सौ राधिका -माजगावकर- पंडित
☆ ‘माझी शिदोरी…’ भाग-२४ – तुळस नसलेली तुळशीबाग… ☆ सौ राधिका -माजगावकर- पंडित ☆
तुळस नसलेली तुळशीबाग…
अक्कानी म्हणजे माझ्या आत्त्याने तुळशीबागेत रात्रीच्या आरतीला जाण्याचा नेम कधी चुकवला नाही. अधून मधून ती आम्हांलाही घेऊन जायची. सुरुवातीला वाटायचं एवढं काय आहे त्या तुळशीबागेत? पण नंतर लक्षात आलं, काय मिळत नाही ते विचारा तुळशीबागेत?. अहो पूर्वी म्हणे इथे खूप तुळशी होत्या. म्हणून तर नांव पडलं तुळशीबाग. पण गंमत म्हणजे आता तिथे नावालाही तुळशीचं रोपटं सुद्धा नाही. एकदा संध्याकाळी आम्ही तिथे पोहोचलो, आत्या म्हणाली, “मला माझा राम भेटलाय, तुम्हाला जायचं असेल तर जा भटकायला. आम्हाला काय तेच पाहिजे होतं, आम्हीं पूर्ण देऊळ परिसर पालथा घातला. अगदी अलीबाबाच्या गुहेत गेल्यासारखं वाटलं. कानातलं गळ्यातलं, नाकातलं बांगड्यांच्या मोहात आम्ही पडलो. गंमत म्हणून सांगते तुम्हाला, प्रेमाच्या राज्यातून बाहेर पडून लग्न झालेली जोडपी पण तिथे ‘हाजीर ‘होती. त्यातल्या काही नवऱ्याचं लग्ना आधी बायकोला गुलाबाचे फुल, गजरा, गुच्छ, सेंट, अत्तर बाटल्या देऊन झाल्या होत्या. पण हाय रे देवा! ते रोमँटिक क्षण मागे पडले. आणि ते मागे सारून नवरे आता पूर्णपणे संसाराच्या बेडीत अडकले होते. आणि केविलवाण्या चेहऱ्यांनी, ताट वाट्या तवा पोळपाट हा संसारातील पसारा घेण्यासाठी बायकोच्या मागे मागे अगदी धरून पकडून आणल्यासारखे चालले होते. आम्हाला तर बाई हंसूच झालं त्यांच्याकडे बघून. तुझ्यासाठी आकाशातील तारे तोडून आणीन असं म्हणणारे ते ‘हिरो’ उलथन, झारे, चिमटे असं काही बाही विकत घेत होते. कारण तुळशीबागेत मिळणाऱ्या चमचे, चहा गाळणी, कुंचे, पातेली, सतेली घेऊन त्यांना संसार चालवायचा होता आणि बायकोला खुश करायचं होतं. जुन्या पिढीचं लक्ष होतं रामाकडे, तर तरुणाईंचे डोळे हार, कानांतले, नाकांतले, गोंडे, रिबिनी इत्यादी नकली साज शृंगार वस्तूंकडे वळत होते. मारुतीच्या पायरीवर आत्याने आम्हाला जबरदस्तीने बसवलं आणि म्हणाली, ” पुरे झाले हं, आता भटकणं! मी सांगते ते ऐका! तुम्हालाही माहीत असायला पाहिजे. ” आम्हा भाचरांना खाली बसवत ती म्हणाली, ” ही जागा खाजगी वाल्यांची होती. मंदिराची बांधणी मजबूत असून शिखर 140 फूट उंच व कळसच मुळी चार फुटाचा आहे. श्रीराम लक्ष्मण सीतामाईच्या मूर्ती इतक्या देखण्या आहेत की डोळ्याचं पारणं फिटतं, उमाजी बाबा पंढरपूरकरांनी ह्या शुभ, सुंदर, रेखीव मूर्ती मजुरांकडून चाळीस रुपये म्हणजे त्या काळातली मोठी बिदागी देऊन तयार करून घेतल्या होत्या. आपले पूर्वज व्यवहार दक्ष होते नियमित आणि अचूक हिशोब नोंदणी असायची त्यांची. त्यांच्या नोंदणी वहीत ही नोंदआढळली. आमच्या मनात खूप खूप शंका होत्या मी विचारलं, “आत्या पुण्यात खूप रामाची देवळे आहेत का ग? आणि कुठे आहेत?कुणी आणि कधी बांधली गं ? आमच्या बाल सुलभ उत्सुकतेला आत्त्याने हंसून दाद दिली. राम म्हणजे तिचा अत्यंत प्राणप्रिय, आवडीचा विषय श्रोत्यांकडून दाद मिळाल्यावर ती सरसाऊन म्हणाली, “हो तर! ऐका हं!पुण्यात अनेक राम मंदिरे आहेत रास्ता पेठेतला रास्त्यांचा राम, सदाशिव पेठेतला गाय आळीचा राम, रहाळकरांचा राम, फुटक्या बुरुजाकडे जाताना जोशीराम. तर आपल्या आप्पा बळवन्त चौकाकडून केसरी वाड्यावरून लकडी पुलाकडे जातांना लागतो तो भाजीराम. 1762 मध्ये ते मंदिर बांधलं गेलं. “आत्याला मध्येच थांबवत आम्ही ओरडलो, “नक्कीच तिथे भाजीवाले बसत असतील म्हणून तो भाजीराम झाला असेल, बरोबर नागं आत्या? खळखळून हंसत आत्या म्हणाली, “अगदीबरोब्बर. शंभरापैकी शंभर मार्क तुम्हाला. पण अगं तुम्हीं मघाशी चोरखण आळी म्हणालात ना?ते मात्र चूक आहे हं! चोर नाही चोळखण आळीतला वैद्य राम तर टिळक स्मारक, मंदिरात पण बाबा महाराजांचे राम मंदिर आहे. लक्ष्मी रोडवरचं लिखिते मंदिर आणि शिवाजीनगरच्या रोकडोबा समोरचं राम मंदिर पण प्रसिद्ध होत. आत्याला थांबवत आमचे मोठे शिकलेले चुलत बंधुराज म्हणाले, “आत्या तू तर सगळ्या पुण्यातल्या राम मंदिरातून आम्हाला फिरवून आणलंस, हो नागं? आत्या म्हणाली, “मग आता दमलांत की काय? ऐकून दमलात आता चालून दमा. उठा बरं! रामाला प्रदक्षिणा घालायचीय बर का!मगाशी तुळशी बागेला काही बाही खरेदी करायला दुकानं धुंडाळत बाहेरून फेरा मारलात ना! पण आतल्या श्रीरामाला प्रदक्षिणा घालायला विसरलात. उठा बरं लवकर!आणि पळा आता. मला जप करायचाय जपमाळेकडे जाणारे तिचे हात पकडून आम्ही म्हणालो, “अगं आत्तू माळेशिवाय शंभर वेळा जप मगाशीच झालाय तुझा. “तो कसा काय? ह्या तिच्या प्रश्नाला बगल देऊन आम्ही ओरडलो, “आत्तापर्यंत हे राम मंदिर ते राम मंदिर अशी खूप साऱ्या राम मंदिराची ओळख करून देतांना तुझ्या तोंडून हजार वेळा रामाचं नाव निघालं. मग आता कसला वेगळा जप करतेस?” आत्याने पाठीवरून हात फिरवून किताब “दिला, हुशार आहात. ” पण काही म्हण हं आत्या! तुझ्याकडून खूप छान आणि नवीन माहिती आम्हाला मिळाली. आता रामायणातल्या रामाची छानशी गोष्ट सांग ना घरी जाताना. आणि बरं का मंडळी, गोष्टी वेल्हाळ आत्याची रामकथा ऐकता ऐकता आम्ही जोगेश्वरी जवळच्या आमच्या घरी केव्हां पोहोचलो हे आम्हा मुलांना कळलंच नाही..
– क्रमशः भाग २४
© सौ राधिका -माजगावकर- पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈