श्रीमती सुधा भोगले
मनमंजुषेतून
☆ मामाच्या गावाला जाऊया….भाग 5 ☆ श्रीमती सुधा भोगले ☆
(१९५६-१९७० च्या या आठवणी)
परिमल आनंद देत राही?
काही वेळच्या सुट्टीला पावसाळा सुरु होई. कोकणातला तो मुसळधार पाउस वेड्यासारखा बरसतच राही, हे चक्र दिवस रात्र चाले. आणि सात-सात दिवस थांबण्याचे नाव नसे. त्या पावसाला सातेरे म्हणत. पावसाच्या आवाजाला विशेषण कितीतरी आहेत, एकंदर पाऊस मनाला सुखवून जातो, त्याविना जीवन अशक्यच नाही का?
पावसाळ्यात रानभाज्या उगवत भारम्बीची भाजी, टाकळा, मुद्दाम पेरलेला वाल, त्याच्या वितभर उगवलेल्या भाजीचे केलेले बिरडं सगळं कसं रुचकर लागे.
शेतात भात आता वितभर वाढू लागे. उन्हाळ्यात केलेली नांगरणी मग पेरणी थोडी रोपे तयार झाली की लावणी होई ‘गुडघा, गुडघा’ चिखलात, ‘गुडघा चिखलात’, भाताची पेरणी करू या की ग, करू या की ग! अशी भाताची पेरणी संपन्न होई.
हळूहळू आषाढ संपे श्रावण येई उन पावसाचा खेळ चाले. डोंगरीच्या बाजूने इंद्रधनू दिसू लागे. मग गणपतीचे जुलैत महिन्यात सुरु केलेले काम वेग घेई.
बाजूच्या माजघरात उंचीवर हारीने शाडूच्या मूर्ती विराजत, याची तयारी पावसाळ्या आधीच सुरु होई आजोबा मामा मुंबईला जाऊन शाडू माती रंग कुंचले आणि बरेच साहित्य घेऊन येत. श्रावणापर्यंत मूर्ती वाळल्या की रंगकाम सुरु होई. एका वर्षी मोठे झाल्यावर तेथे होतो घेतला हातात कुंचला मामाला विचारून गणपती रंगवायला बसले. तो आनंद अवर्णनीय होता!
त्यावर्षी विष्णूमामाने गजेंद्र मोक्षाचा देखावा फारच सुंदर केला होता, भगवान विष्णूला खरोखरच लहानसं उपरणंही घातले होते, खूपच सुंदर कलाकृती झाली. आता सारखे पटापट फोटो काढता येत नव्हते एवढेच!
गणपतीच्या डोळ्याची आखणी करणे, हे विशेष कलात्मक काम असे, त्यान मोठा मामा तरबेज होता तो डोळ्यांचे रंगकाम करी. मग चतुर्थीचे आदल्या दिवशी पासून ज्यांनी नोंदणी केली आहे ते मूर्ती न्यायला येत. तो एक आनंदमय व्यापार होता. कलाकृतीचे कारागीर आणि गणेशभक्त यांच्यातला अलौकिक ऋणानुबंध! वर्षानुवर्ष येणारे अनेकजण!
मंगलमूर्तीची पूजा होई गौरीचे आगमन मग पितृपंधरवडा असे करत दसरा दिवाळीचे दिवस जवळ येत. शेतात भातं निसवायला येत (म्हणजे भाताचा दाणा तयार होणं) आणि मग कापणीचा हंगाम! खळ्यामध्ये कापलेले भाताचे भारे येऊन पडत मधे बसलेल्या खांबाला बैल जुंपत मग मळणीचे काम होई त्यावेळी आता सारखी मळणी यंत्र नव्हती बैलाने तुडवून भातं वेगळे होई पोती भरून कोठारात ठेवली जात. भात काढल्यावर वालाची काही भागात पेरणी होई.
शेताची कामे झाली की दिवाळी झाल्यवर गावदेवातांच्या जत्रा सुरु होत. आजोबा पूर्वीपासून या जत्रात मिठाईचे दुकान थाटत असत. बेड्याच्या (गोठा) बाहेर भट्ट्या कायम स्वरूपी केलेल्या होत्या. मग मुंबईला जाऊन मावा (खवा) काजू व मिठाईला लागणारे सामान खरेदी होई. भट्ट्यावर कढया चढत, बत्तासे, मावा बर्फी, पाकवलेले काजू, भेंड, बदामी बर्फी, साखर फुटणे, दुधी हलवा, इत्यादी पदार्थ करत भेंड करण्यासाठी पक्का गोळीबंद, साखर होईल इतका पाक करत. मग त्या पाकाची थोडा थंड झाल्यावर लांब वळी करत. आणि ती एका खांबाला बांधलेल्या खिळ्याला अडकवून त्याला लांब लांब ओढत. पुन्हा वळकटी पुन्हा ओढणे, अस करत पांढरट रंग आल्यावर भेडांना जसे विळखे दिसतात ते पडल्यावर छोट्या वळकट्यांकरून भेंडे कापून लहान लहान आकारात तयार होत.
एके दिवशी, मी त्या सुमारास तेथे होते. तशी लहान पोरंच! त्या वेळी वीज नव्हती कंदील, बत्ती, किंवा भुते असत. हे भुते म्हणजे जाड बाटलीला, वर वात ओवता येईल असे पत्र्याचे तिकाटणे आणि बाटलीत रौकेल वर जोत पेटवायची की उजेड पडे. त्या दिवशी आजोबा बर्फी कढईत ढवळत होते. मला म्हणाले, “बाय, जरा वर उचलून भूत्याचा उजेड दाखव!” मी भूत्या हातात घेऊन तसे केले पण, तेवढ्यात खाली भट्टीला वैलाची तीन गोल गोल भोके होती त्यात पाय अडखळला, भुत्या हेंदकाळला व थोडेसे रॉकेल नकळत बर्फीत पडले असावे.
—–क्रमश:
© श्रीमती सुधा भोगले
९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈