सुश्री नीता कुलकर्णी
☆ “हळदी कुंकू …” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
हळदी कुंकवाला घरी बोलावणे ही एक सुंदर प्रथा आपल्या धर्मात आहे. त्यानिमित्ताने आवर्जून एकमेकांच्या घरी जाणे होते. स्नेहबंध राहतो. नाती दृढ होतात.. टिकून राहतात. एकमेकांच्या घरी गेल्याने पुढच्या पिढीची ओळख.. जवळीक होते. ही नात्यांची साखळी पुढे पुढे जात राहते.
माझ्या लहानपणी हळदीकुंकवाचे आमंत्रण देणे याची फार गंमत असायची. लांब राहणाऱ्या लोकांचे आमंत्रण वडील सायकलवरून जाऊन देत असत. भाऊ मोठा झाला की हे काम तो करायला लागला. जवळ राहणाऱ्या आईच्या आणि आमच्या मैत्रिणींकडे आमंत्रण आम्ही दोघी बहिणी करायला जात असू. त्याची आम्हाला फार मज्जा वाटायची. शाळेतून आलो की आम्ही निघत असू. त्यांचा क्रमही ठरलेला असायचा.
पहिलं घर होतं आईच्या मैत्रिणीचं भडभडे मावशीच… एकदा काय गंमत झाली…
मावशीकडे गेलो. ती बसा. म्हणाली तिने आम्हाला दोघींना खोबऱ्याच्या वड्या खायला दिल्या. आम्ही खात होतो. त्यांच्याकडे पाहुणे आलेले आजोबा समोर बसलेले होते. त्यांनी आमची नावं विचारली. मग म्हणाले,
” पाढे पाठ आहेत का ?ते पाठ करा हिशोब घालताना आयुष्यभर त्यांचा उपयोग होतो. “
” हो आम्ही पाढे पाठ केलेले आहेत ” बहीण म्हणाली.
” मग म्हण बघू एकोणतीसचा पाढा “.. आजोबा म्हणाले.
मावशी म्हणाली….
“अहो पोरींची परीक्षा कसली घेताय? “
पण बहिणीने सहजपणे एकोणतीसचा पाढा म्हणून दाखवला. आजोबा एकदम खुश झाले.
म्हणाले, ” पोरगी फार हुशार आहे धीटुकली आहे. त्यांना अजून एक एक वडी दे. “
आजोबांचं भविष्य खरं झालं. आक्का हुशारच होती. मोठी झाल्यावर तिने स्वतःचा क्लास काढला आणि हजारो मुलांना शहाणं केलं, शिकवलं.
आईच्या बागडे या मैत्रिणीकडे गेलो होतो. ती गप्पीष्ट होती. गंमत जंमत करायची. म्हणून ती आम्हाला फार आवडायची.
ती म्हणाली, ” तुम्हाला च ची भाषा येते का?”
“हो येते की. “.. तेव्हा ती सगळ्यांनाच यायची.
संदीप खरेनी त्या च च्या भाषेत ” चम्हाला तु चंगतो सा… “.. अगदी वेगळीच अशी कविता पण केली आहे.
मावशी म्हणाली, ” तुम्हाला अजून एक भाषा सांगते. मुंडा रूप्याची “
” मावशी ही कुठली भाषा “?
मग तिने आम्हाला नीट समजावून सांगितलं.
प्रथम व म्हणायचं मग त्या अक्षराचा पहिला शब्द सोडून बाकीचे पुढचे सगळे शब्द म्हणायचे नंतर मुंडा म्हणायच नंतर पहिला शब्द म्हणून रूप्या म्हणायचं.. तुला म्हणताना वला मुंडा तू रुप्या म्हणायचं.. काहीतरी म्हणताना वहीतरी मुंडा का रुप्या म्हणायचं… “
मावशीने हे निराळच शिकवलं.
त्याची फार गंमत वाटायला लागली. आम्ही ती भाषा लगेच शिकलो. माझ्या भावाला पण ती भाषा यायला लागली. पुढे आमचे आम्हाला काही प्रायव्हेट बोलायचं असलं की आम्ही त्या भाषेत बोलत असू. अजूनही आमची ती मजा चालू असते.
आम्ही दोघी बहिणी हातात हात घेऊन… गप्पा मारत जात असलेला तो रस्ता आठवणीने सुद्धा जीवाला सुखावतो…
आईच्या मैत्रिणी, वाड्यात राहणाऱ्या काकू, आसपास राहणारे, स्मरणात आहेत. आईच्या गुजराती, मारवाडी मैत्रिणी सुंदर साड्या दागिने घालून हळदी कुंकवाला यायच्या. कसेही करून वेळात वेळ काढून, ऊशीर झाला तरी बायका हळदी कुंकवाला यायच्याच…
अत्तरदाणी, गुलाबदाणी बाहेर काढायची. वडील त्यासाठी गुलाब पाण्याची बाटली आणून द्यायचे.
चैत्रगौरीला हातावर कैरीची डाळ दिली जायची. काही हुशार बायका डबा घेऊन यायच्या. मोठ्या पातेल्यात पन्हे करायचे. पाणी प्यायच्या भांड्यात ते द्यायचे. ओल्या हरभऱ्यानी ओटी भरली जायची. आम्हा मुलींना पण मूठ मूठ हरबरे दिले जायचे. त्याचे आम्हाला फार कौतुक वाटायचे. आई त्याचे चटपट चणे, मिक्स भाजी, उसळ असे पदार्थ करायची. हळदी कुंकवाच्या निमित्ताने त्या ऋतूला साजेसे आणि पोटाला योग्य असे हे पदार्थ केले जायचे आणि आरोग्य सांभाळले जायचे.
या हळदी कुंकवाच्या आमंत्रणाची जी. ए. कुलकर्णी यांची “चैत्र” ही नितांत सुंदर कथा आहे.
श्रावण शुक्रवारच हळदीकुंकू छोट्या प्रमाणात असायचं. वाड्यात आणि जवळ राहणाऱ्या बायका यायच्या.
गरम मसाला दूध आणि फुटाणे दिले जायचे. पावसाळ्यात फुटाणे खाल्ले की खोकला होत नाही अस आजी सांगायची.
“शुक्रवारचे फुटाणे “….
असं म्हणून ओरडत सकाळीच फुटाणेवाला यायचा. त्याची पण आज आठवण आली.
गणपती नंतर गौरी यायच्या. पण त्याचं आमंत्रण घरोघरी जाऊन द्यायचं नसायचं. जिला जसा वेळ होईल तसं ती येऊन जायची कारण त्यावेळेस प्रत्येकजण गडबडीत असायची. त्या हळदीकुंकवाला
“गौरीचे दर्शन ” महत्त्वाचे असायचे. प्रसाद म्हणून हातावर अगदी साखर खोबरे सुद्धा दिले जायचे.
संक्रांतीला तिळाची वडी, लाडू असायचा. आईच्या गुजराथी मैत्रिणीने तिला नुसत्या साखरेची कॅरमल सारखा पाक करून लाटून करायची वडी शिकवली होती. ती खुसखुशीत वडी सगळ्यांना आवडायची. आम्हाला मात्र कोणी काय लुटलं याचीच उत्सुकता असायची. प्लास्टिकचे डबे, छोट्या वाट्या, गाळणी, कुंकू, दोऱ्याचे रीळ, आरसे, रुमाल असं काही काही असायचं.
एकदा आईच्या मैत्रिणीनी.. अघोरकर मावशींनी सगळ्यांना शंभर पानी वही दिली होती. त्यावर रोज एका पानावर “श्रीराम जय राम जय जय राम” लिहायचं असं तिने सांगितलं होतं.
किती गोड कल्पना.. काही दिवस आपोआप नामस्मरण होत गेलं.
हळदीकुंकवाला बायका यायच्या. गप्पा व्हायच्या. नव्या नवरीला नाव घे म्हटलं की ती लाजत लाजत नाव घ्यायची….
त्या दिवशी घरी घूम चालायची…. वडील मित्राकडे जायचे किंवा नातेवाईकांकडे जायचे. चार पासून ते रात्री आठपर्यंत गडबड असायची. दिवसभर आई खुश असायची.
किती छान दिवस होते ते…. आताही आठवले तरी मन हरखून जाते.
आपली ही हिंदू संस्कृतीची परंपरा आपण अशीच चालू ठेऊ या…
संक्रांतीच्या हळदीकुंकवाची तुमची तयारी झाली का? यावर्षी काय लुटणार आहात?
बऱ्याच बऱ्याच गोष्टी आतापर्यंत लुटून झालेल्या आहेत. यावेळेस काहीतरी वेगळं लुटू या का?
करा बरं विचार……
तुम्हालाही काहीतरी नवीन सुचेल. जरा वेगळं असं काही मिळालं की मजा येईल…
माझ्या मनात एक विचार आला..
यावर्षी ” वेळ ” लुटायची कल्पना कशी वाटते तुम्हाला ?
कोणाला तरी तुमचा वेळ द्या. आनंदाने प्रेमाने त्याच्याशी बोला. प्रत्यक्ष भेटा… फोन करा…
” तिळगुळ घ्या गोड गोड बोला ”
असं नुसतं म्हणण्यापेक्षा प्रत्यक्ष बोललात तर जास्ती आनंद होईल……
यावर्षी असा आनंदच लुटला तर….
तुम्ही तुमच्या पद्धतीने कसाही साजरा करा. तुम्ही आणलेलं वाण सगळ्यांना जरूर द्या…
हा आनंद लुटायचा सण आहे.
कोणाचा आनंद कशात आहे हे तुम्हाला माहीत आहे…
तो मात्र त्याला जरूर द्या.
संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा.
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈