सुश्री शीला पतकी
मनमंजुषेतून
☆ मी, झुरळ आणि संवेदनक्षमता…! ☆ सुश्री शीला पतकी ☆
नातीने माझ्यापुढे वही धरली आणि मला म्हणाली, ” आजी तु शीला.. मग संवेदनाशीला कोण?” मी म्हणाले संवेदनाशीला अशी व्यक्ती नसते संवेदनाशीलता हा गुण आहे.. खरं तर ती क्षमता आहे म्हणून त्याला संवेदनक्षम असेही म्हणतात. म्हणजे पहा परवा दारात एक मरतूकडे कुत्रे कुडकुडत बसले होते… मग तू त्याला लगेच चादरीचा छोटा तुकडा टाकलास खायला दिलं कारण तू संवेदनाक्षम आहेस असं ज्याच्या मनात येतं ना दुसऱ्याबद्दल तो माणूस संवेदनाक्षम असतो… आता पाचवीतल्या मुलीला यापेक्षा वेगळं काय सांगणार… !
प्रत्येक माणूस संवेदनाक्षम असतोच हा गुणवर्धिष्ण होणं गरजेचं आहे… आपण लहान असताना संवेदनाक्षम असतोच पण जसे जसे मोठे होत जातो.. व्यवहारी बनत जातो.. जगाचा अनुभव घेत जातो तसे तसे ही संवेदना कमी होते. ही ज्याची टिकून राहिली त्याचे बालपण पण टिकते त्याला दुसऱ्याचं दुःखाशी समरस होता येते.
मला आठवतं लहानपणी म्हणजे सुमारे 60 /65 वर्षांपूर्वी आमच्या घरामध्ये झुरळं झाली होती त्यांना मारण्यासाठी कुणीतरी एक औषधाची डबी दिली. काड्यापेटी सारख्या तो बॉक्स होता आणि आत एक गुलाबी रंगाची पुडी होती. ते औषध पिठात मिसळून ठेवले की झुरळ खातात आणि मरतात. ते लहान मुलांपासून वेगळे ठेवावे असे त्या वेळेला आवर्जून सांगत अगदी नवीन औषध निघाले होते !आम्हा सगळ्या घरातल्या छोट्या मुलांना बोलवून.. याला हात लावायचा नाही.. हे निक्षून सांगितले आम्ही म्हणलं हे कशासाठी आहे? तर ते झुरळ मारण्यासाठी आहे विषय संपला!… मी चौथीत होते माझ्या डोक्यात विषय अधिक पक्का झाला झुरळ मारण्यासाठी औषध… खरंतर औषध बरं करण्यासाठी देतात मग हे मारण्यासाठी का वापरतात मग त्या झुरळाना किती वाईट वाटेल आणि समजा एक आई झुरळ आणि एक मूल झुरळ असेल किंवा एक मित्र झुरळ असेल तर त्यांना किती वाईट वाटेल कोणीतरी मेल तर आणि या माझ्या विचारातून मी दोन पानी संवाद लिहिला… दोन झुरळं एकमेकांशी बोलतात आणि माणसाने आपल्यासाठी मरावयाचे औषध तयार केले आहे त्यामुळे आपण आता नक्कीच मरणार ही माणसं किती वाईट आहेत ना…. असा विचार घेऊन मी मोठी फुलस्कॅप दोन पानं लिहिली होती अर्थात ती कुणाला दाखवली नाहीत त्यावेळेला ते लाज वाटत होती आणि खरंच आजपर्यंत मी कोणाशी बोलले पण नाही पण मला वाटतं ती माझ्या संवेदनाक्षम मनाची खूण होती आणि तिथूनच मी लिहायला सुरुवात केली असावी!
माणसं म्हातारपणी संवेदनाक्षम, हळवी होतात असं सर्वत्र म्हटलं जातं असं काही नसतं फक्त त्या त्या काळात आपण इतर भावनांना अधिक महत्त्व देतो. मग कधी कर्तव्याला कधी कठीण होण्याला कधी कठोर निर्णय घेण्याला आणि त्यामुळे ती संवेदनक्षमता थोडी बाजूला पडते याचा अर्थ माणूस संवेदन क्षमता हरवून बसलाय असं नसतं थोड्या अधिक प्रमाणात हे कमी होऊ लागले हे सत्य आहे आपण अगदी जेवण करीत टीव्हीवर दाखवली जाणारी प्रेत यात्रा पहात असतो हे कोणत्या संवेदनक्षमतेचे उदाहरण आहे? आपण थोडे बोथट झालो आहोत एवढे मात्र खरे!…….
प्रत्येक माणसाच्या अंगी संवेदनक्षमता असतेच त्याचे एक छान उदाहरण मी परवा एका कार्यक्रमात ऐकले रुळानुबंध नावाचे श्री कुलकर्णी यांचे पुस्तक आहे त्याबद्दल सांगताना त्यांनी असे सांगितले की ते रेल्वे इंजिन चालवत असत त्यांच्या त्या डब्यात म्हणजे इंजिनाच्या आत एक फुलपाखरू आले आणि ते डबाभर इकडे तिकडे हिंडू लागले ब्रेकच्या याच्यावर बस वरती टपावर बस असे ते इकडून तिकडून धावत होते त्याला पाहण्यात लेखकाला खूप आनंद मिळत होता इथं पावेतो गाडी पंधरा-वीस किलोमीटर पुढे आलेली होती आणि लेखकाच्या मनात विचार आला.. अरे बापरे हे फुलपाखरू आपल्या सवंगड्यांना मित्रांना भावंडाला सोडून आता इतकं पुढं आलंय…. हे आता परत त्यांना कधी भेटेल ना?.. इतक उडून जाणं त्याला शक्य होईल का? त्याला मार्ग सापडेल का?.. कितीतरी प्रश्न… असा विचार हजार माणसांना घेऊन जाणारी रेल्वे चालवणाऱ्या माणसाच्या मनात हे येते, तो संवेदनाक्षम नाही का?.. मला ते ऐकल्यानंतर खूप मजा वाटली किती छोटी घटना किती जबाबदारीचे काम पण ते करत असतानाही हा माणूस किती संवेदनाक्षम होता…!
अनेक संवेदनाक्षम माणसांमुळे फार मोठी सामाजिक कार्य उभी राहिली आहेत… बाबा आमटे यांनी रस्त्यावर वेदनाने जखमाने तळमळत पडलेला महारोगी पाहिला आणि त्यांच्या संवेदनक्षम मनाला त्या यातना कुठेतरी भिडल्या आणि त्यातूनच कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी मोठे कार्य उभे राहिले… माझी मानस कन्या अनु आणि प्रताप मोहिते यांच्या संवेदनाक्षमतेमधून अनाथ मुले आणि बेघर झालेले आजी आजोबा संभाळण्याचे एक मोठे काम सोलापूर जवळ चालू आहे तेथील एकूण संख्या 80 आहे हा मुलगा फक्त रिक्षा चालवतो पण अनेकानी मदतीचा हात पुढे केला. अनु स्वतः 80 माणसांचा स्वयंपाक रोज करते एक मोठं काम उभे राहिले आहे ते त्यांच्या संवेदनक्षमते मधून…. ! दुसऱ्या माणसाचे दुःख आपल्या काळजाला भिडले की खूप मोठं काम उभे राहते! अशी संवेदनाक्षम माणस हवीत त्या कामाने त्यांना सुख नव्हे समाधान मिळाल आहे… कारण ती निस्वार्थी सेवा आहे… मुलांमधील संवेदना क्षमता आपण जपायला हवी त्यांचे टीव्हीवर खेळले जाणारे खेळ भयानक आहेत बंदुका मारामारी रक्त याला उडव हे क्रुरतेकडे कडे नेणारे आहेत त्यांचे अभ्यासातील धडे सुद्धा माहिती वजा आहेत भाषेच्या पुस्तकात भावना समृद्ध होतील असे धडे हवेत जसे की आमच्या लहानपणी पाडवा गोड झाला. बाळ जातो दुर देशी ही कविता आई ही यशवंत ची कविता दोन मेणबत्ती हा धडा देशभक्त बाबू गेनू चा धडा इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातही गोपाळ सीता सुरेश अहमद त्यांची आई त्यांनी शेजाऱ्यांना केलेली मदत लिटिल मॅच गर्ल भयानक थंडीत ख्रिसमसच्या काळात काड्यापेट्या विकणारी ही मुलगी त्यात थंडीत गोठून मरते हे सगळे धडे माणसातली संवेदना वाढवणारे होते अशा धड्यांची गरज आहे तर ती संवेदनाक्षमता टिकेल. हाणामारीचे चित्रपट मुलांना आवडतात खलनायक हिरो वाटायला लागले आणि असे खलनायकावरती हिरो म्हणून बेतलेले चित्रपट हि आले हे दुर्दैव आहे माणसाची संवेदनक्षमता टिकवण्याचे कार्य मनोरंजनातून शिक्षणामधून साहित्यातून काव्यातून आपल्या घरातून.. घरातल्या मोठ्या माणसांकडून आणि समाजातून होणे गरजेचे आहे त्याबरोबर माध्यमांनी ही काय दाखवावे याचे भान ठेवून हे गुण वर्धिष्णू होतील असे काही दाखवणे गरजेचे आहे आपल्याला काय वाटतं? आपले मत नक्की नोंदवा
© सुश्री शीला पतकी
माजी मुख्याध्यापिका सेवासदन प्रशाला सोलापूर
मो 8805850279
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
खूपच छान लेख!