सुश्री नीता कुलकर्णी
☆ “नाते संबंधांची शाल…” ☆ सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी ☆
आज तिने ठरवलचं… ते काम करायचचं… किती दिवस झाले… उगीच मागे पडत होते…
मनातून तिला माहित होतं.. खरतरं ती ते टाळतं होती.. ते करणं भागच आहे.. हे तिच्या लक्षात आलं मग मात्र ती नातेसंबंधांची शाल घेऊन बसली…. दुरुस्त करण्यासाठी..
खोटे आरोप प्रत्यारोप.. रुसवे फुगवे.. याचे त्याला त्याचे याला.. कागाळ्या कानपिचक्या.. बतावणी.. गाॅसीप..
अशा अनेक गोष्टींनी शाल कुठे कुठे उसवली होती.. कुठे फाटली होती.. तर काही ठिकाणी विरली पण होती.. अगदी दुरुस्त होण्याच्या पलीकडची.. आता ही शिवायची कशी.. तिला मोठा प्रश्नच पडला शिवताना चुकून धागे जरा जास्त ओढले गेले तर फाटायची भीती काय करावं बाई.. काही सुचेना… ही शाल कपाटात बंद करून ठेवता येत नाही.. ती अंगावर घ्यावी लागते
आज ती थोडी हताश झाली.. ही शाल टाकून देऊन दुसरी नवीन घेताच येत नाही.. तशी सोय नाही जन्म झाला तेव्हा एकदा जी मिळते ती आयुष्यभर वापरावी लागते तिने अलगद धक्का न लावता ती शाल अंगाभोवती लपेटली आणि निघाली बाहेर..
मनातून शंकीत होती.. कोण काय म्हणेल ही भीती पण होती.
आजवर तिने इतरांच्या शालीकडे निरखून नीट पाहिलं नव्हतं.. पण आज तिने लक्षपूर्वक पाहिलं त्यांच्याही शालीला अशी बरीच भोकं उघडपणे दिसत होती.. पण त्याबद्दल त्यांना खेद खंत दु:ख नव्हतं नवीन वस्त्र घालावं तशी ती शाल ते सहजपणे मिरवीत होते.. अभिमानानी आनंदाने.. ती आश्चर्यचकित झाली.. मग हळूहळू विचार करता करता तिचं तिला उमगलं…
हे वर्षानुवर्ष नाही तर युगानंयुगे असंच चाललं आहे.. असंच चालत राहणार आहे ही शाल अशीच असते.. तशीच ती वापरायची असते.. ती मनाशी म्हणाली…
…. असू दे वरची शाल फाटकी.. कोणाला न दिसणारं माझं अंतर्मन मात्र मी स्वच्छ ठेवीन.
ते निश्चितच माझ्या हातात आहे.. त्याच्याशी प्रामाणिक राहीन. त्याची सावध साथ असली की इतर कोणी असले काय नसले काय….
आपल्या विचारांनी तिला आत्मविश्वास आला. तिने आज शालीकडे नीट निरखून पाहिले तर काही सोनेरी धागे चमकले….
आपुलकी, माया, प्रेम, स्नेह, मैत्री.. यांचे काही मजबूत धागे तिला दिसले.. ती स्वतःशीच हसली तिचा सन्मार्ग तिला दिसला..
…. ती निघाली.. मनोनिग्रहाने.. सबल मनाने
…. जीवन शांतपणे जगण्याच्या वाटेने
एकटीच…
☆
© सुश्री नीता चंद्रकांत कुलकर्णी
पुणे
मो 9763631255
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈