☆ मनमंजुषेतून : साक्षात्कार… ☆  श्री रवींद्र पां. कानिटकर 

आमच्या घराच्या बागेत आंबा, पेरु, नारळ, सिताफळ अशी अनेक फळझाडे आहेत. जास्वंदी,जाई, जुई,मोगरा, अबोली, गोकर्ण, गौरी अशी मनमोहक फुलझाडे बहरलेली असतात. फुलझाडांना येणाऱ्या कळ्या, हळुवार उमलणारी फुले, अंगणात दरवळणारा सुगंध तासनतास राहतो. सुगंधाने मन उल्हसित होतेच त्याबरोबर निसर्गाचे अनाकलनीय चमत्कार ही अनुभवायास येतात.

दरवर्षी मे महिन्यात अतिशय चविष्ट, मोठमोठाले भरपूर आंबे येतात. पावसाळ्याच्या सुरुवातीला भरपूर पेरु, पावसाळ्यात सिताफळे, बारमाही नारळ अशा अनेक फळांची आमचे येथे रेलचेल असते. उन्हाळ्यात आंबे पाडाला आले की ते अलगदपणे काढून घरातच अढी घालण्याचा आमचेकडे जणू एक कार्यक्रमच असतो. त्यातल्या त्यात कच्च्या आंब्यांचे पन्हे,चटणी, चैत्रातील आंबा घालून केलेली हरभराडाळीची कोशिंबीर यांची चव जीभेवर बराच कळ रेंगाळते. हळूहळू, आंब्याच्या आंबट गोड वासिने घर भरून जाते. आंबे पिकत आले की ते आमच्या मित्रांना, गल्लीतील ओळखिच्या लोकांना तसेच गावातील नातेवाईकांना देण्याचा दरवर्षीचा आमचा रिवाज आहे. कुणाला आंबे द्यायचे चुकून विसरलेच तर ते स्वतः आवर्जून, अगदी हक्काने आंबे घेऊन जातात. आम्हालाही त्यांच्या आनंदात सहभागी व्हायला आवडते.

दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आंब्याच्या झाडातून मोहोर हळुहळू डोकावू लागला. शिवरात्रीला शंकराला आंब्याचा मोहोर वाहून भरपूर आंबे येवोत अशी प्रार्थना केली जाते. वाऱ्याच्या झुळुकेबरोबर मोहराचा मंद सुवास संध्याकाळी घर भारून टाकतो.

परराज्यात राहणाऱ्या आमच्या मुलीने फारच हट्ट केल्याने व तिलाही एकटीला थोडी सोबत व्हावी या उद्देशाने आम्ही उभयता मार्च 2020 च्या पहिल्या आठवड्यात तिच्याकडे गेलो. माझी पत्नी थोडे जास्त दिवस तिथे राहणार होती. मी मात्र 15-20 दिवसांनी, म्हणजे मार्च 2020 अखेरीस घरी, सांगलीला परत यायचे असे नियोजन केले. परंतु, अचानक करोनाचे संकट सर्व जगभर पसरले. आपल्या भारतातही मग लॉकडाउन -1,  2,  3 असे करत लॉकडाउनची कालमर्यादा वाढतच गेली. तिकडे आंब्याचा हंगाम सुरु झाला. दरवर्षीचे घरच्या झाडाचे आंबे क्षणोक्षणी डोळ्यासमोर येऊ लागले. माझ्या 2-3 मित्रांना मी फोन केले. त्यांनी थोड्या थोड्या दिवसांनी, गेटवरुन चढून जाऊन, जमेल तसे आंबे काढून त्यांचा आस्वाद घेतला. काही मित्रांनी आंब्याचे लोणचे, चटणी, मुरांबा, साखरांबा असे अनेकविध पदार्थ केले आणि त्यांचे फोटो आम्हाला वॉटस्अप वर शेअर देखिल केले. आमचे घरी कुलुप असल्याने दरवर्षीची आंब्याची अढी यावर्षी नव्हती. आमच्या मित्रांनी काढलेले आंबे, आमच्या शेजाऱ्यांना, आमच्या नातेवाईकांना दिले. आंब्याची अप्रतिम चव व जिभेवर रेंगाळणाऱ्या अविट गोडीच्या रसभरीत वर्णनाचे फोनही आम्हाला आले.

करोनाची परिस्थिती थोडीशी आटोक्यात आल्यावर, कोव्हीड -19 स्पेशल ट्रेन सुरु झाल्यावर, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन, जून अखेरीस, म्हणजे, तब्बल साडेतीन महिन्यांनंतर, आम्ही एकदाचे आमचे घरी, सांगलीला परतलो. एक दोन उन्हाळी व यावर्षी उशीरा सुरु झालेल्या  पावसामुळे अंगणातील फुलझाडे तरारली होती. जाई, जुई, मोगरा आदी फुलांच्या भरगच्च ताटव्यांनी व मंदधुंद सुगंधाने त्यांनी पहाटे आमचे गेटमध्येच स्वागत करून आमच्या प्रवासाचा शीण क्षणात घालवला.

थोडी विश्रांती घेतली. सकाळी उठल्यावर झाडांभोवतीचा पालापाचोळा गोळा केला,  नारळाच्या पडलेल्या झावळ्यांची आवराआवर केली. झाडांवर मायेने हात फिरवत, पाणी घातले. “घरचे चविष्ट आंबे यावर्षी आम्हाला चाखायला देऊ शकलो नाही” अशा अपराधी भावनेने आंब्याचे झाड, मान खाली घालून, जणू उदासवाणे आमचेकडे पहात असल्याचा भास झाला.

दरवर्षी पानापानात लपून बसणारे हिरवे, अर्धे पिवळसर आणि हळूवारपणे गडद पिवळे होणारे आंबे आठवले. दरवर्षीचे आंब्यानी लगडलेले झाडाचे मोबाइल मधील फोटो व आत्ता मात्र आंबेरहित झाडाचे काढलेले फोटो पाहताना मन हेलावून गेले.

गच्चीवरून आत्ता असेच काढलेले फोटो सहजच झूम करून पाहताना, पानाआड लपून बसलेला एक आंबा दिसला. अलगद हाताने त्याला खाली काढले आणि त्याचाही फोटो काढला.

फोटोत दिसणारा आंबा व आंब्याचे झाड याकडे पाहताना, आंब्याचे झाड आमच्याकडे पाहून गालातल्या गालात थोडे स्मित हास्य करत असल्याचा जणू भास झाला.

महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूने पावनखिंड जशी एका हाती लढवली तशीच आमच्या आंब्याच्या झाडाने आम्ही परगावातून परत येइपर्यंत, तो एकमेव आंबा, जवळजवळ साडेतीन महिने ऊन, वारा, पाऊस या सर्वांशी प्राणपणाने झुंज देऊन, इतर सर्वांपासून, पानात जणू लपवून ठेवला होता.

तेवढ्यात, वाऱ्याची एक झुळुक आल्याने, फांद्या हलवून, पानांच्या सळसळीने, आंब्याचे झाड, आमच्या पुनर्भेटीने, त्याला झालेला आनंदच जणू व्यक्त करीत असल्याचा साक्षात्कार आम्हाला झाला.

© श्री रवींद्र पां. कानिटकर

– श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सुहास रघुनाथ पंडित सांगली

लेख छान झाला आहे .