श्री उदय गोपीनाथ पोवळे
मनमंजुषेतून
☆ हेमराजवाडीतील गणपती ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆
प्रत्येकवर्षी गणपती आले की गिरगावातील वेगवेगळ्या गणपतींची आठवण येतेच.
सहा महिने आधीपासून रविवारी गणपती मंडळांच्या मिटींग्स चालू व्हायच्या .वाडीतील काही बुजुर्ग लोकाना अध्यक्ष,सचिव, खजिनदार अशी पदे देऊन सार्वजनिक मंडळाची नेमणूक व्हायची. वर्गणीवर चर्चा व्हायची, वाद आणि काही वेळा भांडणेही होत असत. पण त्यामुळे कधी गणेशोत्सवात विघ्न येत नसे. सगळेजण गणेशोत्सव कसा चांगला होईल ह्यासाठी जोमाने कामाला लागायचे.
—- पण १९८७ च्या हेमराजवाडीच्या गणपतीची तयारी मात्र एक वर्ष आधीपासूनच चालू होती, कारण त्यावर्षी हेमराजवाडीतल्या गणपतीला ५० वर्षे होणार होती. त्यामुळे ते गणपतीउत्सवाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष होते. त्याची संपूर्ण जबाबदारी अशा कामात नेहेमी आघाडीवर असणाऱ्या वाडीतील चार तरुणांनी घेतली होती. वाडीतील असंख्य तरुण कार्यकर्ते त्यांच्या मदतीला होते. त्यामुळेच सुवर्णमहोत्सवी शिवधनुष्य वाडीतल्या रहिवाश्यांच्या साथीने व्यवस्थित उचलले गेले. सुवर्ण महोत्सवाची तयारी पद्धतशीरपणे चालू होती.
एक महिना शिल्लक असताना बाबूच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. तसे त्याच्या डोक्यात भन्नाट कल्पना येणे हे नवीन नव्हते. त्याने सांगितले, ” ह्यावर्षी आपण गणपतीला खरोखरच्या हत्तीवरून आणायचे “. सुरुवातीला सगळ्यांनी त्याला वेड्यात काढले . जोखीम खूप आहे– पोलीस परमिशन मिळणे मुश्किल आहे —हत्ती गर्दी बघून उधळू शकतो –अशी अनेक कारणे सांगून सगळ्यांनी त्याला हा विचार डोक्यातून काढायला सांगितला. पण बाबू असा सहजासहजी हार मानणारा नव्हता—-
परळच्या पुलाखाली एक माहूत त्याचा हत्ती घेऊन राहत होता. तेथे जाऊन त्याने प्रथम त्या माहुताला तयार केले.. नंतर जवळपास पंधरा दिवस, रोज रात्री त्या हत्तीजवळ जाऊन कधी फटाक्यातला बॉंम्ब लाव, फटाक्याची माळ लाव, तर कधी ढोलताशा वाजव असे करून हत्ती दचकतो का, उधळतो का ह्याचे निरीक्षण केले. जेव्हा सगळ्यांना खात्री पटली की हत्तीवरून गणपती आणण्यात काहीच धोका नाही, तेव्हा सर्वसंमत्तीने त्यावर शिक्कामोर्तब झाले. आता पोलीस संमतीची गरज होती. त्याकाळी दक्षिण भारतात देवांच्या मिरवणुका हत्तीवरून निघायच्या हे टीव्हीवर बघायला मिळायचे. पण महाराष्ट्रात तरी तसे कधी दिसले नव्हते. तेव्हाचे एक राजकीय नेते वाडीतच रहात असल्याने पोलीस संमतीची बोलणी झाली, पण लेखी संमती मिळणे शक्य नव्हते. त्यामुळे,’ तुमच्या जबाबदारीवर मिरवणूक काढा आणि काही अघटित घडल्यास कारवाईला सामोरे जाण्यास तयार रहा,’ या अटीवर, गणपतीचे आगमन हत्तीवरून होणार हे नक्की झाले, आणि पूर्ण गिरगावात हेमराजवाडीच्या गणपतीची चर्चा सुरु झाली.
गणेशचतुर्थीच्या दिवशी पहाटे हत्तीला कोमट पाण्याने आंघोळ घालून दुधाचा अभिषेक केला गेला. सोंडपट्टी आणि अंगावर झालर चढवून सजविण्यात आले. सजवलेल्या अंबारीत बाप्पांची मूर्ती ठेवण्यात आली.पुढे राजदंड आणि मागे छत्र घेऊन मावळे उभे केले गेले. ‘गणपती बाप्पा मोरया’ अशी सामुदायिक आरोळी दिली गेली. सनई चौघडा आणि बँड पथक वाजविण्यास सज्जच होते. ‘गजानना श्रीगणराया आधी वंदू तुझ मोरया’ हे गाणे बँडवर वाजविण्यास सुरवात झाली. सगळे कार्यकर्ते मिरवणुकीत काही अघटित घडू नये ह्याची दक्षता घेत होते. गणपतीबरोबर एकाला अंबारीत बसवून, जितेकर वाडीतून वाजतगाजत मिरवणूक सुरु झाली. सी पी टॅंक वरून फडके वाडीच्या गणपतीवरून, गिरगावातून मिरवणूक हेमराजवाडीत आली. गणपतीचे वाडीत आगमन झाल्यावर नऊवारी साड्या नेसून, नथी घालून, केसांत गजरे माळून १५१ सुवासिनींनी गणपतीला औक्षण केले. त्यादिवशी हेमराजवाडीत सगळे खरंच ‘ न भूतो न भविष्यती ‘ असेच घडत होते. गणरायाचे आगमन गजराजाच्या अंबारीतून– असे आधी कधीच घडले नव्हते आणि त्यानंतरही आजपर्यंत कधीही घडले नाही— ते स्मृती पटलावरून कधीच विरणारेही नाही. .
गणपती स्थानापन्न झाला आणि गणपतीउत्सव सुरु झाला. नेहमीपेक्षा मोठे स्टेज आणि सजवलेला मांडव उत्सवाची भव्यता वाढवत होता . तेव्हाच्या महापौरांच्या हस्ते सुवर्णमहोत्सवी उत्सवाचे उदघाटन झाले.
दहाही दिवस सकाळसंध्याकाळच्या प्रसादाचा मान कोणाचा ह्याचे ‘आरक्षण’ झालेलेच होते. प्रत्येकालाच आपला हातभार लागावा असे वाटत असल्याने, जमेल तसा प्रत्येकजण गणपतीची सेवा करीत होता
रात्री पन्नासाव्या वर्षाला शोभेल असे करमणुकीचे कार्यक्रम होत होते.
सुवर्णमहोत्सवाची भव्यता जाणवत होती. त्यासाठी मंडळाला पैशाची गरज होती म्हणून लॉटरी काढण्यात आली होती. आधी एक महिन्यापासून लॉटरी चालू करून पहिले बक्षीस स्कुटर ठेवले होते. त्याकाळी स्कुटर घेणेही सगळ्यांना शक्य नसे. छोटेसे स्टेज करून त्यावर स्कुटरचे प्रदर्शनही केले होते. पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नव्हता. शेवटचे तीन दिवस राहिले होते. मी लॉटरी विकायची जबाबदारी घेतली. शेवटच्या तीन दिवसात लहान मुलांना पँट- शर्ट आणि टाय लावून वाडीच्या नाक्यावर उभे केले. माइकवरून प्रत्येकाला तिकीट घेण्यासाठी गळ घातली जाऊ लागली. मोठ्या मुलांना सिग्नलला बसमध्ये चढवून तिकीटे विकायला पाठविले, ज्याला प्रतिसादही चांगला मिळाला. “ लॉटरीचे तिकिट घ्या आणि बसऐवजी स्कुटरवरून घरी जा” असे आवाहन करत तीन दिवसात सगळी तिकीट विकली गेली.आवश्यक पैसे जमा झाले. निकाल काढायला झावबावाडीतल्या स्वप्नील जोशी या तेव्हाच्या फेमस बालनटाला बोलाविले होते. एक दिवस वाडीतल्या रहिवाश्याना जेवण ठेवले होते.आवर्जून वाडीच्या माहेरवाशीणीना, आणि वाडी सोडून गेलेल्या माजी रहिवाश्यानाही बोलाविले होते. त्यादिवशी संपूर्ण वाडीत एक वेगळेच चैतन्य नांदत होते.
गणपती विसर्जनाचा दिवस उजाडला. दहा दिवस कसे गेले ते कळलेच नाही.. बाप्पासाठी निरोपाच्या दिवशीही काहीतरी वेगळंच असणार हे नक्की होते. फुलांनी सजवलेला चार सफेद घोड्यांचा रथ बाप्पासाठी तयार होता. पुढे ढोल — लेझीम –आणि मागे रथात बसलेला बाप्पा, अशी मिरवणुकीला सुरुवात झाली. बाप्पा परत चालले म्हणून सगळी वाडीच मिरवणुकीत सामील झाली होती. प्रत्येकाच्याच डोळ्यात पाणी होते. अशातऱ्हेने हेमराजवाडीतील आगळयावेगळया सुवर्णमहोत्सवी गणेशोत्सवाची सांगता झाली.
————-खरंच काही आठवणी विसरता नाही येत —जागा बदलल्या तरी ओढ नाही संपत—- अंतर वाढले म्हणून प्रेम नाही आटत.
हेमराजवाडीचे वेगळेपण हेमराजवाडी सोडल्यावरच जास्त जाणवते. गिरगाव सोडलेल्या प्रत्येक गिरगावकरची आपल्या वाडीबद्दल अशीच भावना असेल ह्याची मला खात्री आहे.
© श्री उदय गोपीनाथ पोवळे
मो. नं. ९८९२९५७००५.
ठाणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈