प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
मनमंजुषेतून
☆ वाय फाय बालपण… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
(टॉस झाला राज्यावर डाव आला तस त्याच्या टीम मंडळीनी चावडीच्या कट्ट्यावर हात ठेवून वाकली, त्यांचा घोडा झाला. जिंकलेल्या टीम मंडळी ने घोड्यावर जाऊन बसली.) — इथून पुढे —
इकडे राजा आणि पक्क्याने डाव सुरु केला. हातात दांडू घेऊन चिंन्नी ठेवली व उंच हवेत उडवत दांडूने जोरात मारली. चिन्नी जोरात हवेतून भिरभिरून उडाली राज्या कॅच घ्यायच्या प्रयत्नात पळत पळत गेला खरा त्याचा लक्ष्य वर हवेत होतं. वर बघत बघत तो पळत होता, नेमक वाटेत शांता पाण्याची घागर घेऊन जात होती. ती आडवी आली अन राज्याची धडक शांतला लागली. शांताची पाण्याची घागर पडली आणि राज्या शांताच्या अंगावर पडला. पारावर बसलेली लोक आली अन राज्याला बडवायला लागली. तस शांता पण लाजून चूर झालेली तिचा परकर पूर्ण भिजला होता. घोडे आणि घोडेसवार ह्यांना काही कळलंच नाही काय झाले ते. पक्क्याने तर चावडीच्या मागच्या बोळातून पसार झाला. राज्या बसलेल्या लोकांच्या तावडीत सापडला.
घोडे अन घोडेसवार ह्यांच्या ढुंगणावर काठीने मार बसल्यावर ती उठली आणि मिळलं त्या रस्त्याने पळत सुटली. तेवढ्यात शांताची आई काठी घेऊन आली तस गाव गोळा झाले. सगळ्यांनी सुटका करून घेऊन मारुतीच्या देवळात लपून बसली. राज्या अन पक्क्या पण तिथे आले, काय झाले ते पक्क्याने सांगताच जोर जोरात हसत बसली.
शांता लग्नाला आलेली पोर दिसायला देखणी, सावळा रंग मॅट्रिक पास होऊन घरातील घरकाम करत होती. तिची आई गौरा तणतणत काठी घेऊन आली.
मेल्यानो तुम्हाला आया बहिणी आहेत की नाहीत. माजलेत नुसते. आता दावतेच माझा हिसका असं म्हणत इकडं तिकडं मुलांना हुडकायला लागली. तेव्हड्यात बायक्का आली म्हणाली. गौरा गावची पोर हैती, लहान हाईत. खेळता खेळता असं व्हतंय. जा गुमान तूझ्या घरला आता.
मी सांगते त्यांना असं म्हटल्यावर गौरा घरी गेली. अन पडदा पडला.
तस सगळी जण मारुतीच्या देवळातन निसटली आणि सरकार वाड्याच्या पटांगणात आली.
ती जागा पूर्ण पटवर्धन सरकाराची पडीक होती. तिथे कोण पण जात नसे.
तिथलाच चिरर घोडा डाव परत चालू झाला. पक्क्याने परत चिन्नी दांडू वर घेतला आणि हवेत उंच उडवत मारला.
मगाचीच घोडी त्यावरचे घोडे स्वार परत बसलेले. असच खेळ खेळता खेळता चिन्नी उंच उडाली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या एका माणसाच्या डोक्यात पडली. त्याला जोरात लागलं. तस सगळीच मुलानी घर जवळ केलं.
दुपारची जेवण झाली तस परत गल्लीत मुलं जमा झाली. सगळ्यांनी हातात हात घेत चकले. नंन्तर जो शेवट राहिला त्याला घोडा केला. आणि त्याच्यावर पळत येऊन पाठीवर दोन हात ठेवायचे आणि दोन तंगड्या फासून त्याला ओलांडून जायचे. एकलम खाजा दुब्बी राजा तिराण भोजा चार चौकडी असा खेळ सुरु झाला ओलांडून असं करता करता एकाला पाठीवरून ओलांडता आले नाही. दोघेही पडली त्यातला गजाच्या नाकाला मार लागला. नाकातून रक्त येऊ लागले तसा डाव सम्पवण्यात आला.
फाल्गुनी महिना तस उन्ह सुरु झालेलं. शिमग्याचे तसेच वार्षिक परीक्षेचे वेध लागलेले. त्यावेळी शौचालये नव्हती. निसर्ग विधि उघड्यावर ओढ्या काठी किंवा गावंधरीत शेतात होतं असे. आमची सगळीच मुलं वेगवेगळ्या ठिकाणी विधिला जात. कारण कुठे कुठे शेणकुटाचा (गोवऱ्या ) हुडवा रचला आहे. ते पाहून ठेवत. जवळपास कोण आहे, नाही ह्याची पण दखल घेतला. कारण शिमग्याला तो हुडवाचं उचलायचा आमचा प्लॅन असे. प्रत्यके हुडव्यात जवळपास हजार बाराशे शेणकूट असतात.
एक दोन हुडवा उचलला तरी आमची होळी सात आठ फूट उंच जाणारी होती. झाले मग हे काम रात्रीच दहा नंन्तर करायच असेलतर घरी कळणार. म्हणून परीक्षा जवळ आली अभ्यासाला आमच्या घरी झोपायला जाणार असं प्रत्येकजण त्यांच्या त्यांच्या घरात सांगे. त्यामुळे कुणालाही संशय येत नसे.
आमचा लांब लचक सोपा होता सहजपने दहा पंधरा मुलं मावत होतीच. एक पान पट्टी ( गुडार – झाडीपट्टी ) हंथरली की सगळेच जण झोपत. फक्त येताना ते त्यांची वाकळ, चादर काहीतरी घेऊन येत असतं. एवढा जामा निमा पुरेसा होता.
घरातले दहा पर्यंत झोपत. आम्ही बाहेरून कडी लावत असू जेणेकरून घरात त्रास नको म्हणून. दोन दिवस अभ्यास झाला. पुढे दहा नंन्तर दोन रिकामी पोती घेउन दोन टीम करून पसार.
वेशीबाहेरची, हाळ विहीर आजूबाजूला एक टीम दुसरी टीम पांनंदी कडे. त्यावेळी गावात लाईट पण नव्हती. आम्ही अंदाजे जाऊन शेण कूट गोळा करायचे. व कुणालाही संशय नं येता पागेतील जागेत ढीग रचायचा. असं सगळं चालू होतं. एक दिवशी गम्मत झाली. सगळेच जण चिंचोळ्याच्या विहिरी कडे गेलो. तिथे हुडवा होता. तो हुडवा खुरप्यानी फोडला तीन पोती भरली. चौथ्या पोते भरताना सागऱ्याने हात घातला अन काय ते बोंब मारत खाली निजला. काय झाले कळेना.
मग सगळी जण पोती उचलून पागेकडे आले. सागऱ्याला सायकल वरुनं आणला. आणि त्याला कट्ट्यावर बसवले तो तळमळत होता. कळा पार एकाच हाताला खांद्यापर्यंत गेल्या. मग कळले ह्याला हुडव्यात विंचू चावला होता. घरातून पाणी आणून पाजले. रात्री गावातील डॉक्टरला उठवला आणि इंजेकशन करून आणले. मग शेवटी त्याला आमच्या घरात एक औषध होते. ते चावलेल्या ठिकाणी लावले. मग सगळी झोपली. झोपायला रात्री एक वाजला.
पुढे गावात चर्चा चालू झाली. शेणकूट गायब होतायत. जेवण ते लोक सावध झाले. तोपर्यंत आमचे टार्गेट पूर्ण झाले होते.
शेवटी शिमग्याची पौर्णिमा उजाडली. संध्याकाळी आमची रसद बाहेर काढून गल्लीतील चौकात होळी रचली. ती जवळपास चार फूट रुंद आणि सात फूट उंच होळी रचली गेली. होळी पेटवायला चार मशाली तयार झाल्या. नेहमीप्रमाणे मारुती च्या देवळात नंदादीप वर मशाली पेटवून होळी प्रज्वळीत केली. गल्लीतील सगळ्या घरातील नैवेद्य नारळ त्यात घातले गेले. रात्री धापर्यंत होळी पेटलेली. त्यात कोणी हरभर भाजले कोणी कणसं, भाजून प्रसाद म्हणून वाटू लागले.
दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली. काही जणाकडून पैसे पण वसूल केले. व रात्री उठून मदत केली म्हणून डॉक्टरांचे बिल पण देऊन त्याची सांगता केली.
आता मात्र सगळी जण अभ्यास करण्यात गुंतले. परीक्षा जवळ आलेली. रात्री अभ्यास दिवसा शाळा. घरातील पण कोणीच काम पण सांगत नव्हतेच.
परीक्षा चालू झाल्या, सम्पल्या.
तस बारा बैलाचं बळ आला. घरची कामे. शेतातील कामे वेळ मिळाला की पत्ते कुटणे. जर बुधवार मात्र रात्री नऊ वाजता सोपा गच्च भरु लागला. आमीन सायांनी आणि बिनाका गीत मला ऐकण्यासाठी कान आतुर होऊ लागले. त्यावेळी गावात एकमेव HMV चा रेडिओ बाहेर आणून लावत असू. ते गीत ऐकण्यात धन्यता पण होती. परीक्षा झाल्या तरी मुलं मात्र आमच्या सोप्यातच झोपत होती. त्यातला कल्याणी म्हणून एक मित्र होता तो जरा बेरकी होता.
– क्रमशः भाग दुसरा
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈