डॉ. ज्योती गोडबोले 

? मनमंजुषेतून ?

☆ भूतां परस्परे जडो… ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

माझ्या घरी काम करणारी प्रीति सांगत आली, “ काकू, आपल्या बागेत ते छोटे झाड आहे ना, त्यावर एक कबूतर मरून पडलंय आणि दुसरं अर्धवट जिवंत आहे. मला हात बी लावायची भीति वाटतीय.”

मी काहीतरी वाचत होते. म्हटलं “ थांब. बघून येते काय झालंय ते.”

घाई घाईने बागेत गेले. खरंच की. एक कबुतर मरून लोंबकळत होतं आणि बिचारं दुसरं फडफड करत पंख उडवून उडायचा प्रयत्न करत होतं. जवळ जाऊन बघितलं तर त्या दोघांचे पाय एका प्लास्टिकच्या पातळ दोरीत गुंतले होते आणि त्या दोरीचा गळ्याला फास लागून बिचारं एक गतप्राण झालं होतं. मला इतकं वाईट वाटलं सांगू… दुसरं जिवाच्या आकांताने फडफड करत होतं पण बिचाऱ्याच्या पायात गुंतलेली ती दोरी काही सुटत नव्हती.

मुलीला म्हटलं, ” जरा छोटी कात्री आण ग ”.. तिने कात्री आणून दिली. बिचाऱ्याच्या त्या नाजूक काडीसारख्या पायातून रक्त आलं होतं. मी हळूच कात्रीने ती निळी वायर अगदी अलगद हाताने थोडी कापली. इतक्या करकचून गाठीवर गाठी बसल्या होत्या की समजेचना नक्की कुठे कापावे. आपले पाय सोडवण्याच्या प्रयत्नात आणखी आणखीच निरगाठी बसल्या होत्या. करुण डोळ्यांनी ते माझ्याकडे बघत होतं.

माझ्याही नकळत मी त्याच्याशी बोलत होते, “ कसा रे बाळा अडकलास ?अशी कशी दोघांना एकदमच गाठ बसली रे? थांब हं. आपण मोकळं करू तुला हं.”

आमच्या झाडाला आधारासाठी दिलेली काठी मी हळूच बाजूला केली. ती फांदी वाकवली. जिथे ती निळी वायर दिसली तिथे अगदी नाजूक हातानी अगदी छोट्या कात्रीने कापत गेले. मला भीति वाटत होती, याच्या नाजूक पायाला कापताना दुखापत होणार नाही ना? शिवाय ते मेलेले कबूतर आणि हे, दोन्ही विचित्र तऱ्हेने असे गुंतले होते की मला दिसतच नव्हते नक्की कसे ते अडकले. मी हळूच निळी वायर कापत होते.

माझी मुलगी हळहळ करत मागे उभी होती. “आई, किती ग दुखत असेल त्याला. कोणी मुद्दाम बांधलंय का ग असं?खेळ म्हणून?” तिच्या डोळ्यात पाणी होतं.

मी अलगद हातांनी दिसेल तिथली गाठ मोकळी करत होते. आता त्याचा एक पाय मोकळा झाला. त्याची फडफड वाढली. मला दिसत होतं, याचा पाय चांगलाच दुखावलाय.

शेवटची गाठ सोडवली आणि त्या मृत कबुतरासकट हे जिवंत कबूतर धपदिशी फरशीवर पडलं. पटकन मी ते मेलेलं कबूतर हातात धरून त्याच्यात अडकलेले जिवंत कबूतर मोकळं केलं. त्याने पंखांची फडफड केली आणि पटकन खुरडत का होईना, बागेच्या वाफ्यात जाऊन बसलं… घाबरून त्याची छाती धपापत होती. पण जिवंत राहिलं ते.

लेकीने छोट्या भांड्यात पाणी ठेवलं. आम्हाला ते जगल्याचा अतिशय आनंद झाला. पण भिऊन ते आपल्या मेलेल्या जोडीदाराकडे बघत होतं. त्याला वाटत होतं का की आता हा आपला जोडीदार पण उठेल आणि आपण उडून जाऊ असं….

मग आला आमच्या बागेत काम करणारा मुलगा. चंदन. त्याला लेकीने सगळी हकीकत सांगितली.

तो म्हणाला, ” ताई, हे इथेच रात्रभर राहिलं तर मांजर खाऊन टाकील हो त्याला. ” 

ते बिचारं खुरडत बसलं होतं वाफ्यात. चंदनने थोडा विचार केला आणि म्हणाला, “ मी याला उचलतो आणि सुरक्षित जागी ठेवतो. ” 

दरम्यान मी कबुतराला थोडे शेंगदाणे जवळ टाकले. इकडेतिकडे बघत ते हळूच खाऊ लागलं. पुन्हा आम्हाला आनंद झाला.

मग चंदन म्हणाला, “ ताई, थांबा हं. मी हातावर घेतो त्याला. ”.. त्याने जवळ जाऊन त्याला उचलण्यासाठी हात लावताच कबूतर पंख फडफडवत शेजारच्या टाकीजवळ उडून बसलं. इतका आनंद झाला आम्हा सगळ्याना. मी कामासाठी बाहेर जाऊन आले तरी ते तिथेच बसून होतं.

चंदन म्हणाला, ” अहो, त्याला उडता येत असेल पण आपल्या जोडीदाराच्या उठण्याची वाट बघत ते बसलं होतं बिचारं. ”…. फार वाईट वाटलं आम्हाला.

पण हे प्रीतीने सांगितलं नसतं तर आमच्या लक्षात आलं नसतं आणि याचाही जीव नक्की गेला असता. आम्हाला फार आनंद झाला जेव्हा ते उडून गेलं आणि समोर जाऊन बसलं. , आता त्याचा दुखवलेला पाय हळूहळू बरा होईल. बिचारं खूप वेळ एकटं बसलं होतं टाकीवर. असंही मनात आलं की..

‘समजलं असेल का त्या मुक्या जिवाला, आपला जोडीदार आता आपल्याबरोबर कधीच उडणार नाही ते?’ 

असो. एक तरी मुका जीव वाचवल्याचा आम्हाला मनापासून आनंद झाला…

…. आणि अचानक आठवले वंदनीय ज्ञानेश्वर महाराज – – “ भूतां परस्परे जडो.. मैत्र जीवाचे “ – अगदी आत्मीयतेने सगळ्यांसाठी ही प्रार्थना करणारे….

…. आणि “ मैत्र “ शब्दातली भावना नेमकी उमगली.

©  डॉ. ज्योती गोडबोले 

सांगली 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments