श्री सुनील देशपांडे
मनमंजुषेतून
☆ ती… ☆ श्री सुनील देशपांडे ☆
☆
आमच्या आईच्या वयाची (आमची नातवंडं आता रोमँटिक सिनेमा पाहायच्या वयात आलीत)
तरीही ती आमची लाडकी रोमँटिक हिरोईन.
तिचं नाक नाजुक आणि धारदार होतं?
छे हो नाजूक कसलं, थोडं जाडंच. धारदार तर अजिबात नाही.
तिचे ओठ नाजूक होते?
ते हो नाजूक कुठले आकाराने सुंदर परंतु थोडे जाडेच नाही का?
जिवणी नाजूक? नाहीच.
डोळे माशा सारखे म्हणजे मीनाक्षी हो! छे ते तसेही नव्हते.
सिंहकटी ? न न् नाही.
मग होतं काय तिच्यात?
आधी तुम्ही ते मासे, त्या चाफेकळ्या त्या गुलाबाच्या पाकळ्या यांचे लोणचे घालून टाका.
सौंदर्याच्या सर्व पारंपरिक कल्पनांना झुगारून देऊन तिने जे आपलंसं केलं
तेच खरं चिरसौंदर्य ठरलं!
ते भावुक, अथांग, काळेभोर डोळे! त्यामध्ये एक खट्याळपणाची झाक!
डोळ्यांचे आणि भुवयांचे विभ्रम!
त्या सुंदर ओठांची मोहक हालचाल!
त्या नाकाच्या शेंड्यावर बेफिकीरपणाची एक झाक!
त्या भव्य कपाळावरून केस सरकवण्यातील एक वेगळीच विलोभनीयता!
त्या निरागस चेहऱ्यावरील खोडसाळ हास्य!
ती अभिनेत्री कधी वाटलीच नाही. तिच्या चेहऱ्यावर जे दिसलं तो अभिनय कधी वाटलाच नाही!
सतत बदलणारे चेहऱ्यावरचे भाव!
संवादातील आणि गाण्यातील शब्दांना न्याय देणारे ते विभ्रम! ती शब्दांची फेक, आणि त्या शब्दांमध्ये मिसळलेली भावगर्भता!
आमचे काही दोस्त त्या विभ्रमांना अदा असे म्हणत!
परंतु एकदा दाखवलेली अदा पुन्हा परत नाही. सतत नवीन नवीन विभ्रम!
एकदा सादर केलेली अदा पुन्हा परत नाही, नो रिपीटिशन!
हाता पायांच्या सर्व शरीराच्या हालचालींमधील सहजता, मोहकता!
निरागसता, खोडसाळपणा, छद्मीपणा या साऱ्यांचं मिश्रण एका मोहक पद्धतीने सतत चेहऱ्यावर जाणवत राहतं आणि मग तेथून नजर हटत नाही.
मधाळ आणि बालिश या दोन्हीचे अफलातून मिश्रण म्हणजेच
मधुबाला!!
तिचा वाढदिवस आणि व्हॅलेंटाईन डे या दोन्हीचे एकाच दिवशी असणे हा मधुनवनीतशर्करा योगच की!
तिचा वृद्धापकाळ काळालाही सहन झाला नसावा म्हणून तरुण वयातच तो तिला घेऊन गेला!
आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या एका ॲपवर मी एक इमॅजिनेशन टाकली 95 वर्षाची मधुबाला कशी दिसेल?
पण त्याने उत्तर दिले,
I can’t imagine!
दुसऱ्या एका ॲपला हाच प्रश्न एका वेगळ्या पद्धतीने विचारला
आज मधुबाला जिवंत असती तर कशी दिसली असती ?
त्याने रेखाटलेले चित्र यासोबत मी जोडले आहे.
आज मधुबाला जिवंत असती तर ती 93 वर्षाची असती!
त्या चिरतरुण स्मृतीला वंदन!
तिच्या आठवांचे सतत मनावर बंधन!
अशी मधुबाला पुन्हा न होणे!!!
म्हणूनच वसंत बापट त्यांच्या कवितेत म्हणाले होते
मधुबाला ती मधुबाला!
☆
© श्री सुनील देशपांडे
फोन :९६५७७०९६४०
ई मेल : [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈