डाॅ.भारती माटे
☆ “प्रयागराज येथील महाकुंभ.. एक अनुभव…” – लेखिका : सुश्री रविबाला काकतकर ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆
☆
आत्ता नुकतेच महाकुंभला जाता आले. तीन रात्री आणि चार दिवस असे वास्तव्य होते. उत्तर प्रदेश सरकारच्या ‘आगमन’ ह्या टेन्ट सिटी मध्ये बुकिंग केले होते.
दुर्दैवानी माझी मैत्रीण आणि मी असे जाणार होतो. पण ऐनवेळी काही कारणांनी तिचे येणे cancel झाले. त्यामुळे एकटीने जाण्याचे धैर्य केले.
माझ्या जावयानी बुकिंग केले, त्या एजन्टनी दिलासा दिलान की “खूप सुरक्षित आहे तुम्ही जा. मी गाईडची व्यवस्थाही केली आहे. “
पुणे दिल्ली प्रयागराज असा विमान प्रवास करून तारीख 15 जानेवारीच्या रात्री टेन्ट सिटी ला पोहोचले. Reception मध्ये गळ्यात एक सिल्कीश स्कार्फ घालून स्वागत झाले. अतिशय उत्कृष्ट असा डिलिक्स टेन्ट आणि त्यालाच लागून असलेले स्वतंत्र न्हाणीघर अशी व्यवस्था
होती. मुख्य आखाडे, नदी, त्रिवेणी संगम सर्वांपासून हे हॉटेल किमान दोन किलोमीटर इतक्या दूर वर आहे. हॉटेलचा एकूणच परिसर खूप मोठा होता. त्यामुळे सर्वदूर जायला गोल्फ कार्ट्स होत्या. जेवणघर, स्वागतकक्ष आणि शेकडो टेन्ट्स.
बरेच परदेशी लोकही होते. मोठमोठ्या गाड्या भरून पाहुणे येतच होते.
मुख्य प्रश्न होता दुसरी कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसताना मी दुसऱ्या दिवशी गावात कशी जाणार? कारण गाडीचे भाडे दर दिवसाला 7. 8 हजार, गाईडचे भाडे 6 हजार एका दिवसाला. मी तीन रात्री चार दिवसांचे बुकिंग केले होते. मग गाईड असला तरी जाणे परवडणारेच नव्हते.
गाईडशी दुसऱ्या दिवशी सकाळी बोलल्यावर कळले ते वेगळेच. विद्यार्थ्यांची एक टीम यात्रेकारुंना सर्व दाखविण्यासाठी प्रशिक्षित केली आहे. पण त्याच्या पैकी कोणाला टेन्ट सिटी च्या आत प्रवेश नव्हता.. त्यामुळे बाहेर उभे राहून त्यातले तीनजण माझ्याशी बोलत होते. हॉटेलच्या स्टाफ पैकी एका मुलीने माझे गाईडसाठी पुण्याहून येण्यापूर्वी पैसे घेतले होतेन. तिनी आश्वस्त केल्यावर त्यांनी एक सुझाव मांडला की मी एकटी आहे आणि जर मला चालणार असेल तर ह्या मुलाच्या मोटर सायकलवर मागे बसून तो मला हा सर्व परिसर, देवळे, संगम इत्यादी दाखवेल. मी तयार झाले. कारण दुसरा काही पर्याय नव्हता. पण ह्या मुलानी तिनही दिवस माझी खूप काळजी घेतलीन. मला सर्व वेळ माझे वय पाहून मला दादीदादी म्हणत फिरवून आणले! 😄
ह्याच हॉटेलच्या मागे गंगेचा एक प्रवाह येत होता. तिथे ह्या टेन्ट सिटी च्या लोकांसाठी स्नानाची व्यवस्था होती.
सकाळपासून आणि रात्री तर खूपच थंडी होती.
त्यामुळे पाण्यात जाण्याचे धाडस होत नव्हते.
आंघोळीला पाणी नळाला गंगेचेच येत होते मग वेगळे थंडीत जाऊन पाण्यात स्नान करण्याचे धाडस होतं नव्हते. 😄 पण अखेर शेवटच्या दिवशी गार आणि स्वच्छ पाण्यात नाक दाबून डुबी घेतल्या तेव्हा जाणवले की, हा अनुभव आधीच हे का घेतला नाही 🙆♂️ इतके छान वाटत होते.
कुंभ मधील शाही स्नानाचे दिवस सोडले तर गर्दी खूपच कमी होती सर्वच रस्त्यांवर. आणि
तिथल्या हॉटेल्सचे रेट्स अश्यावेळी निम्मे होतात.
पहिल्या दिवशी गंगा, यमुना आणि गुप्त सरस्वती ह्याच्या संगमाला भेट दिली.
वेणी माधव हे प्रसिध्द विष्णू – लक्ष्मी मंदिर, वासुकी नागाचे मंदीर ह्यांना भेट दिली.
झोपलेल्या हनुमानाच्या मंदिराला काही वर्षांपूर्वी भेट दिली असल्यामुळे गर्दीत गेले नाही.
त्या आधी विविध आखाड्यांना भेट दिली. जुना आखाडा येथे नागा साधू. एकानी डोक्यावर काही किलोंचे ओझे रात्रंदिवस बाळगणारा साधू, तर एकानी, त्याचा दावा हात, सतत आकाशात उंच ठेवण्याचे
आव्हान पेललेले दिसले.
तो फक्त फळांहारावर जगतो आहे.
पुढे त्यांना नेमून दिलेल्या जागांवर धुनी इतवून येणाऱ्या भक्तांना प्रसादाची राख कपाळाला लावत होते.
त्यानंतर किन्नरांच्या आखाड्याला भेट दिली.
अनेक साधू त्यांच्यापुढे ताट ठेवून त्याच्यामध्ये येणाऱ्या भक्तांना पैसे टाकण्याची विनंती करत होते. हे सर्व खूप कमर्शिअल वाटलं तरी सुद्धा त्या साधूंच्या पोटापाण्याच्या व्यवस्थे करता लोकांना आशीर्वाद देणे हा त्यांचा व्यवसाय असावा असेही वाटले.
स्वामी अवधेशानंद यांच्या आश्रमाला भेट दिली हा एक अगदी फाईव्ह स्टार मोठा आखाडा आहे. पुण्याची माझी एक मैत्रीण तिथे सेवा देत आहे.
म्हणून तिथे भेट दिली.
स्वामीजींचे दर्शन मिळाले. त्यांची राम कथा एक तास ऐकली. या स्वामीजींना भेटायला अनेक मोठी मान्यवर लोक येतात असे समजले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोवीद यायचे होते असेही समजले.
चौथ्या दिवशी आचार्य रामभद्राचार्य जे स्वतः दोन्ही डोळ्यांनी अंध आहेत अनेक भाषांचे तज्ञ स्वतःचे विद्यापीठ असलेले आणि संत तुलसीदास यांचे रामायण मुखोद्गत असलेले गीता तसेच अनेक संस्कृत वेद मुखदगत असलेले अशी त्यांची ख्याती असल्यामुळे मला त्यांना भेटण्याची उत्सुकता होती तिथे गेल्यानंतर किमान दोन तास वाट पाहावी लागली प्रचंड गर्दीतून वाट काढत त्यांची अखेर दर्शन झाले.
वासुकी मंदिर बद्दल एक कथा कळली
जेव्हा देव आणि दानव यांचे युद्ध झाले आणि समुद्रमंथनावेळी ज्या गोष्टी बाहेर पडल्या त्यातील जो अमृत कलश बाहेर पडला. त्याचे चार थेंब चार ठिकाणी जिथे पडले तिथे आता कुंभ आयोजित केला जातो हे सर्वश्रुत आहे उज्जैन हरिद्वार नाशिक आणि प्रयाग. देव आणि दानवांच्या या युद्धानंतर विविध वस्तू दोघांनाही मिळाल्यानंतर युद्ध समाप्त झाले परंतु ज्या वासुकीला ह्या मंथनासाठी घुसळण्यासाठी वापरण्यात आले होते त्याचे संपूर्ण अंग सोलवटल्यामुळे तो जखमी झाला. म्हणून त्यानी देवाकडे प्रार्थना केली की मला काय मिळाले?त्यावर देवाने त्याला असे सांगितले की गंगेकाठी तुझे मंदिर बांधले जाईल. तू येथे विश्रांती घे.
वेणी माधव मंदिर आणि नागवासुकीचे दर्शन झाल्याशिवाय ही यात्रा पूर्ण होणार नाही.
अशा या नागवासुकी मंदिराला जाण्यासाठी देखील प्रचंड रांग होती तरी सुदैवाने मला लवकर दर्शन मिळाले.
अशा रीतीने चौथ्या दिवशी माझी यात्रा समाप्त झाली.
अजून बरेच आखाडे आहेत परंतु त्या सर्व ठिकाणी जाता आले नाही. अनेक आखाड्यांमधून विविध प्रकारची भजने मोठ्या आवाजामध्ये चालू असतात जणू त्यांची स्पर्धाच आहे. परंतु तोही हा सर्व महा कुंभाचाच एक भाग होय. मोठमोठे वॉच टॉवर्स त्रिवेणीच्या काठी बांधलेले आहेत तेथे हरवलेल्या लोकांच्या वस्तू आणि हरवलेली माणसे यांच्यासाठी स्पीकर वरून घोषणा केल्या जातात. त्यातील एक घोषणा खूपच गमतीशीर वाटली. तो पोलीस स्पीकर वरून सांगत होता की, अजमेर से आई हुई एक सीता मैया अपने राम की राह देख रही है त्या सीतामय्याचं आणि रामाचं नाव घेऊन तीन वेळा तो पुकारत होता!
महाकुंभला भेट देण्याचा
अनुभव फक्त
‘महसूस’ करना चाहिए, असाच आहे!
स्वच्छतेच्या जनजागृतीबद्दल सरकारचे मनःपूर्वक कौतुक आणि अभिनंदन. प्लास्टिक आणि कागद मुक्त रस्ते आणि नदीघाट बघून सरकारचे, सतत झाडत असलेल्या कर्मचाऱ्यांचे आणि भक्तांचेही आभार. अनेक ठिकाणी कचरापेट्या ठेवाल्याचाही परिणाम.
नदी काठी झालेली गंगा आरती आणि त्यानंतर शेकडो लोकांनी एकावेळी म्हटलेले राष्ट्रगीत निःशब्द करणारे होते! 🙏
त्यावेळी निर्माण झालेली प्रचंड सकारात्मक ऊर्जा आजही अंग रोमांचित करते आणि ह्या इतक्या उत्तम देशात आपण जन्मलो ह्याबद्दल परमेश्वरपुढे नतमस्तक होतो.
गंगेच्या पाण्याच्या जलतत्वाशी एकरूप होण्यासाठी गंगेकाठी काही काळ तरी बसणे हवे.
तेव्हा सुरु झालेल्या आतल्या प्रवासाचा आनंदमयी अनुभव हा सर्वस्वी आपला स्वतःचाच आणि प्रत्येकाचा वेगळा.
त्याचा प्रत्यय घ्यावा मात्र जरूर.
पुराणकथांमधील कथांच्या
सत्या -सत्यतेचा ऊहापोह न करता श्रद्धा आणि भक्तीने ओताप्रोत भरलेल्या आणि मैलोनमैल डोक्यावर सामान घेऊन चालणाऱ्या भाविकांच्या सागरात आपणही बुडून जावे हे खरे.
त्याचमुळे दैनंदिन जीवनातील संकटांना आपण तो आपला भाग
समजून नवी उमेद घेऊन जगू शकतो. हे सर्व केवळ स्तिमीत करणारे आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्याला अनेक हातांनी केवळ देणाऱ्या भंडाऱ्यांमधील अन्नछत्रे तिथे येणाऱ्या हजारो भाविकांचा मोठा आधार आहेत.
तिथल्या जेवणाला खरंच वेगळी रुची होती ह्याचा अनुभव घ्यायला मिळाला.
एकूणताच उर्वरित दिवसांमध्ये एकदा तरी सर्वांनी महाकुंभला जरूर भेट द्यावी आणि त्या एका वेगळ्याच वातावरणाचा अनुभव घ्यावा
🌹 🙏
लेखिका : सुश्री रविबाला काकतकर
पुणे.
प्रस्तुती : डॉ. भारती माटे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈