सौ. गौरी गाडेकर
मनमंजुषेतून
☆ “मोलाचा संदेश देणारी छोटी घटना…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
माझी मलाच लाज वाटली. खजिल झालो.
आजूबाजूच्या छोट्या छोट्या घटना आपल्याला काही सुचवत असतात.
आज दक्षिण मुंबईतल्या एका रेस्टॉरंटमध्ये दुपारच्या जेवणासाठी गेलो असताना व सोबत कोणी नसल्यामुळे एक भाजी आणि दोन तंदूर रोटी ऑर्डर केल्या. मला पहिलेच कल्पना होती की भाजी खूप जास्त देण्यात येणार आहे त्यामुळे मी पहिलेच मन बनवलं होतं की आपण भाजी आणि एक जास्तीची तंदूर रोटी पार्सल म्हणून बांधून सोबत घेऊन गरजूला द्यायची.
माझं जेवण अर्ध्यात असतानाच एक उद्योजक अथवा व्यावसायिक असलेला तरुण माझ्या टेबलवर येऊन बसला. त्याने पण काही ऑर्डर केले. माझं जेवण संपण्याच्या आधी त्याची ऑर्डर आली त्यांनी आधी वेटरला बोलावून जेवण सुरू करण्याआधी त्यानी मागितलेल्या भाजीचा अर्धा भाग आधीच सोबत नेण्यासाठी पार्सल करण्यास सांगितले. सोबत माझ्यासारखेच त्यानी काही तंदुरी रोटी ऑर्डर करून त्यात भाजी सोबत द्यायला सांगितले. त्याने ऑर्डर केलेल्या भाजीचा अर्धा भाग पार्सल म्हणून पॅक झाल्यानंतरच त्याने जेवायला सुरुवात केली.
त्याच्या या कृतीमुळे व त्यामागच्या भावपूर्ण व्यवहारामुळे मला माझीच लाज वाटली. मी त्याला विचारले की हे पार्सल घरच्यांसाठी आहे का ? तो म्हणाला नाही कोणीतरी गरजूला मी जेवण झाल्यावर देइन. मी त्याला विचारले की पार्सल जेवण झाल्यानंतरही घेता आली असते. तो तरुण मला म्हणाला जेवण झाल्यानंतर पार्सल करून कुणाला दिल्याने आपण कोणावर तरी उपकार केल्याचा आणि अहंकाराचा भाव येतो आणि जेव्हा आपण जेवण सुरू करण्याआधीच शिल्लक राहणारे अन्न कोणासाठी पॅक करून घेतो त्यात मदत, समाधान, स्वाभिमानाचा भाव येतो. समोरचा माणूस पण स्वाभिमानी आहेच हा विचार करून आपण त्यालाही मदत केली पाहिजे आणि मी कुणालाही देताना हे आवर्जून सांगतो की हे मी जेवणापूर्वीच पॅक करून घेतले आहे असं जर मी सांगितलं नाही समोरच्यालाही संकोचल्यासारखे अपराध्यासारखे वाटते.
घटना छोटी आहे पण संदेश खूप मोलाचा आणि जीवनाकडे आपली पाहण्याची दृष्टी अधिक विकसित व संवेदनशील करण्याचा होता.
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈