प्रा. सुनंदा पाटील
मनमंजुषेतून
☆ मराठी गझल गायकीचा यथोचित सन्मान !!!! ☆ प्रा. सुनंदा पाटील ☆
“गझलनवाज पंडित भीमरावजी पांचाळे यांना महाराष्ट्र शासनाचा गानसाम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर… “
महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने दिला जाणारा अतिशय प्रतिष्ठेचा असा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार २०२५’ ज्येष्ठ गझल गायक गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे उर्फ दादा यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने दादांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !
तसेच मा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, मुक्ता बर्वे आणि काजोल या मान्यवरांचेही विविध पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा… !
गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांनी गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ मराठी गझल गायकी रुजवण्याचा प्रयत्न अखंडपणे केला व आजही तो सुरू आहे. केवळ गझल गायकीच नव्हे तर मराठी हात मराठी गझलेकडे वळविण्याचे मोठेच काम दादांनी केले आहे आणि आजही ते करीत आहेत.
गझल सागर प्रतिष्ठान याची स्थापना करून, त्या अंतर्गत अखिल भारतीय मराठी गझल संमेलने भीमरावदादानी सर्वप्रथम सुरू केली. नुकतेच १० वे अखील भारतीय गझल संमेलन अकोला येथे मोठ्या दिमाखात पार पडले. एखाद्या काव्यप्रकाराचे स्वतंत्र दोन-तीन दिवसीय संमेलन हा एक अनोखा प्रयोग आहे.
गझल सागर प्रतिष्ठानच्या वतीने त्यांनी घेतलेली गझल संमेलने, गझल लेखन कार्यशाळा, पुस्तक प्रकाशने आणि इतर सर्वच काम फार महत्त्वाचे आणि मोलाचे आहे. मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक आणि सर्वेसर्वा गझलसम्राट सुरेश भट यांनी रुजवलेल्या मराठी गझल लेखनाचा सर्वांगीण विस्तार करण्यामध्ये गझल नवाज पंडित भीमराव पांचाळे यांचे योगदान अतिशय भरीव स्वरूपाचे आहे. ते गेल्या ३५ ते ४० वर्षांहून अधिक काळ माझे व्यक्तिगत जवळचे स्नेही आणि मोठ्या बंधूसम आहेत. हा माझ्या आनंदाचा व अभिमानाचा विषय आहे. शिवाय ते माझे भारतीय स्टेट बँकेचे सहकारी ही एक वेगळी ओळख आहे.
त्यांच्या उपक्रमात सहभागी होण्यात मला नेहमीच आनंद वाटत आलेला आहे. मी गझल सागर प्रतिष्ठानच्या अनेक गझल संमेलनात सहभागी झाले आहे. त्यातला एक प्रसंग सांगते. वाई येथे ” कृष्णा काठावर गणेश घाट आहे. ” अशा ठिकाणी ५वे अखिल भारतीय गझल संमेलन होते. नागपूरहून तिथे जाणं तसं मला कठीणच होतं. बँकेच्या नोकरीत सुट्टीचा प्रश्न होता. तरीही शुक्रवारी रातोरात प्रवास करून मी वाईला सकाळी १० ला पोचले. गेल्यागेल्याच दादांना भेटले. दादांनी मला सांगितलं की, एका ‘मुशायऱ्याचं ‘ आणि गझल मैफिलीचं सूत्रसंचालन मला करायचंय. माझ्यावर एवढा विश्वास दादांनी टाकला होता. मात्र प्रसंग बाका होता.
मुशायरा तर सहज केला मी. रात्रीच्या जेवणानंतर गझलेची मैफिल सुरू झाली. समोर श्रोत्यांमध्ये दस्तुरखुद्द राजदत्त साहेब बसलेले. श्रीगणेशाचं नाव घेऊन मी सूत्रसंचालनाला सुरुवात केली. हातातल्या कागदावर फक्त गायकांची नावे / आणि कुणाची गझल गाणार तेवढे नाव होते.. मला नोट्स काढायलाही वेळ मिळाला नाही. बाहेर कार्तिक पौर्णिमेचं चांदणं पसरलं होतं. पुढे सर्व दिग्गज बसलेले. खच्चून गर्दी झालेली. कदाचित माझ्यातही मंच संचारलं असावं. संगीताचा कान आणि गझलेची जाण यामुळे मी त्यावेळी निभावून गेले. अर्थातच मैफिल सर्वोत्तम झाली… आणि अनपेक्षित पणे राजदत्त साहेबांच्या हस्ते माझा विशेष सत्कार करण्यात आला. हे केवळ दादांचा माझ्यावरचा विश्वास यामुळे घडले. असे क्षण विसरता येत नाहीत. दादांनी असंच आजवर अनेक लोकांना घडवलंय !!!
दुसरा प्रसंग ! लोकव्रत पुणे प्रकाशनाने माझा “सावली अंबराची” हा गझलसंग्रह प्रकाशित केला. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. मा. शिरीष कुलकर्णी सरांशी माझे बोलणे झाले ! चर्चा झाली की, प्रकाशन कुणाच्या हस्ते व्हावे ? मी म्हटलं “माझ्या गझल संग्रहाचे प्रकाशन करण्यासाठी दादांना विचारूया का? ” शिरीष सर म्हणाले, “पंडीतजी? ते येतील? ते खूप मोठे आहेत. व्यस्त असतात ते.” पण माझी खात्री होती. दादा हो म्हणतील याची. तसंच झालंही. दादांनी सहज होकार दिला प्रभाशनासाठी. भीमराव दादांच्या हस्ते माझ्या “सावली अंबराची” या गझलांच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं. शिवाय दादांनी त्याच पुस्तकातली एक गझलही म्हटली. अशा गोड आठवणी फक्त जपायच्या असतात. विशेष म्हणजे माझ्या “सावली अंबराची ” आणि “माझा विचार आहे ” या दोन्ही गझलसंग्रहांची पाठराखण – ब्लर्ब त्यांनीच केली आहे.
दादांनी गझल गायकीसाठी ऐन भरात असलेली भारतीय स्टेट बँकेची नोकरी सोडली. गझल गायकी त्यांना खुणावत होती. नोकरीमुळे “गाणं आणि नोकरी ” ही तारेवरची कसरत होती. कोणाला न्याय द्यायचा ? काय निवडायचं ? त्यांनी गझल गायन निवडलं ! कारण त्यांचा स्वतःवर विश्वास होता. विशेष म्हणजे गीता वहिनी तुमचंही हार्दिक अभिनंदन. कारण तुम्ही दादांची सहधर्मचारिणी. खूप छान सांभाळलंत सगळं ! दादांची लेक डॉ. भाग्यश्री ! आज वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून, नवनवी आव्हाने स्वीकारत नव्या पिढीची दमदार मराठी गझल गायिका आहे. तुझंही अभिनंदन बाळा !
मराठी गझल कशी गावी याचं जिवंत उदाहरण म्हणजे पंडीतजी. तीन तासांची बैठक / मैफल कशी संपते हे रसिकांना कळतच नाही. गझल ही शब्दप्रधान गायकी आहे. सुरांसोबत शब्दही तेवढेच महत्वाचे असतात. म्हणून गझलगायन वाटतं तेवढं सोपं नसतं. ते आव्हान दादांनी स्विकारलं. आज नव्या जुन्या अनेक गझलकारांचा गझल ते गातात. दादांनी गझल गायली की तो / ती गझलकारही प्रकाशात येतात.
गझले बरोबरच ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत अशा सर्व शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीतामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सामाजिक, राजकीय, आर्थिक कुठलीही बंधने कलेच्या आड येत नाहीत हेच खरे. मात्र त्यासाठी योगदानही तेवढेच असावे लागते. वेळ येताच शासन, समाज यांना त्याची दखल घ्यावीच लागते. त्यांचं गायन केवळ महाराष्ट्रच नव्हे तर भारताच्या सीमा ओलांडून विदेशात गौरवलं गेलं आहे. अनेक पुरस्कार आणि सन्मानांनी दादांना गौरवून स्वतः गौरवीत झाले आहेत.
हाही पुरस्कार त्याचं एक दृश्य रूप आहे. मराठीला अभिजात दर्जा मिळालेला असताना ” मराठी गझल गायकीचा होणारा सन्मान म्हणजे ” दुधात साखरच नव्हे तर केशर वेलची सुद्धा आहे.
रुपये १० लाख रोख रक्कम, सन्मानचिन्ह, मानपत्र व शाल श्रीफळ असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण २५ एप्रिल २०२५ रोजी एन. एस. सी. आय. डोम, मुंबई येथे एका भव्य समारंभात होणार आहे.
मराठी गझल गायकी सातासमुद्रापार पोचवणाऱ्या दादांना मानाचा मुजरा!!
दादांनी अजून खूप खूप गावं, अनेक सन्मान त्यांना मिळावेत हीच शुभेच्छा !!! दादा तुम्हाला लवकरच ” पद्मपुरस्कारानेही सन्मानीत केलं जाईल हा विश्वास आहे. ! त्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !!!
© प्रा.सुनंदा पाटील (गझलनंदा)
८४२२०८९६६६
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈