
फुल टाईम ‘ आईच ‘ असायची तेव्हा ती…… !
आम्हाला सकाळी झोपेतून उठवण्यापासून ते रात्री कुशीत घेऊन झोपवण्यापर्यंत सगळीकडे आईच आई असायची….
आता ‘मम्मी’ थोडी महाग झालीय
जॉबला जातेयं हल्ली. संडेलाच अव्हेलेबल असते…. !
मामा चे गाव तर राहिलच नाही….
मामा ने सर्वाना मामाच बनवल….
प्रेमळ मामा आणि मामी आता राहिलेच नाहीत पूर्वीसारखे….
आधी मामा भाच्यांची वाट पहायचे….
आता सर्वाना कोणी नकोसे झालाय….
हा परिस्थितीचा दोष आहे…
मित्र सुद्धा खूप स्वस्त होते तेव्हा…
हाताची दोन बोटं त्याच्या बोटांवर टेकवून नुसतं बट्टी म्हटलं की कायमची दोस्ती होऊन जायची…. शाळेच्या चड्डीत खोचलेला पांढरा सदरा बाहेर काढून त्यात ऑरेंज गोळी गुंडाळायची आणि दाताने तोडून अर्धी अर्धी वाटून खाल्ली की झाली पार्टी… !!!
आता मात्र घरातूनच वॉर्निंग असते,
“डोन्ट शेअर युअर टिफिन हं !”
मैत्री बरीच महाग झालीय आता.
हेल्थला आरोग्य म्हणण्याचे दिवस होते ते…. !!!
सायकलचा फाटका टायर आणि बांबूची हातभर काठी एवढ्या भांडवलावर अख्ख्या गावाला धावत फेरी घालताना तब्येत खूप स्वस्तात मस्त होत होती…..
घट्ट कापडी बॉलने आप्पाधाप्पी खेळताना पाठ इतकी स्वस्तात कडक झाली की पुढे कशीही परिस्थिती आली तरी कधी वाकली नाही ही पाठ…
इम्युनिटी बूस्टर औषधं हल्ली खूपच महाग झालीत म्हणे…. !!!
ज्ञान, शिक्षण वगैरे सुद्धा किती स्वस्त होतं…..
फक्त वरच्या वर्गातल्या मुलाशी सेटिंग लावलं की वार्षिक परीक्षेनंतर त्याची पुस्तकं निम्म्या किंमतीत मिळून जायची…..
वह्यांची उरलेली कोरी पानं काढून त्यातून एक रफ वही तर फुकटात तयार व्हायची….
आता मात्र पाटीची जागा टॅबने घेतलीय,
ऑनलाईन शिक्षण परवडत नाही आज !
एवढंच काय, तेव्हाचे
आमचे संसार सुद्धा किती स्वस्तात पार पडले….
शंभर रुपये भाडं भरलं की महिनाभर बिनघोर व्हायचो…
सकाळी फोडणीचाभात/पोळी किंवा भात आणि मस्त चहा असा नाष्टा करून ऑफिसमध्ये जायचं, जेवणाच्या सुट्टीत (तेव्हा लंच ब्रेक नव्हता) डब्यातली भेंडी/बटाटा/गवारीची कोरडी भाजी, पोळी आणि फार तर एक लोणच्याची फोड… !!
रात्री गरम खिचडी, की झाला संसार…
ना बायको कधी काही मागायची ना पोरं तोंड उघडायची हिंमत करायची…..
आज सगळंच विचित्र दिसतंय भोवतीनं…. !!
Live-in पासून ते Divorce, Suicide पर्यंत बातम्या बघतोय आपण…. , मुलं बोर्डिंगमधेच वाढतायत, सगळं जगणंच महाग झालेलं….. !!
काल परवा पर्यंत मरण तरी स्वस्त होतं…..
पण आता….
तेही आठ दहा लाखांचं बिल झाल्याशिवाय येईनासं झालंय….
म्हणून म्हणतोय… जीव आहे तोवर भेटत रहायचं.. आहोत तोवर आठवत रहायचं……
नाहीतर आठवणीत ठेवायला सुद्धा कोणी नसणार…. ही जाणीव पण झाली तर रडत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नसेल हो..
म्हणून जमेल तेवढे नातेवाईक किंवा मित्र गोळा करून ठेवा….
नाहीतरी ह्या स्मृतीगंधा शिवाय आहे काय आपल्याजवळ.. हो ना….. !!!
लेखक : अज्ञात
प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
छान लेख आमच्या साठी प्रस्तुत केलात.