श्रीमती सुधा भोगले
मनमंजुषेतून
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 4 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
त्याला (authentic) म्हणतात?
सकाळी न्याहरीला चुलीवर खूप वेळ शिजत ठे4वलेली घरच्या तांदुळाचे अटवलं, मऊ भात शिजत ठेवलेला असे त्यातच दारच्या वेलाची तोंडली शिजायला टाकलेली असत भाताबरोबर ती मऊ लुसलुशीत होत. खायला केळीच्या पानाच्या फाळक्यावर वाढून घेतले जाई. हे केळीच्या पानाचे फाळके मी व मावशी वाडीत जाऊन हाताने काढून आणत असू केळीच्या मोठ्या उभ्या पानातून अलगद आडवे पान कापुन घेऊन मग मधल्या दांड्यातून ते फाडून घ्यायचे. पण हा मधल्या दांड्याला जोडलेला पानाचा भाग काढायचे कौशल्याचे आणि रोजच्या सवयीचे असल्याने मावशी लीलया काढी. मी कधी प्रयत्न केला तर पान फाटे पण हळूहळू तेही जमले टाकीवर धुवून घेऊनच आत येत असू.
तर असे हे फाळके हारीने मांडून त्यावर गरम गरम भात आणि प्रत्येकाच्या पानात मऊ झालेले तोंडले ते कुस्करून त्यात दही तिखट मीठ प्रत्येकाने आपापले मिसळायचे हे तोंडल्याचे झटपट भरीत भाताबरोबर मुटू मुटू खाऊन तृप्तीची ढेकर द्यायची.
कधीकधी आजी तांदळाची उकड करत असे तीही रुचकर लागे पोहे घरचे असत घरच्या भाताचे जरा जाडसर करून आणलेले. त्यात दारातला नारळाचा चव लाल तिखट मीठ साखर व तेल एवढेच घालायचे त्याला म्हणायचं हात फोडणीचे पोहे इतके रुचकर लागत. आम्ही ते केव्हाच मटकावत असू. आंब्याचा हंगाम असल्याने सर्व झाडांना पाडाला आलेले आंबे लटकलेले असत. वारं सुटलं की आंबे बदा बदा खाली पडत. रायवळ, तोतापुरी, पायरी, अशी विविध जातीची झाडे होती.
सकाळी भिक्षुकीची कामे आवरली की आजोबा घरी येत. उंच, गोरे, कानात बिगबाळी, धोतर व पांढरा शर्ट परिधान केलेला असे. ओल्या सुपार्या कातरून जेवण झाल्यावर अडकीत्त्याने कातरत मुखशुद्धी करिता खायला घेत, भिंतीत एक गोल तोंडाचा कोनाडा होता. त्यातही काही साहित्य ठेवलेले असे. कधी ते ओटीवर लोडाला टेकून बसलेले असत. आम्ही वाडीत आंबे मिळतील का असे त्यांना विचारात असु, ते म्हणत, “जा आंबा मिळेल!” मग भराभरा वाडीत जात असू. आंबे पडायची वाट बघत असू. एक गाणं ही म्हणत असू. ते असे, “आपटं धोपटं, पायलीचा पोपटं, पहिला आंबा पडेल तो देवाला!” आणि मग वारं येई आणि धपकन आंबे पडत. ते वेचून आणत असू. या रायवळ आंब्याचे ‘कोयाडं’ करत. बाठी पातेल्यात पिळायच्या, सालीचा गर पाण्यातून काढायचा, ते पाणी दाट असायचे, ते बाठीत ओतायचं खमंग मेथी, हिंग, मोहरीची फोडणी त्या पाण्याला द्यायची, मीठ, तिखट, गुळ घालून उकळी आणायची झालं ‘कोयाडं’ तयार. इतके रुचकर लागते की दिल आणि रसना खुश व्हावी.
दुपारची जेवण झाल्यावर मोठी माणस अंमळशा झोपत, आम्ही मुल धाकटे मामा, मावशी आम्ही दोघ भावंड असा आमचा बेड्यात (गोठा) पत्याचा वख्खईचा डाव पडे दोन-तीन तास रंगत रंगत संध्याकाळ होई. त्याबरोबर दारच्या कैर्या तिखट-मीठ लावून खाता खाता आनंद सोहळाच साजरा होई. काहीवेळा ओटीवर असलेल्या खांबांना धरून आम्ही खांब, खांब, खाम्बोल्या असा खेळहि खेळत असू. अधूनमधून समुद्राकाठी संध्याकाळी फिरायला जाण ही होई. समुद्र तसा जरा दूर पश्चिम दिशेकडे होता, १ किलोमीटर चालत जावे लागे. ही घरे पूर्वेकडे होती. समुद्रात पाण्यात खेळणे, वाळूवर किल्ले करणे, कधी कवड्या शिंपले वेचणे चालू असे. काहीवेळा समुद्राच्या लाटेबरोबर लाट विरली की शंख , गोगलगायीचे गोल शंखही वाहात येत, चुकून वेचायला गेल तर आत किडा असेच मग जोरात फेकून देत असू. पुन्हा पाण्यात! थोडी भीतीही वाटे. मग सूर्याचे सागरात हळूहळू अस्ताला जातानाचे दृश्य विलोभनीय असे, मग सायंकाळचे तांबूस रंग आकाशात रेंगाळत थोड्यावेळात संधी प्रकाश दिसू लागे. आमची पावले घराकडे परतत. उन्हाळा म्हटलं की, काळीमैना डोंगराची मैना करवंद आणि जांभळं यांचाही हंगाम जोरात असे, मी व मावशी शेताच्या पलीकडे डोंगरीवर जात असू. तिथे करवंदीच्या जाळ्या भरपूर होत्या. इतकी ताजी करवंद खाण्यात अप्रूपच असे. वाडीत जांभळीची जांभळे वेचून ती गोडीही चाखण्यात आनंद असे.
एका चुलत मामाचे घर शेजारी होतं तिथे बकुळीचे उंच झाड होतं. संध्याकाळच्या वेळेस बकुळीच्या फुलांचा सडा पडे आम्ही तीही आनंदाने वेचत असू. घरी जाऊन नारळाच्या झावळीचे कोवळे हिरं काढून बकुळीचा गजरा ओवत असू. त्या बकुळीचा घमघमाट अजूनही मला येत असल्यासारखा भासतो बकुळ फुलं सुगंधाने भरलेली कुपीच जणू! वाळलं तरी त्याचा परिमल आनंद देत राही.
—-क्रमश:
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈