सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
शिक्षण- B.A B.Com शालेय शिक्षण ज्युबिली कन्या शाळा मिरज, महाविद्यालयीन शिक्षण विलिंग्डन महाविद्यालय
छंद- वाचन, लिखाण, शिवण मैदानी खेळात (खोखो, कबड्डी, ऍथलेटिक्स, अनेक बक्षिसे एक वर्ष विलिंग्डन जिमखाना विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून निवड)
पुरस्कार- १) कौशिक प्रकाशन सातारा २) मराठी विज्ञान परिषद इस्लामपूर ३) ज्येष्ठ नागरिक संघ हुपरी ४) रामकृष्ण मिशन
आणखी बरेच लहान-मोठे निबंधातील पुरस्कार (सकाळच्या मुक्तपीठ स्मार्ट सोबती मध्ये आलेले लेख, राष्ट्रसेविका समितीच्या हस्तलिखितासाठी गेली पाच वर्षे लेखकांची निवड, नवरत्न नाथ नगरी दिवाळी अंकांमधून आलेले लेख)
☆ मनमंजुषेतून : मातृमंदिर ☆ सौ पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆
आम्ही शेतात रहात असल्यामुळे साप, विंचू, चोर यांच्यापासून रक्षण होण्यासाठी कुत्र्याची गरज होती. योगायोगाने सुंदर ठुसक्या बांधण्याची, पिवळे ठिपके असलेली कुत्री कुठून तरी अचानक आली आणि आमची होऊन राहिली. नामकरण झालं पिंकी. टॉमी कुत्रा आणि पिंकी परिसराचे राखण छान करायचे. आमच्या लहान मुलांवर त्यांचे विलक्षण प्रेम होते आणि आणि ते दोघे मिळवून मुलांना छान सांभाळायचे. आता पिंकी छान रुळली होती. आता तिला पहिल्यांदाच पिल्लं होणार म्हणून तिची बडदास्त चालली होती. लवकरच तिला दहा पिल्ल झाली. अगदी गोंडस पिल! त्यांच्यासाठी एक छोटसं घर तयार केलं. बाळंतिणीची व्यवस्थाही छान चालली होती. पिंकी बाहेरून आली की पिल्ले धावत जाऊन पिण्यासाठी तिला झुंबा याची. एक दिवस अचानक पिंकी गायब झाली. खूप शोध घेतला, पण नाही कुठेच नाही. पिल्लांना आम्ही खाऊ घालून वाढवत होतो. एके दिवशी अचानक दुपारी एका कुत्र्याचा आक्रोश ऐकायला आला. पिंकीचा होता तो आक्रोश. पोट खपाटीला अंगावर गोमाशा, गळ्यात नायलॉन च्या कुरतडून तोडलेल्या दोरीचा थोटुक अशी अवस्था पाहिली आणि खात्री पटली की तिला कोणीतरी पळवून नेल होत. दुरून आल्याने ती धापा टाकीत होती. पिलांच्या जवळ जात होती. पिल तोपर्यंत आईला विसरली होती. तिचा रागरंग बघून पिल्ल दूर जायला लागली. रात्री बाळासाठी कडा उतरून येणारी हिरकणी मला आठवली. आम्ही पिंकीला खायला देत होतो, जवळ घेत होतो. पण तिला फक्त पिल जवळ हवी होती. मी एक आई असल्याने मला कल्पना सुचली. दोन पिलांना उचलून तिच्या पोटाजवळ नेल आणि (अहो आश्चर्यम्) पिलानी आईला ओळखलं. माया, वात्सल्य, प्रेम, करुणा, अत्यानंद सगळ्या भावना ओसंडून वहायला लागल्या. बिन दुधाची कोरडीच, पण सगळ्या भावनांनी तट्ट भरलेली आचळ पिल्ल चुकू चुकू ओढायला लागली. मोकळ्या पोटी प्रेमाचा पान्हा फुटला होता. आता पुन्हा ती पिलां बरोबर आपल्या घरात रहायला लागली. पिल्ल मोठी झाली. त्यांचा सर्वांना जीव लागला होता. चांगलं घर बघून, त्यांना ओवाळून, ‘नीट सांभाळा हो’ असो सांगून हळूहळू दिली गेली. प्रत्येक पिल्लू देताना डोळ्यात पाणी उभ रहायचं पण कुठंतरी भावनांवर नियंत्रण ठेवायला हवच ना! मातृ मंदिरात पिंकी एकटीच राहिली. दिवस रहात नाहीत.
आता टॉमी आणि पिंकी दोघेही म्हातारे झाले. टॉमी कॅन्सर होऊन देवाघरी गेला. दोघांनीही आमच्यावर अनंत उपकार केले आहेत. न फिटणारे. आता पिंकीचे ही खाणेपिणे कमी झाले. तिला डोळ्याला ही कमी दिसायला लागले. तिचे हाल होऊ नयेत, अशी आम्ही रोज प्रार्थना करीत होतो. दिवाळीचा आनंद सर्वांना मिळवून दिलान. दिवाळीतला लाडू खाल्लान. आणि दुसरे दिवशी सकाळी शांत पणाने प्राण सोडलान.
मातृमंदिर ओसाड झालं. मोकळं झालं. तेथेच तिची उत्तरक्रिया करून वर चाफ्या च झाड लावलं आणि त्या झाडावर पाटी लावली “मातृमंदिर”
© सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई
पत्ता- ‘पुष्पानंद’ बुधगावकर मळा रस्ता मिरज, जि. सांगली
फो नं. ०२३३-२२१२१५१ मो. ९४०३५७०९८७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
स्मृतीवृक्ष … छान आठवण.
बेहतरीन रचना
एक’ कुटुंबवत्सल’ कथा.खूप छान.