सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
☆ आठवणींच्या पुळणीवर… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
आठवणींच्या पुळणीवर फेरफटका मारायला लागलं की, असंख्य वाळूचे कण पायावर उधळत असतात! मग हे बघू का, ते बघू अशी अवस्था होते! ती वाळू पायाला गुदगुल्या करत असते तर कधी ओलसर असेल तर ती चिकटून बसते, जशी मनाला एखादी आठवण सोडत नाही!
तसं आपलं हे आयुष्य म्हणजे एक स्वतःसाठी असलेला मर्यादित सागरच असतो जणू! ज्याप्रमाणे सागराचा अंत कळत नाही, तसंच आपल्याला या मनाची खोली कळत नाही! ओहोटीच्या वेळी जितके आत जावे, तितके समुद्रात ओढले जातो, तसंच या मनाचे! जितके खोल खोल विचार करत राहू, तितकं मन आत आत रुतत जाते! त्या आठवणींची पुळण(वाळू) आत इतकी पाळेमुळे धरून असते की, एक एक जुना क्षण क्षण ही त्या वाळूचा कण कण असते. त्यात पाय नकळत रुतत जातात.
आयुष्याची भरती तर आता संपत आली याची जाणीव आहे. मागे वळून पाहताना जाणवतं, एवढं आयुष्य कसं गेलं आपलं! बालपणाचा काळ सुखात, शिक्षणात गेला. पुढे ४०/५० वर्ष संसार सागरात बुडलो होतो.
काठावरची रेती सुद्धा भेटत नव्हती. सतत उसळणाऱ्या परिस्थितीच्या एकावर एक लाटा येत होत्या आणि पट्टीच्या पोहणाऱ्या सारखे आपण लाटावर लाटा झेलत होतो. कधी कधी नाकातोंडात पाणी जाऊन गटांगळ्या मारायला व्हायचं, पण आपला जीव सांभाळत, तोल सांभाळत त्या लाटांवर स्वार व्हायचं! नवीन उमेद मिळायची मोठ्या लाटा पार पाडताना! बघता बघता काळ सरत चालला आणि शरीराची आणि मनाचीही ताकद कमी होत चालली. आता समुद्र डोळ्यासमोर येतो तेव्हा त्यातील लाटांवर स्वार होण्यापेक्षा किनाऱ्यावर बसून लाटा बघणं हेच बरं वाटतं – म्हणजे तेवढेच करता येतं! समुद्रात न जाताही त्याची विशालता, खोली, रंगरूप, सगळं मनाशी साठवत राहावंसं वाटतं!
तो आहे तसाच आहे – स्थिर, त्याच्या रूपात मग्न! आभाळाची निळाई प्रतिबिंबित होऊन त्याची निळाई कायम दिसते. त्या निळाईत पार बुडून गेलाय तो.. आणि मी- त्याच्यात!
सागराला किनारा आहे, तीच त्याची सीमा आहे आणि आपली ही एक वेगळीच सीमा रेषा आहे! आठवणींची वाळू पायाखालून सरत चालली आहे… एक दिवस असा येईल की हे वाळूत चालणारे पाय मंद मंद होत जातील.. पाणी, वाळू निसटून जाऊ लागेल पाया खालून, आणि शोधता शोधता तो किनारा गवसेल जिथून परतायची शक्यता नाही! त्या अनंत, अथांग सागर किनारी नकळत थांबतील हे पाय आणि डोळ्यासमोर येईल आपल्या गतायुष्याची मन- सागरात उमटणारी झलक! त्यातच विरून जाईल सगळी ऊर्जा, उमेद आणि उभारी!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈